Home » केवळ भारतीय असल्यामुळे नाही, तर या कारणांमुळे झाला ऋषी सुनक यांचा पराभव 

केवळ भारतीय असल्यामुळे नाही, तर या कारणांमुळे झाला ऋषी सुनक यांचा पराभव 

by Team Gajawaja
0 comment
Rishi Sunak
Share

ब्रिटनच्या 56 व्या पंतप्रधान म्हणून लिझ ट्रस यांना राणी एलिझाबेथ यांनी शपथ दिली. या शपथविधीनंतर ऋषी सुनक यांच्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर विराजमान होण्याच्या स्वप्नावर पाणी पडले. हा शपथविधी सर्वार्थांनं विशेष ठरलाय कारण ब्रिटनच्या पंतप्रधानांचा शपथविधी लंडनमधील बकिंमहॅम पॅलेसमध्ये होतो मात्र राणी एलिझाबेथ यांच्या प्रकृतीमुळे स्कॉकलंड बालमोरल कॅसलमध्ये अत्यंत साध्या समारंभात लिझ ट्रस यांचा शपथविधी आणि किसिंग हॅडस हा समारंभ झाला.  (Why Rishi Sunak lost the UK Prime Minister election)

राणीबरोबर शेकहॅड केलेल्या लिझ या शेवटच्या व्यक्ती ठरल्या….त्यानंतर राणी एलिझाबेथ यांचा मृत्यू झाला. त्यामुळेच लिझ यांना मिळालेलं पंतप्रधानपद चर्चेत आलंय. 47 वर्षीय लिझ यांची ओळख ब्रिटनच्या राजकारणात फायरब्रॅड नेत्या म्हणून आहे. त्या राजकारणात आल्या त्याच राजेशाहीला विरोध करुन. मात्र लिझ या आपली धोरणं कायम बदलण्यासाठीही प्रसिद्ध आहेत,  त्यानुसारच राजेशाहीबद्दल त्यांची मतं नंतर बदलली. ऋषी सुनक यांच्यासारख्या प्रमुख उमेदवाराला हरवून ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर बसतानाही त्यांनी आपल्या धोरणात बदल केलाय.  

47 वर्षीय लिझ ट्रस यांनी ऋषी सुनक यांचा 20 हजार 927 मतांनी पराभव केला. अर्थात लिझ यांना 21 वर्षात सर्वात कमी पक्ष सदस्यांची मते मिळाली आहेत. 60% पेक्षा कमी मते मिळवणाऱ्या लिझ 2001 नंतरच्या पहिल्या ब्रिटिश पंतप्रधान आहेत. पक्षाच्या सदस्यांच्या मतांपैकी लिझला 57% मते मिळाली, तर सुनक यांना 42.6% मते मिळाली. लिझ या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. त्यांच्या आधी मार्गारेट थॅचर आणि थेरेसा मे यांनी हे पद भूषवले आहे. 

पंतप्रधान पदाच्या शर्यतीत लिझ खरंतर खूप शेवटी सहभागी झाल्या होत्या. पण पराभव हा शब्द त्यांच्या डायरीत नाही. अगदी शाळेतल्या निवडणुकीतही सर्वस्व झोकून देणाऱ्या लिझ अखेर ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर विराजमान झाल्या. माजी पंतप्रधान आणि ब्रिटनची आर्यन लेडी म्हणून ओळख असलेल्या मार्गारेट थॅचर या लिझ यांच्या आदर्श आहे. आता मार्गारेट थॅचर यांच्यासारखाच वचक लिझ आपल्या प्रशासनावर ठेवतात का, हे लवकरच समजणार असलं तरी आता ऋषी सुनक यांची काय भूमिका असेल याचीही उत्सुकता आहे. (Why Rishi Sunak lost the UK Prime Minister election)

याआधी लिझ यांची भूमिका जाणणेही महत्त्वाचे आहे. लिझ यांनी अगदी सुरुवातीच्या काळात, म्हणजे 1994 मध्ये राणी एलिझाबेथला उघड विरोध केला होता. त्याच राणीसमोर शपथ घेणाऱ्या लिझ या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या प्रशंसक आहेत. मार्गारेट थॅचर यांनीही राजेशाहीला विरोध केला होता, हे विशेष. 

