भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यात जवळपास 36 चा आकडा आहे. ममता बॅनर्जी या पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अगदी काही दिवसांपूर्वी झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणीही त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर कडक शब्दात टीका केली होती. हे राजकारण वगळता ममता बॅनर्जी यांचे वेगळे रुप पाहायला मिळाले आहे. गेली 12 वर्ष ममता बॅनर्जी यांनी एक परंपरा जपली आहे. ही परंपरा आहे, आंब्यांच्या भेटीची. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सर्व कटूपणा विसरुन पश्चिम बंगालच्या सर्वोत्तम आंब्यांची भेट पंतप्रधान मोदी यांना पाठवली आहे. राजकीय मतभेद बाजुला सारत ममता बॅनर्जी दरवर्षी पश्चिम बंगालच्या प्रसिद्ध आंब्यांच्या काही पेट्या पंतप्रधानांना पाठवत असतात. यावर्षीही असाच आंबा पंतप्रधान निवासात दाखल झाला आहे.

गेल्या बारा वर्षापासून ही आंब्याची परंपरा चालू आहे. पश्चिम बंगाल हिमसागर, हिमगंगा सारखे आंबे जगप्रसिद्ध आहेत. मे महिन्याच्या अखेरीस हे आंबे बाजारात येतात. त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी या आणि आणखी काही बंगाली आंब्यांच्या पेट्या या पंतप्रधान निवासात पाठवल्या जातात. स्वतः ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदी यांच्या कितीही विरोधक म्हणून ओळखल्या जात असल्या तरी त्या दरवर्षी या आंब्याच्या भेटींमुळे ममता बॅनर्जी या पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर संवाद साधतात. एकूण यावरुन स्पष्ट होतं की, राजकारणात कितीही कटुता असली तरी वैयक्तिक संबंध हे चांगलेच असतात. आता या बंगाली आंब्याची माहिती घेऊया.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी हिमसागर, लक्ष्मणभोग आणि फजलीसह चार किलो आंब्याच्या विविध जाती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यी निवासस्थानी पाठवले आहेत. 7, लोककल्याण मार्ग, नवी दिल्ली या पंतप्रधानांच्या निवासस्थानी एका आकर्षक गिफ्ट बॉक्समधून हे आंबे पाठवण्यात आले. अशाच आंब्यांच्या पेट्या ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, भारताचे सरन्यायाधीश डिवाय चंद्रचूड यांनाही पाठवण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनाही आंब्याचे क्रेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. ममता बॅनर्जी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अशाच बंगाली आंब्यांची भेट देत असतात.
ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पंतप्रधानांना भेट दिलेल्या या आंब्यांमध्ये हिमसागर हा आंबा जगातील सर्व आंब्यांपेक्षा गोड आहे. त्यामुळेच हिमसागर आंब्याला आंब्याचा राजा देखील म्हणतात. हिमसागर आंबा दिसायला पिवळा आणि केशरी असतो. त्याचे वजन सुमारे 250 ग्रॅम ते 350 ग्रॅम पर्यंत असते. हिमसागर आंब्याचे उत्पादन भारतातील पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील राजशाही भागात केले जाते. हिमसागर आंब्याला त्याची उत्कृष्ट चव आणि सुगंधामुळे आंब्याचा राजा देखील म्हणतात. हिमसागर आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबरसारखे गुणधर्म असल्यामुळे पचनशक्ती मजबूत होते. यात व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांसाठीही हा आंबा फयदेशीर ठरतो. तसेच यात लोहाचे प्रमाणही जास्त असल्यामुळे शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत होते. मुख्य म्हणजे, हिमसागर आंब्यामध्ये अँटीकार्सिनोजेनिक गुणधर्म असतात ज्यामुळे कर्करोगापासून बचाव होतो.
=======
हे देखील वाचा : यूएफओची पृथ्वीवर नजर
=======
या आंब्यांमध्ये दुसरा आंबा आहे तो, लक्ष्मण भोग आंबा. या आंब्याचे मुख्य वैशिष्ट म्हणजे, हा गोड असला तरी त्यामुळे साखर वाढत नाही. यामुळे मधुमेह ज्यांना आहे, त्यांच्यासाठी हा आंबा वरदान ठरतो. याशिवाय हा आंबा जवळपास 15 ते 20 दिवस खराब होत नाही. हा आंबा पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मिळतो. याशिवाय या आंब्याची झाडे अन्य कुठेही आढळत नाहीत. त्यामुळेच या आंब्याची किंमत जास्त असते. या एका लक्ष्मण भोग आंब्याची किंमत 400 रुपये आहे. पंतप्रधान मोदी यांना पश्चिम बंगालचा फजली हा आंबाही पाठवण्यात आला आहे. या आंब्याला जीआय टॅग देखील मिळाला आहे. हा फजली आंबा पश्चिम बंगालच्या मालदा भागात तयार होतो. पिवळ्या रंगाचा फजली आंबा इतर आंब्यांपेक्षा आकाराने आणि वजनाने थोडा मोठा असतो. एक आंबा सुमारे 700 ते 1500 ग्रॅम असू शकतो. हा आंबा रसरसीत असल्यामुळे त्याचा वापर रस किंवा जेली बनवण्यासाठी अधिक होतो. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी हे प्रसिद्ध आंबे देशभरातील नेत्यांना पाठवले आहेत. त्यांच्या या मॅगो डिप्लोमसीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सई बने