Home » भारतीय क्रिकेटचा ‘टायगर’ मन्सूर अली खान पतौडी (Mansoor ali khan Pataudi)

भारतीय क्रिकेटचा ‘टायगर’ मन्सूर अली खान पतौडी (Mansoor ali khan Pataudi)

by Team Gajawaja
1 comment
Mansoor ali khan Pataudi
Share

भारतीय क्रिकेटमध्ये काही खेळाडू हे त्यांच्या खऱ्या नावापेक्षा ‘टोपण’ नावाने अधिक ओळखले जातात. हल्ली तर खेळाडू स्वतःच स्वतःचे खरे नाव विसरले असतील इतकी त्यांची ‘नामकरणे’झाली आहेत. पण भारतीय क्रिकेटमध्ये काही ‘उपाधी’ अशा दिल्या गेल्या आहेत की, त्यावरून तुम्हाला लगेच तो क्रिकेटपटू ओळखता येतो.

‘पॅन्थर’ म्हटले की चंदू बोर्डेची वेगळी ओळख करून द्यावी लागत नाही. तसंच ‘टायगर’ म्हटलं की, एकमेव द्वितीय असा पतौडीचा नवाब डोळ्यासमोर येतो. मन्सूर अली खान पतौडी (Mansoor ali khan Pataudi) म्हटलं, तर मात्र पटकन लक्षात येणार नाही. अशा या ‘टायगर ‘ची ५ जानेवारी २०२२ ही ८१ वी जयंती. त्यानिमित्त  त्याच्या स्मृतीला उजळा देण्याचा हा प्रयत्न.

मन्सूर अली खानचा जन्म (५ जानेवारी १९४१) भोपाळचा. तो वारशाने हरियाणातील पतौडी संस्थांचा संस्थानिक, तर मातुल घराण्याकडून त्याला भोपाळ संस्थान मिळाले. तो इंग्लंडमधील ऐतिहासिक ऑक्सफर्ड विद्यापीठाचा विद्यार्थी. त्याला क्रिकेटचा वारसा घरातूनच मिळाला. त्याचे वडील इफ्तीकार अली खान १९४६ च्या इंग्लंड दौऱ्यात भारताचे कप्तान होते.

असा हा सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला खेळाडू भारतीय क्रिकेट संघात दाखल झाला तो केवळ विसाव्या वर्षी दिल्ली येथे ‘टेड डेक्स्टर’च्या इंग्लिश संघाविरुद्ध. त्यापूर्वी केवळ काही महिने आधी त्याला इंग्लंडमध्ये भीषण मोटार अपघात झाला होता. त्या अपघातात उजव्या डोळ्याला इजा होऊन त्या डोळ्याची त्याची दृष्टी कायमची गेली. तरी त्यानंतर त्याने एका डोळ्याने खेळण्याचा कसून सराव केला आणि भारतीय संघात स्थान मिळवले. एवढेच नव्हे तर त्याने शेवटच्या मद्रास कसोटीत चक्क शतक (१०३ धावा) झळकावलं. 

या शतकानंतर इंग्लिश पत्रकारांनी त्याला विचारले की तुला एका डोळ्याने आपण खेळू शकू असे केव्हा वाटलं? तेव्हा त्याने मिश्किलपणे उत्तर दिले की जेव्हा त्याने इंग्लंडची गोलंदाजी पाहिली तेव्हा.

१९६२ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याची थेट उपकप्तान म्हणून नेमणूक झाली. पहिल्या दोन कसोटी सामन्यात त्याला संघात जागा मिळू शकली नाही. पण बार्बाडोसविरुद्धच्या सामन्यात कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर ग्रिफीथचा चेंडू डोक्याला लागून जबर जखमी झाल्यावर पतौडीने संघाचे नेतृत्व स्वीकारले. त्यावेळी तो केवळ २१ वर्षांचा होता. सर्वात लहान वयात कसोटी कप्तान होण्याचा त्याचा विक्रम आजतागायत अबाधित आहे. त्यावेळी त्याच्या संघात पॉली उम्रीगर, विजय मांजरेकर, चंदू बोर्डे, बापू नाडकर्णी, जयसिंह, सलीम दुराणी असे दिग्गज खेळाडू होते.

