केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बिहारमध्ये मखानाचे उत्पादन, विपणन आणि प्रक्रिया यांना प्रोत्साहन देण्यासाठी मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली. गेल्या काही वर्षापासून मखानाला आहारात मोठे महत्त्व आले आहे. पांढ-या रंगाचा हा सुका मेवा आता काजू-बदाम सारखाच महाग झाला आहे. भारतात मखानाचे सर्वाधिक उत्पादन बिहारमध्ये होते. मात्र हा मखाना तयार होईपर्यंतची प्रक्रिया अत्यंत अवघड आहे. बिहारमध्ये 40000 हेक्टरमध्ये मखानाची लागवड होते. (Bihar)
मखानाच्या बिया या पाण्याचा साठा असलेल्या भागात तयार होतात. चिखलातून या बिया काढून त्या योग्य तापमानात भाजणे आणि त्यानंतर त्या फोडून त्यातून पांढरे शुभ्र मखाना बाहेर काढणे ही सर्व प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. यामध्ये हजारो कामगार गुंतले आहेत. त्यात महिलांची संख्याही अधिक आहे. पण या कामगारांना योग्य मोबदला मिळत नाही. मखानाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मोठी आहे. त्यानुसार या मखान्याची निर्मिती झाली, तर भारतातून जगभरात या मखान्याचा पुरवठा होऊ शकतो. या सर्व शक्यता गृहित धरुन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली आहे. (International News)
बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन होणार, ही घोषणा झाल्यापासून या पांढ-या रंगाच्या सुक्या मेव्याला ख-याअर्थानं सोन्याचे दिवस झाले आहेत. मखानाचे उत्पादन बिहारमध्ये परंपरागत पद्धतीनं गेली अनेक वर्ष होत आहे. भारतात तयार होणा-या या सुक्या मेव्याचा वापर काही वर्षापूर्वी मर्यादित स्वरुपात होत असे. मात्र मखान्यातील गुणधर्म स्पष्ट झाल्यावर त्याचा वापर वाढला आहे. अनेक आहारतज्ञ मखान्याचा वापर आहारात करावा, असा सल्ला देत आहेत. त्यामुळे या पांढ-या सुका माव्याची किंमत वाढली आहे. पण असे असले तरी, मखाना निर्मितीमधील कामगारांना यातून अल्प मोबदला मिळत आहे. मखाना बोर्ड स्थापन झाल्यावर या कामगारांना योग्य प्रशिक्षण मिळणार असून त्यांना त्यांच्या कष्टाचाही योग्य मोबदला मिळण्याची आशा आहे. (Bihar)
मखान्याला पांढरा सुका मेवा म्हटले जाते, पण हा मखाना तयार कसा होतो, हे पाहिले तर यातील कामगारांचे कष्ट लक्षात येतात. प्रथम ज्या तलावात मखाने तयार केले जाणार आहेत, ते स्वच्छ करुन त्यात मखाना बिया टाकल्या जातात. काही महिन्यानंतर या बिया काढण्याची प्रक्रिया सुरु होते. त्यासाठी पाण्याच्यावर तरंगत असलेल्या मोठ्या पानांना बाजुला करणे, आणि चिखलात जाऊन बिया शोधणे हे मोठं कसबीचं काम आहे. त्यासाठी कमरेइतक्या पाण्यात उतरावे लागते. बिया काढल्यानंतर त्यांना स्वच्छ करुन वाळवले जाते. मग मखानाच्या बिया लोखंडी तव्यावर भाजल्या जातात. यासर्वात महिला कामगारांची संख्या मोठी आहे. या महिला, मोठ्या चुलीवर ठेवलेल्या तव्यावर या बिया साधारण दहा मिनिटे भाजतात. त्यानंतर या बिया फुटण्यास सुरुवात झाल्यावर लगेच या मखान्याच्या बिया फोडण्यास सुरुवात करावी लागते. यात काम करणा-या कामगारांना चटके सहन करावे लागतात. या सर्वातून तयार झालेले मखाने विकल्यावर या कामगारांच्या हाती मोजके पैसे रहातात. आता मखाना बोर्ड तयार झाल्यावर ही सर्व प्रक्रिया यांत्रिक करण्यासाठी प्रयत्न होईल, अशी अपेक्षा मखाना निर्मितीतील कामगार व्यक्त करीत आहेत. (International News)
भारतात सर्वाधिक मखान्याची निर्मिती बिहारमध्ये होते. त्यापाठोपाठ मखाना मणिपूरमध्ये तयार होतो. अलिकडच्या काळात मखान्याला मोठी मागणी आल्यामुळे या दोन्हीही राज्यात मखान्याच्या शेतीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दहा वर्षापासून मखाना बोर्डाची या राज्यात मागणी होत आहे. मखानाचे उत्पादन, विपणन आणि प्रक्रिया यांना प्रोत्साहन देण्यासाठी मखाना बोर्ड फायदेशीर ठरणार आहे. बिहारमधील 8 जिल्ह्यांना मखाना बोर्डाचा फायदा होणार आहे. यात दरभंगा, सुपौल, मधुबनी, सहरसा, पूर्णिया, कटिहार, अररिया आणि किशनगंज या जिल्ह्यांचा समावेश आहे. शिवाय मणिपूरसह उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांनाही मखाना बोर्डाचा फायदा होणार आहे. भारतामधून 80 टक्के मखान्याची निर्यात परदेशात होते. (Bihar)
==============
हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट
Raina And Rainagar : अरे….स्टेशन का नाम क्या है…?
===============
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जपान आणि इंग्लंडसारख्या देशांमध्ये दरवर्षी सुमारे 2 लाख टन मखाना निर्यात केला जातो. विशेष म्हणजे, भारतीय मखान्याला यापेक्षा अधिक मागणी परदेशातून आहे. पण तेवढी निर्मिती होत नाही. मखाना बोर्ड झाल्यावर, मखाना निर्मितीमध्ये अधिक सुधारणा होत, मखान्याची शेती वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच यात असलेल्या कामगारांना यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. फॉक्स नट्स किंवा कमळाच्या बिया म्हणूनही ओळखले जाणारे मखाना हे प्रथिने आणि कॅल्शियमनी समृद्ध मानले जातात. शिवाय फायबर आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या मखान्याचा आहारात समावेश करण्याचा सल्ला अनेक आहारतज्ञ देत आहेत. त्यामुळेच मखान्याची किंमत वाढली आहे. त्यामुळे या मखाना शेतीमध्ये अनेक तरुणांनी पुढे यावे यासाठी सरकार मखाना बोर्डच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. (International News)
सई बने