Home » जरांगेंचा दलित-मुस्लिम एकीचा प्रयोग थांबला ?

जरांगेंचा दलित-मुस्लिम एकीचा प्रयोग थांबला ?

by Team Gajawaja
0 comment
Manoj Jarange Patil
Share

मराठा आरक्षणामुळे प्रकाशझोतात आलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले होतं. परंतु आता ते आगामी विधानसभा निवडणूक लढणार नसल्याच त्यांनी जाहीर केलं आहे, सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाही, असे जरांगे यांनी म्हटलं आहे. मराठा-दलित-मुस्लिम यांना एकत्र करून काही ठिकाणी जरांगे यांनी उमेदवार दिले होते. अगोदरच पक्षांची गर्दी झालेल्या राज्याच्या राजकारणात त्यांच्या या घोषणेमुळे आणखी एक कोन जोडला जाईल, असे आडाखे बांधले जात होते. परंतु मागील इतिहास पाहता त्यांची ही राजकीय उडी आत्मघाती ठरेल, असाच अंदाज होता. दलित-मुस्लिम एकी हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक जुना खेळ आहे. तो पुन्हा खेळून त्यांच्या वाट्याला फजितीच होणार होती. कारण दलित-मुस्लिम एकीचा तसा इतिहासच आहे. काय आहे हा इतिहास जाणून घेऊया. (Manoj Jarange Patil)

महाराष्ट्रातील दलित-मुस्लिम एकीच्या प्रयत्नांना सुमारे चार दशकांचा इतिहास आहे. मुंबईच्या पहिल्या काही डॉनपैकी एक असलेल्या हाजी मस्तानसारख्यांनीही हा प्रयत्न केला होता. भिवंडी येथे 1984 मध्ये झालेल्या दंगलीनंतर हाजी मस्तान मिर्झा आणि दलित नेते जोगेंद्र कवाडे यांनी ‘दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ’ नावाचा पक्ष काढला होता. देशाच्या राजकीय इतिहासातील तो एक अभिनव प्रयोग होता. गुन्हेगारी विश्वाचा डॉन असलेला हाजी मस्तान त्या सावलीतून बाहेर पडू पाहत होता. त्यासाठी राजकारणाचे क्षेत्र त्याला उत्तम वाटले असल्यास नवल नाही. पुढे अरूण गवळीने त्याचे अनुकरण केलं. राजकारणात येण्यासाठी मस्तानने तस्करी सोडली होती आणि हज यात्राही केली होती. दुसरीकडे औरंगाबाद आताचं छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर करावे, या मागणीसाठी मोर्चा काढून कवाडे हे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यामुळे कवाडे हे दलित मुस्लिम सुरक्षा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष झाले तर मस्तान सहसंस्थापक झाला. (Political News)

काँग्रेसवर नाराज असलेले आणि शिवसेनेच्या वाढत्या प्रभावामुळे बिचकलेले मुस्लिम मतदार मस्तानकडे एक सुधारित डॉन म्हणून पाहत होते. बाळासाहेब यांच्या आक्रमक धोरणाला तोच प्रत्युत्तर देऊ शकतो, असे त्यांना वाटत होते. मुंबई आणि उपनगरात मुस्लिम आणि दलितांची एक मतपेढी तयार व्हावी, हे या महासंघाचे उद्दिष्ट होते. डोंगरी, नागपाडा, भायखळा, धारावी आणि सायन या विधानसभा मतदारसंघात मुस्लिम व दलित मतदार बहुसंख्य होते. राज्याच्या लोकसंख्येत 7% दलित आणि 11% मुस्लिम आहेत, त्यातील बहुतांश शहरी भागात आहेत. शिवाय तत्कालीन काँग्रेस किंवा डाव्या पक्षांमध्ये या दोन्ही समुदायाचा कोणी मोठा नेता नव्हता. त्यामुळे कागदावर ही युती मजबूत वाटत होती. परंतु काँग्रेस-विरुद्ध-सेना हा संघर्ष वाढत गेला व त्याला ध्रुवीकरणाचे स्वरूप आले. नंतर त्यात सेनेच्या जोडीला भाजप आला व ही युती बळकट झाली. (Manoj Jarange Patil)

तेव्हा अल्पसंख्याक सत्ताधारी काँग्रेस पक्षासोबत गेले आणि हा महासंघ तोंडावर आपटला. मस्तानचा मृत्यू 1994 मध्ये झाला आणि दलित-मुस्लिम एकीचा हा पहिला प्रयोग आटोपला. यानंतर माजी पोलिस अधिकारी समशेर खान पठाण आणि दलित नेते बबन कांबळे यांनी मे 2012 अवामी विकास पार्टी सुरू करून पुन्हा त्याला चालना दिली. मात्र त्यांनाही अपयश आले. शेवटी या समाजाला राजकीय जाणीव नाही आणि जे राजकीय पक्ष त्यांना व्होट बँक म्हणून वापरून घेतात, त्यांचेच त्यांना गुलाम राहायचे आहे,” असे उद्वेगजनक उद्गार पठाण यांनी काढले. त्यानंतर दलित-मुस्लिम एकीचा एक प्रयोग मुस्लिमांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन म्हणजे एमआयएम याच पक्षाने केला होता. आंध्र प्रदेशातील मुस्लिमांचा पक्ष म्हणून ओळखला जाणाऱ्या एमआयएमने 2010 मध्ये 9 नगरसेवकांसह नांदेड महापालिका निवडणुकीत दमदार एन्ट्री केली. आता भाजपमध्ये असलेले खासदार व तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात ही अनपेक्षित घटना घडली होती. त्यानंतर काही काळ हा पक्ष वाढत गेला. राज्यात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे दोन आमदार निवडून आले, तर अनेक ठिकाणी पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या पराभवात त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे मानलं गेलं. (Political News)

