1947 चा ऑक्टोबर महिना. काश्मीरमधलं श्रीनगर अंधारात बुडालं होतं. दोन महिन्यांपूर्वी भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश बनले होते आणि काश्मीर हा तो पर्यंत भारताचा भाग बनलं नव्हतं. त्यावेळी काश्मीरचे राजा हरीसिंग यांना स्वतंत्र देश बनवायचं होतं. कारण त्यांना कायम राजा म्हणून राज्य करायचं होतं. पण त्यांना ही माहिती होतं की त्यांचं स्वप्नं कधीच पूर्ण होणार नाही. आणि पाकिस्तानचा काश्मीरवर डोळा होताच, काश्मीर ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानने हाजारो आदिवासींची एक फौज, ज्यांना ‘कबायली’ म्हटले जात होतं, त्यांना काश्मीरवर हल्ला करण्यासाठी पाठवलं. कबायलींनी आणि रूप बदललेल्या पाकिस्तानी सैनिकांनी मुहरा पावर स्टेशन उडवलं, आणि सगळं शहर अंधारात गेलं. श्रीनगरपासून फक्त 50 मैलांवर हे कबायली पोहोचले होते. आणि त्यांच्या टार्गेटवर होतं श्रीनगरचं एअरपोर्ट, जे भारत आणि कश्मीरचं एकमेव कनेक्शन होतं. अशा भयंकर सिच्युएशनमध्ये काश्मीरला वाचवण्यासाठी भारतीय सेना तयार होती. एक 24 वर्षांचा मेजर, हाताला प्लास्टर लावलेला, आपल्या 100 जवानांसोबत बडगामच्या रणांगणावर उतरला होता. त्याचं नाव होतं मेजर सोमनाथ शर्मा. त्यांचा हात जखमी होता पण त्यांच्यामुळेच काश्मीर पाकिस्तानच्या जबड्यात जाता जाता राहिलं, कोण होते सोमनाथ शर्मा? त्यांच्याबद्दलच जाणून घेऊ. (Major Somnath Sharma)
साल 1923, हिमाचल प्रदेशातल्या कांगडा जिल्ह्यात आर्मी मेडिकल सर्व्हिसेस डायरेक्टर जनरल ए.एन. शर्मा यांच्या घरी एक मुलगा जन्मला, नाव सोमनाथ शर्मा. वडील सैन्यात असल्यामुळे त्यांना बराच काळ घराबाहेर राहावं लागायचं. त्यामुळे सोमनाथ यांचं बालपण त्यांच्या आजोबा पंडित दौलत राम यांच्यासोबत गेलं. आजोबा त्यांना गीतेचे श्लोक शिकवायचे, त्याचा अर्थ समजावायचे. त्यामुळे लहानपणापासूनच सोमनाथ यांच्या मनात देशभक्ती आणि शौर्याची बीजं रुजली होती. वयाच्या 10 व्या वर्षी त्यांना देहरादूनच्या रॉयल मिलिट्री कॉलेजमध्ये टाकलं गेलं. त्यानंतर त्यांनी रॉयल मिलिट्री अॅकॅडमी जॉइन केली, जिथून ते लेफ्टनंट बनून बाहेर पडले आणि ८/१९ हैदराबाद इन्फंट्री रेजिमेंटमध्ये कमिशन झाले.(Top Stories)
त्यांचे मामा कृष्ण दत्त वासुदेव याच रेजिमेंटमध्ये होते. दुसऱ्या महायुद्धात जपानविरुद्ध लढताना ते शहीद झाले. त्यांच्या शौर्यामुळे रेजिमेंटमधील हजारो जवानांचा जीव वाचला होता. त्यामुळे रेजिमेंटमध्ये त्यांचं नाव गाजलं होतं. सोमनाथ यांनीही आपल्या मामाच्या पावलांवर पाऊल ठेवलं. दुसऱ्या महायुद्धात बर्मा येथे झालेल्या युद्धात भाग घेतला. तिथे त्यांना लीड करत होते के.एस. थिमय्या, जे पुढे भारताचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ बनले. (Major Somnath Sharma)
बर्मामधला सोमनाथ शर्मा यांचा किस्सा असा की, सोमनाथ यांचा साथीदार युद्धात गंभीर जखमी झाला. त्याला चालणं शक्य नव्हतं. पण सोमनाथ यांच्या कंपनीला कॅम्पकडे परतण्याचे आदेश होते. पण सोमनाथने आपल्या जखमी साथीदाराला खांद्यावर उचललं आणि ते कॅम्पकडे निघाले. कर्नल थिमय्या यांना कळलं की त्यांचा एक ऑफिसर मागे राहिलाय, तेव्हा ते म्हणाले, “शर्मा, त्याला तिथेच सोड आणि पुढे जा.” पण सोमनाथ म्हणाले, “सर, हा माझा साथीदार आहे, मी त्याला मागे सोडून जाऊ शकत नाही.” सोमनाथ त्याला खांद्यावर उचलून कित्येक किलोमीटर चालत राहिले आणि कॅम्पपर्यंत पोहोचवून त्याचा जीव वाचवला. त्यांच्या या धाडसामुळे त्यांना ‘मेंशन इन डिस्पॅच’ हा सन्मान मिळाला.(Top Stories)
आता परत येऊया 1947 ला. 25 ऑक्टोबरला महाराजा हरी सिंह यांनी काश्मीरला भारताचा भाग बनवण्यासाठी विलय पत्रावर सही केली, आणि भारताने कश्मीरला वाचवण्यासाठी सैन्य पाठवायचं ठरवलं. ४ कुमाऊंला श्रीनगरला जाण्याचा आदेश मिळाला, तेव्हा मेजर सोमनाथ शर्मा यांच्या हाताला प्लास्टर होतं. तरीही ते हट्ट करून श्रीनगरला पोहोचले आणि आपल्या टीमचं नेतृत्व केलं. श्रीनगरला जाण्यापूर्वीच्या शेवटच्या रात्री त्यांनी दिल्लीत मेजर के. के. तिवारी यांच्यासोबत घालवली. तिवारी आणि ते आतापर्यंत सगळ्या लढायांमध्ये एकत्र लढले होते. पण यावेळी मेजर सोमनाथ यांना एकट्याने जायचं होतं. त्यांनी तिवारींना सांगितलं की त्यांना त्यांची एक आठवण घेऊन जायचीय. (Major Somnath Sharma)
