आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात जाऊन पोहचलेले अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी. मागील अनेक दशकांपासून मिलिंद मराठी मनोरंजनविश्वात सक्रिय आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आणि लोकप्रियता मिळवली. मात्र त्यांच्या आयुष्याला आणि करियरला मोठी कलाटणी देणारी मालिका होत ‘आई कुठे काय करते’. या मालिकेत त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली आणि त्यांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले. त्यांच्या नकारात्मक भूमिकेला देखील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले. नुकतीच त्याची ही मालिका पाच वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करून समाप्त झाली.
मात्र मिलिंद अजूनही प्रेक्षकांच्या मनात तसेच आहे. मिलिंद सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय असून, ते सतत विविध पोस्ट शेअर करत प्रेक्षकांच्या संपर्कात असतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली असून, या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांना ८५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच त्यांच्याबद्दल असलेल्या मनातील भावना देखील व्यक्त केल्या आहेत.
मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “पप्पा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आज तुम्ही 85 वर्ष पूर्ण केले, माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे की तुम्हाला उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य लाभू देत आणि तुमच्या आवडत्या समाजकार्यासाठी तुम्हाला अजून खूप ऊर्जा, शक्ती, आणि यश मिळू देत. मला माहिती आहे तुम्हाला यश मिळो व न मिळो तुमचं कार्य सतत प्रामाणिकपणे चालू असतं.
सतत कामात व्यस्त राहणे, सतत दुसऱ्याला मदत करत राहणे, पोलीस खात्यातून Retire झाल्यानंतर, तुम्ही Re-tyreing करून घेतलं, गाडीला जसे नवीन टायर लावून परत ती वेगाने धावायला लागते, तसेच इतकी वर्ष पोलीस खात्यातून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा तुम्ही दुप्पटीने काम केलं आहे. असंख्य लोकांना मदत केली आहे, अनेक कुटुंबाचे कल्याण केलं आहे, समाजातल्या तळागाळातल्या कोणीही तुमच्याकडे मदतीचा हात मागितला आणि तो निराश होऊन परत गेला असं कधी झालं नाही.
पोलीस खात्यातले अधिकारी खूप गर्विष्ठ आणि अहंकारी मी पाहिलेले आहेत, पण तुम्ही सहाय्यक पोलीस आयुक्त च्या पदावर असताना सुद्धा कधीही गर्व केला नाही किंवा हाता खालच्या लोकांवर अधिकार गाजवला नाही, एवढ्या मोठ्या हुद्द्यावर राहून इतरांना आपण कशी मदत करता येईल हेच सातत्याने बघत आलात.
त्यामुळे निवृत्त झाल्यानंतर सुद्धा इतक्या वर्षांनी आजही लोक तुम्हाला मान देतात, आजही लोकांचा तुमच्यावर जीव आहे, मला असंख्य लोकं भेटतात आणि तुमच्याविषयी अतिशय प्रेमाने आणि आधाराने बोलतात तेव्हा माझी प्रेमाने छाती भरून येते, सतत मी किती भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे वडील लाभले.
View this post on Instagram
माझ्याही आयुष्याची ही वाटचाल तुमच्या आधाराशिवाय होऊ शकली नसती, तुम्ही कायम माझे Hero राहिला आहात, तुमच्या इतकं काम मी आयुष्यात करू शकणार नाही हे मला लहानपणीच कळलं होतं, पण आजही तुमच्यामुळे खूप काम करायची ऊर्जा सतत मिळत असते, तुमच्यामुळे आजही प्रामाणिक काम करायचा प्रयत्न करत असतो, तुम्हाला आनंद मिळावा आणि तुम्हाला माझा अभिमान वाटावा म्हणून माझी सतत धडपड चालू असते.
माझे वडील workoholic आहेत असं मी सतत सगळ्यांना सांगत असतो, पण आज तुमच्या 85 व्या वाढदिवसाच्या एक विनंती करावीशी वाटते, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही नक्की करा, पण या सगळ्या धावपळीमध्ये, स्वतःची काळजी पण घ्या, स्वतःच्या तब्येतीला जपा, पप्पा कधीतरी स्वतःसाठी पण जगा. I love you वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”
दरम्यान मिलिंद यांच्या या पोस्टवर कलाकारांसोबतच नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स करत मिलिंद यांच्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मिलिंद हे नेहमीच सोशल मीडियावर विविध पोस्ट करत त्यांच्या आठवणींना उजाळा देत अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर करतात. त्यांच्या पोस्टची नेटकरी नेहमीच वाट देखील बघतात.