He said that he will play under Jaisimha' - Saif Ali Khan recalls when  Tiger Pataudi refused to captain South Zone

टायगरने त्यानंतरच्या काळात  फलंदाज म्हणूनही ठसा उमटवला. सन १९६४ मध्ये माईक स्मिथच्या इंग्लिश संघाविरुद्ध त्याने द्विशतक झळकावले (नाबाद २०३). हे इंग्लंडविरुद्ध भारतातर्फे नोंदवलेले पहिले द्विशतक होते. त्यानंतर १९६४ मध्येच ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात झालेल्या मालिकेत त्याने भारतातर्फे सर्वाधिक धावा करताना एक शतकही ठोकले (१२८ धावा) आणि त्याचबरोबर मुंबई कसोटी जिंकून मालिकाही १-१ अशी बरोबरीत सोडवली.

१९६७ हे वर्ष पतौडीचे वर्ष म्हणून ओळखले जाते. या वर्षी प्रथम इंग्लंड मधील मालिकेतील लीड्स कसोटी सामन्यात पहिल्या डावात त्याने भारताच्या एकूण १६४ धावांपैकी ६४ धावा फाटकावल्या, तर फॉलो ऑन मिळाल्यावर दुसऱ्या डावात त्याने १४८ धावांची अजरामर खेळी केली. या खेळीची नोंद ‘विस्डेन’ ने सुद्धा घेतली. भारत ही मालिका ०-३ अशी हरला पण भारताने आपल्या लढाऊ बाण्याची चुणूक जरूर दाखवून दिली.

१९६७-६८चा ऑस्ट्रेलिया दौरा हा पतौडीच्या कारकिर्दीतील सुवर्णाक्षरात लिहावा असा अध्याय होता. दुखापतीमुळे पहिली कसोटी हुकल्यावर उरलेल्या तीन कसोटीत पतौडीने ४ अर्धशतकांसह मालिकेत ३३९ धावा ठोकल्या. त्यातील मेलबर्न कसोटीत दुखऱ्या पायाने खेळताना त्याने पहिल्या डावात ७५ तर दुसऱ्या डावात ८५ धावा काढताना केलेला खेळ अद्वितीय होता. तिसऱ्या कसोटीतही पहिल्या डावात त्याने अर्धशतक तर मारलेच पण जयसिंहाच्या दुसऱ्या डावातील शतकाच्या जोरावर भारताला विजयाच्या अगदी नजीक नेले होते. भारत हा सामना फक्त ३९ धावानी हरला. त्याकाळी ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी सर्वोत्तम होती, ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल.

7 Interesting Facts You Should Be Knowing About Mansoor Ali Khan Pataudi,  India's Youngest Test Captain

भारत ऑस्ट्रेलियाहून न्यूझीलंडला गेला व भारताने या मालिकेत भारताचा परदेशी भूमीवरील पहिला मालिका विजय नोंदवला. भारताने ही मालिका ३-१ अशी जिंकली. पतौडीची फलंदाजी या मालिकेत तितकी बहरली नाही, पण प्रसन्न, बेदी, नाडकर्णी या फिरकी त्रिकुटाच्या जोरावर हा मालिका विजय साध्य झाला.

१९६९ मधील भारतात झालेल्या न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांमध्ये पतौडीची बॅट अभावानेच तळपली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईत काढलेल्या ९५ धावा व मुंबईतच न्यूझीलंडविरुद्ध काढलेल्या ६७ धावा तेवढ्या उल्लेखनीय होत्या. चेंडू उंचावरून मारणे ज्या जमान्यात पाप समजले जाई त्या काळी ‘टायगर ‘ क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून बिनदिक्कतपणे फटके मारत असे.