तिवारी म्हणाले, “खोलीत जे काही आहे, ते घेऊन जा.” मेजर सोमनाथ उठले, खोलीतल्या कपाटाकडे पाहिलं आणि त्यात ठेवलेली एक पिस्तूल उचलली. ती एक जर्मन बनावटीची पिस्तूल होती, जी मेजर तिवारींना खूप आवडायची. तरीही त्यांनी ती मेजर सोमनाथ यांना घेऊन जाऊ दिली. जेव्हा मेजर सोमनाथ श्रीनगरला उतरले, तेव्हा काश्मीरमधली परिस्थिती भयंकर होती. कबायलींनी आणि पाकिस्तानी सैनिकांनी मुजफ्फराबाद, उरी, महुरा असा सगळा परिसर उद्ध्वस्त केला होता. मेजर सोमनाथ शर्मा तेव्हा 4 कुमाऊं रेजिमेंटच्या डेल्टा कंपनीचं नेतृत्व करत होते. पण त्यांच्या हाताला प्लास्टर होतं. त्यामुळे त्यांना श्रीनगर एअरपोर्टच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली. पण सोमनाथ यांना हे मान्य नव्हतं. ते म्हणायचे, “मला रणांगणावर लढायचं आहे.” त्यांच्या मित्राने, मेजर एस.के. सिन्हा यांनी, त्यांना समजावलं की, “एअरपोर्टचं संरक्षण खूप महत्त्वाचं आहे. हेच भारत-कश्मीरचं कनेक्शन आहे.” पण सोमनाथ यांचं मन रणांगणावरच होतं.
3 नोव्हेंबर 1947. कबायली बडगामला पोहोचले, जे श्रीनगर एअरपोर्टपासून फक्त काही मैलांवर होतं. ब्रिगेडियर प्रोतिप सेन यांनी मेजर शर्मा यांच्या नेतृत्वाखाली १०० जवानांना बडगामला पाठवलं. दुपारी अडीच वाजता बडगामच्या गावात ७०० कबिल्यांनी हल्ला केला. मेजर शर्मांना माहिती होतं की हा शेवटचा मोर्चा आहे. जर त्यांनी इथे कबिल्यांना थांबवलं नाही, तर ते श्रीनगर एअरपोर्टपर्यंत पोहोचतील, आणि मग भारताच्या हातातून काश्मीर जाईल. सोमनाथ यांच्या फौजेत आणि कबायलींमध्ये ७ पटींचा फरक होता. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी ब्रिगेडियर सेन यांना रेडिओवर मेसेज पाठवला, “दुश्मन फक्त 50 गजांवर आहे. आमची संख्या कमी आहे. पण आम्ही एक इंचही मागे हटणार नाही. आम्ही शेवटचा सैनिक आणि शेवटचा श्वास असेपर्यंत लढू.” (Major Somnath Sharma)
================
हे देखील वाचा : Sukhdev History : सुखदेव यांनी स्वतःच्या हातावर अॅसिड टाकलं आणि…
================
हाताला प्लास्टर असतानाही सोमनाथ हे स्वतः मॅगझिन रिलोड करत होते, जेणेकरून त्यांच्या फायरपॉवरमध्ये कमी पडू नये. 4 कुमाऊंच्या जवानांनी 6 तास कबायलींना थोपवून धरलं. या लढाईत त्यांनी 200 हून अधिक कबायलींना ठार केलं. पण यात अनेक जवान शहीद झाले. ६ तासांनंतर जेव्हा मदत पोहोचली, तेव्हा मेजर सोमनाथ शर्मा यांनीही आपले प्राण सोडले होते. एक मोर्टार शेल लागल्याने त्यांचा शरीराचे तुकडे झाले. तीन दिवसांनंतर त्यांच्या शरीराचे अवशेष सापडले, तेव्हा त्यांची ओळख त्याच जर्मन पिस्तौलच्या होल्स्टरवरून झाली, जी त्यांनी त्यांचा मित्र मेजर तिवारींकडून घेतली होती. त्यांच्या युनिफॉर्मच्या खिशात गीतेची काही पानंही सापडली, जी ते नेहमी सोबत ठेवायचे. (Top Stories)
या शौर्यासाठी मेजर सोमनाथ शर्मांना भारताचा पहिलं परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं. त्याच्या आधीपर्यंत शूर सैनिकांना विक्टोरिया क्रॉस दिलं जायचं. म्हणूनच श्रीनगरला जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या मित्राला सांगितलं होतं, “एकतर मी मरून विक्टोरिया क्रॉस मिळवेन, नाहीतर आर्मी चीफ बनून दाखवेन.” योगायोग म्हणजे, त्यांचे धाकटे भाऊ व्ही.एन. शर्मा पुढे 1988 मध्ये आर्मी चीफ झाले. मेजर सोमनाथ शर्मा यांच्या या बलिदानाची आणि शौर्याची गाथा अनेकांना माहिती नाही काश्मीरला पाकिस्तानच्या हातात जण्यापासून वाचवणाऱ्या या वीर सैनिकांची गोष्ट प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवी, एवढंच…
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics