डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सत्ता हाती घेताच बेकायदेशीर स्थलांतरितां विरोधात कडक भूमिका घेतली आहे. त्यांच्या हद्दपारीच्या धमकीमुळे भारतीयांसह अन्य देशातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचे व्यापक परिणाम अमेरिकेवर होणार असल्याचे आता स्पष्ट होत आहे. मुख्य म्हणजे, अमेरिकेत लाखो भारतीय विद्यार्थी उच्चशिक्षण घेण्यासाठी रहात आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी हे तंत्रज्ञानातील शिक्षण घेत, तेथे अर्धवेळ नोकरी करतात. हे विद्यार्थी हॉटेल, शाळा, अशा ठिकाणी काम करतात. मात्र आता या सर्वांच्या कागदपत्रांची वारंवार तपासणी करण्यात येत असल्यामुळे हे विद्यार्थी मानसिक तणावाखाली आले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी भीतीच्या छायेमध्ये या अर्धवेळ नोक-या सोडल्या आहेत. याशिवाय अमेरिकेचे कॅलिफोर्निया राज्य हे शेतीप्रधान राज्य आहे. कॅलिफोर्नियाच्या बदामांना जगभरात ओळख आहे. (Donald Trump)
या शेती उद्योगामध्येही भारतातून गेलेल्या अनेकांना काम मिळाले आहे. मात्र आता पोलीस या कामगारांची चौकशीही मोठ्याप्रमाणात करत असून हे कामगार भीतीमुळे कामावर जाण्यास टाळाटाळ करत आहेत. वास्तविक अनेक कामगारांकडे काम करण्याचा परवाना नाही, त्यासाठी त्यांनी अमेरिका सरकारकडे अर्ज केलेला आहे. मात्र या सर्वात पोलीस चौकशी सुरु असल्यानं आणि पकडण्यात येईल, या भीतीनं अनेकांना मानसिक आजारानं ग्रासलं आहे. अमेरिकेत सत्ता हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इमिग्रेशन धोरणाबाबत कठोर भूमिका स्वीकारली आहे. यातूनच अनेक भारतींवरही हद्दपारीची टांगती तलवार आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांना बेड्या घालून पाठवण्यात आल्यामुळे तसेच अशाच बेकायदेशीर स्थलांतरितांना तुरुंगात ठेवण्यात येत असल्यामुळे आता अमेरिकेत रहाणा-या विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे. यातील अनेक विद्यार्थी अर्धवेळ नोकरी करतात. या विद्यार्थ्यांना काम करण्याचा परवाना असतो, त्यातून ते आठवड्याला ठराविक तास काम करु शकतात. मात्र आता हेच विद्यार्थी काम करण्यास टाळत असल्याचे दिसून आले आहे. (International News)
डोनाल्ड ट्रम्प यांनी चालू केलेल्या हद्दपारी मोहीमेबाबत एक अहवाल आला असून त्यामध्ये अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये यावर्षी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट आल्याचेही स्पष्ट झाले आहे. अमेरिकेतील अनेक राज्यांची अर्थव्यवस्था विद्यापीठांवर अवलंबून आहे. या विद्य़ापीठांमध्ये भारतासह जगभरातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी येतात. मात्र गेल्या काही वर्षात या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणा-या परकीय विद्यार्थ्यांच्या प्रमाणात घट येत आहे. त्यातच कोरोनामध्ये अनेक विद्यापीठांना टाळं लावण्याची वेळ आली होती. अशावेळी या विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना शुल्क देण्यासाठी सवलतही दिली होती. (Donald Trump)
मात्र यावेळी ट्रम्प यांच्या धोरणाचा विद्यापीठांना फटका बसत असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षभरात, अमेरिकेने भारतीय विद्यार्थ्यांना जारी केलेल्या F-1 विद्यार्थी व्हिसाच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते सप्टेंबर 2024 पर्यंत 64,008 भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा देण्यात आला आहे. मात्र 2023 मध्ये याच कालावधीत 1,03,495 विद्यार्थ्यांना व्हिसा देण्यात आला होता. एका वर्षात 38 टक्के विद्यार्थ्यांमध्ये घट झाल्यानं विद्यापीठ प्रशासनानं चिंता व्यक्त केली आहे. याचे कारण अमेरिकेतील बदलती धोरणं असली तरी, अमेरिकेत नव्या नोक-या निर्माण होण्याच्या प्रमाणातही घट झाली आहे. अमेरिकन कंपन्या आता स्थानिक लोकांना प्राधान्य देत आहेत. त्यात ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट या धोरणाची भर पडली आहे. म्हणून भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकन विद्यापीठांकडे पाठ करुन ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमधील विद्यापीठांना अधिक पसंती देत असल्याचे समोर आले आहे. (International News)
=============
हे देखील वाचा : Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कसे झाले ?
Modi Trump : पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत काय ठरलं?
=============
ट्रम्प यांच्या हद्दपारीच्या आदेशांचा कृषी क्षेत्रावरही परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील कॅलिफोर्निया, अॅरिझोनाच्या कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भारतीय कामगार आहेत. या कामगारांमध्येही भीतीचे वातावरण आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार अॅरिझोनामध्ये, पाचपैकी एक कृषी कामगार आणि आठपैकी एक बांधकाम कामगाराकडे कायमचा कायदेशीर दर्जा नाही. त्यामुळे या सर्वांना हद्दपार होण्याची भीती वाटत आहे. या सर्वांमुळे शेतमालाची आणि घरांच्याही किंमती वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिका फर्स्ट या ट्रम्प यांच्या धोरणाचा मुळ अमेरिकन नागरिकांनाही अशातून फटका बसणार आहे. (Donald Trump)
सई बने