पतौडीने एकूण ४६ कसोटीत ३४.९९ च्या सरासरीने २७९३ धावा काढताना ६ शतके ठोकली. आजच्या तुलनेत कदाचित ही आकडेवारी फारशी आकर्षक वाटणार नाही, पण महत्वाची बाब म्हणजे ही कामगिरी त्याने केवळ ‘एका डोळ्याच्या’ जोरावर केली होती. तो पूर्ण तंदुरुस्त असता तर त्याने याच्या दुप्पट/तिप्पट धावा निश्चित केल्या असत्या. 

एका डोळ्याने खेळणे किती कठीण आहे हे सांगताना गावस्करने स्वतःचा अनुभव सांगितला आहे. त्याला एकदा एका डोळ्याला इजा झाली असताना एका डोळ्याने खेळावे लागले. गावस्कर म्हणतो की, त्याला एका डोळ्याने दोन चेंडू दिसत होते आणि त्यामुळे फलंदाजी करणे अशक्य झाले होते. त्याच वेळी त्याने पतौडीच्या महानतेला सलाम केला.

फलंदाज पतौडीपेक्षा कप्तान पतौडी हा भारतीय क्रिकेटमध्ये युगप्रवर्तक ठरला. त्याने बचावात्मक भारतीय क्रिकेटचे आक्रमक क्रिकेटमध्ये रूपांतर केले. जिंकण्यासाठीच खेळायचे मग त्यात काही वेळा हरलो तरी बेहत्तर असा जुगार तो खेळला. तो चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार करायचा व डावपेच लढवायचा. फिरकी गोलंदाजी हे आपले बलस्थान असल्याने त्याने कुठल्याही विदेशी/देशी खेळपट्टीवर फिरकीलाच प्राधान्य दिले. याचे उदाहरण म्हणजे १९६७ मधील बर्मिंगहॅम कसोटी.

या सामन्यात पतौडीने प्रसन्न, बेदी, चंद्रशेखर व वेंकटराघवन हे चार अव्वल फिरकी गोलंदाज खेळवले आणि तेही जलद गोलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर. हे चारही गोलंदाज एकत्रित खेळण्याचा हा एकमेव प्रसंग ठरला. या सामन्यात बुधी कुंदरन या एरवी यष्टिरक्षण करणाऱ्या खेळाडूने नव्या चेंडूवर गोलंदाजी केली होती.

Mansoor Ali Khan Pataudi Was In Love With This Actress, Broke Up With Her  To Marry

प्रसन्नची कारकीर्द बहरली ती पतौडीच्याच नेतृत्वाखाली. १९६७-६८ च्या ऑस्ट्रेलिया -न्यूझीलंडच्या जोड दौऱ्यात केवळ ८ कसोटीत प्रसन्नाने ५० च्या वर बळी मिळवले ते जलद गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर.पतौडीनेच सर्वप्रथम एकनाथ सोलकरची चपळता ओळखून त्याला फॉरवर्ड शॉर्टलेगला उभे केले.

पतौडीने खेळलेल्या ४६ कसोटींपैकी ४० सामन्यात त्याने भारताचे नेतृत्व केले आणि त्यापैकी ९ सामन्यात भारत विजयी झाला. सलग ८ वर्षे ३६सामन्यात नेतृत्व केल्यावर १९७१ मध्ये विजय मर्चन्ट यांनी त्याचे कर्णधारपद काढून अजित वाडेकरकडे सोपवले. मग विंडीज व इंग्लंड दौऱ्यावर जाण्यास या टायगरने नकार दिला.

१९७४ मध्ये इंग्लंडमधील दारुण पराभवानंतर वाडेकरने निवृत्ती घेतल्यावर मायदेशातील विंडीजविरुद्धच्या मालिकेत पुन्हा पतौडीकडे नेत्तृत्व सोपवण्यात आले. तेव्हा ०-२ असा भारत पिछाडीवर असताना पुढील दोन सामने जिंकून भारताने मालिकेत पुनरागमन केले. त्याचे सर्व श्रेय विजय मर्चन्ट यांनी पतौडीलाच दिले.

