फाडफाड कोकाटे हे महाराष्ट्रात एकेकाळी खूप गाजलेले नाव डॉ. महादेव कोकाटे यांनी स्वत: तयार केलेल्या पद्धतीने ते लोकांना इंग्रजीत फाडफाड बोलायला शिकवत असत. त्यामुळे फाडफाड कोकाटे इंग्लिश अशी त्यांची ओळख झाली. अनेक राजकीय नेते, मोठमोठे अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी इंग्रजी बोलायला शिकविले. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कालपर्यंत कृषिमंत्री असलेले माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी वेगळ्याच प्रकारे फाडफाड तंत्र राबविले. अनेक वेळा नको ते बोलून व नको ते करून त्यांनी सरकारला अडचणीत आणले.
माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि कृतींमुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तर अडचण झालीच, शिवाय सरकारच्या प्रतिमेलाही धक्का बसला. त्यांच्या या वागणुकीमुळे त्यांना एक खाते गमवायला लागले आहे आणि त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरी त्यांच्या एकूण वाटचालीकडे पाहिले तर जीवावर बेतले ते शेपटावर निभावले असेच म्हणावे लागेल. आता त्यांना कृषी खात्यातून हटवून क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) कृषी खाते सांभाळत होते. दोन आठवड्यांपूर्वी भर अधिवेशनात विधान परिषदेत मोबाईलवर ‘रम्मी’ खेळताना आढळले. ते त्यांच्या नावावरचा हा सर्वात ताजा वाद ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी स्वतः हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. “राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत, आणि कृषीमंत्री अधिवेशनात मोबाईल गेम खेळत आहेत,” अशा शब्दांत त्यांनी सरकारला धारेवर धरले. हा व्हिडिओ लगेच व्हायरल झाला आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. (Political News)
त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. राजू शेट्टीसारखे शेतकरी नेते आक्रमक झाले. कोकाटे यांनी या आरोपांचे खंडन केले. “सभागृहात नेमकं काय चाललं आहे, ते युट्यूबवर पाहण्यासाठी फोन सुरु केला होता. पण त्यावर कोणीतरी हा गेम डाऊनलोड केला होता, ती जाहिरात तो गेम स्कीप करत होतो, तेव्हा कोणीतरी तो व्हिडिओ काढला असेल. मी काय चोरी केलेली नाही किंवा शेतकऱ्याविरोधात भाष्य केले आहे किंवा अजून काही केलेले आहे, असे नाही. तुमच्याही मोबाईलवरही जाहिराती येतात.
युट्यूब सुरु केलं तर त्यावर तुम्हालाही जंगली रमीची जाहिरात येते. गाण्याच्या जाहिराती येतात. कोणत्याही प्रकारच्या जाहिराती येतात. अशाप्रकारच्या जाहिराती येणं हे अपरिहार्य आहे, ते रोहित पवारांच्या मोबाईलवर येत नाहीत का, त्यांच्याही मोबाईलवर येतात. पण कोणत्या गोष्टीचे भांडवल करावं, कोणत्या गोष्टीचे भांडवल करु नये, हे रोहित पवारांना कळायला हवं. उगाचच ते स्वत:ची करमणूक करुन घेतात”, असे माणिकराव कोकाटेंनी (Manikrao Kokate) म्हटले.
परंतु त्यांचा हा बचाव अत्यंत तकलादू होता. कोकाटे हे काही सेकंद नव्हे तर तब्बल आठ मिनिटे पत्ते खेळत होते, हे समोर आले. कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आग्रही होते. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. परंतु कोकाटे यांना लगेचच पदावरून काढले तर रोहित पवार यांना महत्त्व मिळेल, म्हणून अजित पवार यांनी तडकाफडकी कारवाई केली नाही. (Political News)
मात्र अजित पवार यांना राजकीय दृष्ट्याही हे प्रकरण जड जात होते. कोकाटे यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जाब विचारायला गेले. तेथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचे प्रकरण घडले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर तटकरे यांना अज्ञात व्यक्तींनी धमकीचे फोन येत असल्याची माहिती स्वतः तटकरेंनी पत्रकारांना दिली होती. या प्रकरणात सूरज चव्हाण यांना अखेर पोलिसांसमोर शरण यावे लागले.
===================
हे देखील वाचा : Donald Trump : ट्रम्प लवकरच बराक ओबामांना अटक करणार?
===================
त्यामुळे कोकाटेंवर कारवाई होणे अटळ होते. ती कारवाई अखेर गुरुवारी करण्यात आली. कोकाटे यांना कृषी खात्यातून काढून क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि वक्फ विभागांची जबाबदारी देण्यात आली. त्या खात्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांना कृषीमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. सुदैवाने या अदलाबदलीबद्दल कोकाटे यांनी कुठलीही नाराजी व्यक्त केलेली नाही. दिलेल्या पदावर त्यांनी समाधान व्यक्त केले आहे, त्यामुळे आणखी एखादा वाद निर्माण होण्याची शक्यता मावळली आहे. ही सरकारच्या दृष्टीने त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब होय. तसे मंत्री माणिकराव कोकाटे आणि वादविवाद हातात हात घालूनच चालत आले आहेत. हे सरकार सत्तेवर आल्या आल्या एका प्रकरणात त्यांना शिक्षा झाली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या मुख्यमंत्री निवास कोट्याअंतर्गत दोन फ्लॅट्स मिळवण्यासाठी १९९५ मध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाने बनावट कागदपत्रे सादर केली, हा आरोप त्यांच्यावर होता. (Manikrao Kokate)
या प्रकरणात, या वर्षाच्या सुरूवातीलाच नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा आणि ५०,००० दंड ठोठावला. सध्या, त्यांनी या निर्णयाविरुद्ध अपील दाखल केले आहे आणि त्यांना जामीनही मिळाला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कमी किमतींसाठी तेच जबाबदार असल्याचे वक्तव्य कोकाटे यांनी केले होते. तसेच पीक विमा योजनेत भ्रष्टाचार असल्याचेही सूतोवाच केले होते. त्यांनी ‘लाडकी बहिण‘ योजनेवरही टीका केली आणि या योजनेमुळे सरकारच्या अर्थसंकल्पावर ताण येत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून सरकारला घेरण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली होती. (Political News)
अगदी हा रम्मीचा वाद गाजत असतानासुद्धा शेतकऱ्यांना द्यायला सरकारकडे एक रूपयासुद्धा नाही. त्यामुळे सरकारच ‘भिकारी’ आहे, असे वक्तव्य कोकाटे यांनी एका पत्रकार परिषदेत केले. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी ते ‘अयोग्य’ असल्याचे सांगत या विधानावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता जरी कोकाटे यांना पुन्हा मंत्रिपद मिळालं असलं तरी पुढच्या वेळी पक्षश्रेष्ठी त्यांचा विचार करतील की नाही, हाच मोठा प्रश्न आहे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics