नवीन वर्षाची सुरुवात झाल्यावर येणारा पहिला सण म्हणजे, मकर संक्रात. मकर संक्रांत हा सण ज्या महिन्यात येतो, त्या जानेवारी महिन्यात थंडीचा प्रचंड कडाका असतो. ही कडाक्याची थंडी आरोग्याला घातकही ठरते. मात्र या थंडीमध्येही एक गोष्ट दिलासा देऊ शकते. ही गोष्ट अत्यंत छोटी आहे, पण त्यापासून मिळणारे फायदे खूप मोठे आहेत. आपल्याकडे मकरसंक्रात (Makar Sankrat) आल्यावर नेहमी बोलले जाते, तिळगुळ घ्या…गोड गोड बोला…अर्थातच ही छोटी गोष्ट म्हणजे तिळ आहे. तिळ आणि त्यासोबत गुळ या दोघांचेही सेवन या कडाक्याच्या थंडीत केल्यास आरोग्याला खूप फायदा होतो. अगदी केसांपासून ते नखापर्यंत, शरीराच्या प्रत्येक अंगाला या तिळाचा आणि गुळाचा फायदा होतो.

संक्रांतीचा (Makar Sankrat) सण ज्या ऋतूत येते, तो ऋतू म्हणजे शिशिर ऋतू. या ऋतुचे वैशिष्ट म्हणजे प्रचंड थंडी आणि सोबत थंडगार वारा. या सर्वाचा शरीराच्या आरोग्यावर परिणाम होतो. या सर्वात शरीराला गरम ठेवण्याची गरज असते. यासर्वात तिळ आणि गुळ यांचे सेवन केल्यास खूप फायदा होऊ शकतो. त्यामुळेच संक्रातीला (Makar Sankrat) तिळगुळ खाल्ले जातात. तिळाचा वापर या दिवसात मुबलक प्रमाणात केला जातो. अगदी संक्रांत येण्याआधी काही दिवसांपासून घराघरात अंघोळीच्या पाण्यापासून ते जेवणापर्यंत तीळाचा मुबलक प्रमाणात वापर केला जातो. आंघोळीच्या पाण्यात तिळ टाकले जातात, याबरोबरच अंगालाही तिळाचे तेल लावून मसाज केला जातो. शिवाय जेवतांना भाकरी आणि भाजीमध्येही तिळ वापरले जातात. काही ठिकाणी, जिथे कडाक्याची थंडी पडते, तिथे तर तिळ आणि गुळ यांचा वापर करुन खिरही केली जाते. हे सर्व करण्यामागे एकच उद्देश असतो, की यातून आपले आरोग्य साधले जाते. थंडीमध्ये जो त्रास होतो, तो नियमीत तिळाचे सेवन केल्यास कमी होतो. थंड वातावरणापासून शरीराचे रक्षण व्हावे यासाठी तीळ-गूळ खाल्ले जातात. तीळ उष्ण असल्याने थंडीमध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवतात. थंडीमध्ये दात दुखीची तक्रार अनेकांची असते, अशावेळी दातांच्या बळकटीसाठी तिळाचा चांगला वापर होतो. याशिवाय थंडीच्या दिवसात केसांमध्ये कोंडा होतो. केस कोरडे होतात.अनेकवेळा त्यामुळे केसांना खूप गळती लागते. अशावेळी तिळाचे तेल लावून केसांना मसाज केला तर त्याचा फायदा केसांना होतो.
थंडीच्या दिवसात लसूण, खोबरे घालून केलेली तिळाची चटणीही फायदेशीर ठरते. तीळ आणि खोबरे यांच्यात तेलाचे प्रमाण चांगले असते. यासोबत शेंगदाण्याचे कुटही वापरले जाते. या सर्वात असलेले तेल शरीरास फायदेशीर ठरते. तिळाचा सर्वात फायदा होतो, तो आपल्या त्वचेला. या हिवाळ्यात सुटणा-या गार वा-यामुळे त्वचा कोरडी पडते. ही कोरडी त्वचा मुलायम करण्यासाठी तिळाचे तेल हा सर्वात भरवशाचा उपाय आहे. ज्यांच्या आहारात तिळाचे प्रमाण असते, त्यांची त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण कमी असते. अगदी जेवण झाल्यावर अर्धा चमचा तीळ खाऊन त्यावर कोमट पाणी प्यायल्यास थंडीचा त्रास कमी होऊन शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते.(Makar Sankrat)
थंडीच्या दिवसात अनेक वयोवृद्धांना सांधेदुखीचा त्रास जाणवतो. त्यांनी तिळाचे तेल थोडं गरम करुन त्याचा मसाज दुखणा-या सांध्यांना लावल्यास आराम पडतो. अनेक ठिकाणी बाळंतिणीला तिळाच्या तेलानं मसाज करण्यात येतो. त्यामागे तिच्या हाडांची झालेली झिज लवकर भरुन यावी हाच उद्देश असतो. मूळव्याधीचा त्रास जाणवत असेल तर खडीसाखर आणि तीळ सेवन केल्यास चांगला परिणाम होतो. आकारानं लहान असलेल्या तिळामध्ये अनेक फायदे लपलेले आहेत. ह्दयरोग आणि मधुमेहामध्येही तिळाचा चांगला फायदा होता. बद्धकोष्ठता आणि पचनाबाबतच्या समस्या असल्यासही तिळाचा फायदा होतो.अनेकांना लठ्ठपणाचा त्रास जाणवतो. हा लठ्ठपणा कमी करण्यासाठीही तिळाचे सेवन फायदेशीर ठरते. रक्तातील वाढलेले कोलेस्ट्रॉलचे आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाण कमी करण्यासाठीही तिळाचा फायदा होतो. अनेकांना रक्तदाबाचा त्रास जाणवतो. थंडीमध्ये ह्दयविकाराचा झटका येण्याचे प्रमाणही वाढते. अशावेळीही हे तिळ मदतीस येतात. याशिवाय नियमीत तिळाचे सेवन केल्यास शरीराला व्हिटॅमीन बी चा पुरवठा योग्य प्रमाणात होतो.
======
हे देखील वाचा : महिला नागा साध्वींचे ‘असे’ असते आयुष्य
======
तिळाप्रमाणेच गुळही गुणकारी आहे. गूळ अतिशय आरोग्यदायी असल्याने रोजच्या आहारत त्याचा समावेश करायला हवा. भरपूर श्रम केल्यानंतर खूप थकवा येतो. अशावेळी गुळाचे पाणी गुणकारी ठरते. कफ, सर्दी झाल्यास अशा वेळी सुंठ, गूळ आणि तूप यांचे चाटण किंवा गोळी रोज खाल्ल्यास चांगला फायदा होतो. एकूण आपले भारतीय सण आणि त्यावेळी होणारे विशिष्ट पदार्थ हे आरोग्यदायी असतात. थंडीमध्ये येणारी मकर संक्रातही अशीच आहे. यावेळी तिळ आणि गुळाचे सेवन केल्यास त्याचा शरीराला चांगल्याप्रकारे फायदा होऊ शकतो.
सई बने