पतौडी ( Mansoor ali khan Pataudi ) खूप लहरी होता, असे त्याचे सहकारी खेळाडू सांगतात. त्याच्या नबाबी कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे संघ सहकाऱ्यांना त्याचा दरारा वाटे. सोलकर त्याला ‘सर’ म्हणत असे. त्याच्याशी संवाद साधणे सहजशक्य नव्हते. 

सलीम दुराणीला १९६२ च्या विंडीज दौऱ्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायची होती, पण ती इच्छा त्याने बापू नाडकरणीमार्फत कर्णधारापर्यंत पोहोचवली. तो थेट बोलू शकला नाही. पतौडी फलंदाजांचे क्रम वाटेल तसे बदलायचा. आश्चर्य वाटेल पण फारूक इंजिनियर, बुधी कुंदरन हे एरवी सलामीला खेळलेले यष्टीरक्षक चक्क ११ व्या क्रमांकावर सुद्धा खेळले आहेत. रुसी सुरतीने तर सलामीपासून दहाव्या क्रमांकापर्यंत कुठेही फलंदाजी केली आहे.

अशोक मंकडला मधल्या फळीऐवजी सलामीला खेळवण्याचा निर्णय पतौडीचाच. इतके सगळे असूनही प्रसन्न, बेदी यासारख्या दिग्गजांबरोबरच करसन घावरी सारखा त्यावेळचा नवोदित खेळाडू सुद्धा पतौडीच्या नेतृत्वगुणांना नावाजतो. पतौडीचे कव्हर्स मधले क्षेत्ररक्षण बघण्यासारखे होते.’एकाक्ष’ असूनही तो यष्ट्यांवर अचूक फेक करायचा आणि धावत जाऊन झेलही पकडायचा.

हे देखील वाचा: रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja): एक शांत योद्धा!

निवृत्तीनंतर तो एक उत्तम समालोचक बनला. त्याचे समालोचन मार्मिक व वस्तुनिष्ठ असे. १९७९ च्या पाकिस्तान विरुद्ध मुंबईतील सामन्यात गावस्कर कट मारताना बॅकवर्ड पॉइंटला झेल देऊन बाद झाला. पतौडीच्या सहकारी समालोचकाने या फटक्यावर टीका केली, पण पतौडीने आखूड टप्प्याच्या चेंडूवर कट मारणेच योग्य होते असे ठामपणे सांगितले. चेंडू अधिक उडाल्याने गावस्करचा अंदाज चुकला असे विश्लेषण त्याने केले.

हे ही वाचा: अजित आगरकर(Ajit Agarkar): पूर्ण न उमललेले फुल

बिगबॉस विशाल निकमचा व्यवस्थापक बनण्याची शिवसेना युवा नेत्याची मागणी

पतौडीने प्रसिद्ध नटी शर्मिला टागोरबरोबर निक्काह केला, पण तो फिल्मी झगमगाटापासून दूर राहिला. त्याचे ऑक्सफर्डचे इंग्लिश ऐकून शर्मिला त्याला ‘प्रोफेसर’ म्हणत असे. पतौडीने १९७१ साली गुरगाव मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती पण त्यामध्ये त्याला हार पत्करावी लागली. 

आपण नेहमी म्हणतो की जखमी वाघ हा भक्ष्यावर तेवढ्याच त्वेषाने झडप घालतो. तशाच त्वेषाने मन्सूर अली खान पतौडी (Mansoor ali khan Pataudi) उर्फ नवाब ऑफ पतौडी हा केवळ एका डोळ्याच्या साहाय्याने चेंडूवर तुटून पडत असे आणि म्हणूनच तो भारतीय क्रिकेटचा ‘टायगर’ म्हणून अजरामर झाला. त्याच्या स्मृतीला वंदन.

– रघुनंदन भागवत


Share

Related Articles

1 comment

History of The ashes (दी ॲशेस) January 10, 2022 - 2:30 pm

[…] भारताचे पण इंग्लंडकडून खेळलेले नवाब ऑफ पतौडीसुद्धा होते. पहिल्या सामन्यात […]

Reply

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.