याच एमआयएमने 2015 मध्ये पार पडलेल्या औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत आणखी एक धक्का दिला. तिथे पक्षाने 54 पैकी 12 दलित उमेदवारांना तिकीट दिलं होतं आणि त्यातील सहा उमेदवारांचा विजय झाला होता. शिवाय एक ओबीसी उमेदवारही एमआयएमतर्फे निवडून आला होता. पक्षाने एकूण 26 जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर होती. तेव्हा मुख्यतः धर्मनिरपेक्ष म्हणल्या जाणाऱ्या पक्षांच्या पायाखालची वाळूच सरकली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीचा हक्काचा मतदार असलेल्या मुस्लिमांसोबतच दलितही या पक्षामागे जातात की काय, अशी चिंता त्यांना लागली होती. त्यामुळेच एमआयएमला रोखायचे कसे, हीच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची चिंता होती. एमआयएम ही भाजपची टीम-बी आहे, हा असा धोषा काँग्रेसने तेव्हा लावला होता. (Manoj Jarange Patil)

या धोरणामुळेच की काय पण प्रकाश आंबेडकर यांनीही गेल्या निवडणुकीत एमआयएमशी जवळीक केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप विजय मिळविणार असेच वातावरण होते. भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याचे प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केले होते. आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीलासुद्धा आपल्या सोबत घेण्याचे प्रयत्न त्यावेळी काँग्रेसने चालवले होते. मात्र आंबेडकरांनी तेव्हा एमआयएमशी युती करून लोकसभेच्या निवडणुका एकत्र लढविल्या. दलित-मुस्लिम एकीच्या या राजकीय युतीला राज्यात 7.64 टक्के मिळाली होती. या युतीच्या एकमेव उमेदवाराला, इम्तियाज जलील यांना, औरंगाबाद येथे विजय मिळाला होता, परंतु या युतीमुळे राज्यात किमान नऊ ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचे विश्लेषण त्यावेळी करण्यात आलं होतं. (Political News)

अवघ्या सहा महिन्यांच्या आत विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र या दोन पक्षांची युती होऊ शकली नाही, कारण जागा वाटपावरून त्यांच्यात बेबनाव निर्माण झाला होता. जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी आंबेडकर यांनी ओवेसी यांना फोन करावा, असा सल्ला इम्तियाज झालेली यांनी दिला होता तो अर्थातच आंबेडकर यांनी मानला नाही. त्यावरून हे दोन्ही पक्ष वेगळे लढले आणि दोन्ही पक्षांना अपयश आले. त्यावेळी आंबेडकर यांच्या पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही, तर त्या पक्षाला केवळ 6.92 टक्के मते मिळाली. एमआयएमचा केवळ एक आमदार निवडून आला. दलित मुस्लिम एकीचा प्रयोग आता जरांगे पाटील यांनी करायला घेतला होता. जिथे दलित आणि मुस्लिम हे दोन वर्ग एकत्र येऊन राजकीय शक्ती उभारू शकले नाहीत, तिथे सर्व पक्षांमध्ये विखुरलेल्या मराठा समाजाला एकत्र आणून वेगळी राजकीय शक्ती निर्माण करणे हे अत्यंत आव्हानाचे काम आहे. कारण पुन्हा एमआयएम मैदानात उतरणार आहे आणि ती गेल्या वेळेस प्रमाणेच दलितांना साद घालणार आहे. याशिवाय प्रकाश आंबेडकर हेसुद्धा मुस्लिमांकडे मते मागणार आहेत. (Manoj Jarange Patil)

======

हे देखील वाचा :  महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार

====

ओबीसी महासंघ आणि एकलव्य आदिवासी संघटना यांच्याशी त्यांनी युती केली आहे. एमआयएमसारख्या एखाद्या संघटनेऐवजी आम्ही मुस्लिमांशी थेट संपर्क ठेवला आहे, असे त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नुकतेच म्हटले आहे. आंबेडकर यांनी 20 मुस्लिमांना उमेदवारी दिली असून गेल्या 70 वर्षांमध्ये कोणत्याही पक्षाने दिलेल्या मुस्लिम उमेदवारांची ही सर्वात मोठी संख्या आहे. वर म्हटल्याप्रमाणे दलित आणि मुस्लिमांचे ध्रुवीकरण झाले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मते कमी होतात हा इतिहास आहे. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवली असती आणि जर ते यशस्वी झाले असते, तर त्यामुळे महाविकास आघाडीला मिळणारी मतसंख्या कमी झाली असती. पण आता त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्याशिवाय “ आता कोणाला पडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा,” असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे आता या भूमिकेचा परिणाम महायुतीला होईल की महाविकास आघाडीला हे येत्या काही दिवसांत कळेलच. (Political News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.