लिझ या अगदी लहान वयापासून थॅचर यांच्या चाहत्या आहेत. 7 वर्षाच्या लिझनं शाळेत एका नाटकात मार्गारेट थॅचर यांची भूमिका केली होती. लिझ या प्रचंड शिस्तीच्या म्हणूनही ओळखल्या जातात. आणखी त्यांची एक ओळख म्हणजे, त्यांना पराभव हा शब्दही आवडत नाही. अगदी शाळेत किंवा भावंडासोबत खेळतांनाही त्यांनी कधीच पराभव स्विकारला नाही. त्यांच्या या जिद्दी स्वभामुळेच त्यांना ब्रिटनचे पंतप्रधानपद मिळाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. (Why Rishi Sunak lost the UK Prime Minister election)

लिझ यांची एन्ट्री होण्यापूर्वी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे सत्ताधारी कंझर्वेटिव्ह पक्षाच्या खासदारांची पहिली पसंती होते. मतदानाच्या पाचही फेऱ्यांमध्ये सुनक यांनी प्रत्येक वेळी मोठ्या फरकाने विजय मिळवला. एकूण 8 आठवडे निवडणूक प्रचार प्रक्रीया चालली होती. सुनक हे आधीच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. कोरोना काळात त्यांनी आखलेल्या योजनांचे कौतुक झाले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील बारकावे जाणाऱ्या या उमेदवाराला पराभूत करतांना लिझ यांनी दिलेली आश्वासने महत्त्वाची ठरली. (Why Rishi Sunak lost the UK Prime Minister election)

मी पंतप्रधान झाले तर आधी करात सवलत दिली जाईल. महागाई, गॅस टंचाई या मुद्द्यांवर काम करेन असं आश्वासन लिझ यांनी दिलं. अगदी सुरुवातीला कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदारही लिझच्या बाजूने नव्हते. लिझ सर्वात कमकुवत पंतप्रधान ठरतील, असे सांगण्यात येत होते. यामुळे ऋषी सुनक यांचा विजय नक्की करण्यात आला, पण या सर्वात संयमी भूमिका आणि ब्रिटनचे मूळ नागरिक हा मुद्दा लिझ यांच्या मदतीला आला.  

कन्झर्व्हेटिव्ह पक्षात सामिल झाल्यावर लिझ या फायरब्रॅड नेत्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. त्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उशीर उतरल्या, मात्र त्यांची या शर्यतीत एन्ट्री झाल्यावर शेवटच्या पायरीवर असल्या तरी त्यांचाच विजय होणार अशी जाणकारांना खात्री होती. त्याचे प्रमुख कारण म्हणजे काही ब्रिटिश सदस्यांना त्यांच्याच देशाचा नागरिक पंतप्रधान व्हावा अशी इच्छा होती. हेच कारण भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरले.

ऋषी यांचे भारतासोबतचे नाते आणि ब्रिटनच्या जनतेची मानसिकता 

बोरीस जॉन्सन यांचा ब्रिटनच्या पंतप्रधानपदावरुन पायउतार होणार हे स्पष्ट झाल्यावर ब्रिटनचा भावी पंतप्रधान कोण याची चर्चा सुरु झाली. त्यात पहिलं नाव होतं ते ऋषी सुनक यांचं. ऋषी सुनक यांचे नाव जसे पुढे आले तसेच सोशल मिडीया कामाला लागला. ऋषी सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचे ते जावई. त्यामुळे प्रत्येक भारतीयालाच ऋषी सुनक हे आपलेसे वाटू लागले. ऋषी सुनक यांनीही आपली प्रचारमोहीम चांगलीच राबवली. मात्र या सर्वांत एक महत्त्वाचा धागा सुटला तो म्हणजे ब्रिटनच्या जनतेची मानसिकता.   

ऋषी यांचे भारताबरोबरचे नाते हेच त्यांच्या पराजयातील प्रमुख घटक आहे का, याची आता चर्चा सुरु आहे. ज्या देशावर ब्रिटननं राज्य केलं, त्या देशातील व्यक्तीला आपल्या देशातील प्रमुख पद देण्यात ब्रिटनचे किती खासदार उत्सुक होते हे जाणण्यासारखे आहे. त्यामुळेच लिझ ट्रस जरी ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्या तरी त्यांच्याऐवजी ब्रिटनमध्ये अधिक चर्चा झाली ती ऋषी सुनक यांच्या पराभवाची.

==========

हे देखील वाचा – निवडणूकांमध्ये खुप पराभव झाला तरीही जिद्द सोडली नाही… आता ट्रस झाल्या ब्रिटेनच्या नव्या पंतप्रधान

==========

कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा दृष्टिकोन 

त्यातच माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचे पद जाण्यासाठी ऋषी सुनकच जबाबदार असल्याची भावना कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या काही सदस्यांना वाटत होती. त्यांनी ऋषी यांना धडा शिकवण्यासाठी लिझ यांना पाठिंबा दिला. तरीही कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे बहुतांश खासदार सुनक यांच्या बाजूने होते. बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर सुनक हे पंतप्रधानपदासाठी दावा करणारे पहिले उमेदवार होते. 

‘रेडी फॉर ऋषी’ ही मोहीम त्यांच्यासाठी राबवण्यात आली. साजिद जाविद, नदीम जवाहिरी आणि मॉर्डेंट हे खासदारही सुरुवातीला पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होते. पण ते शर्यतीतून बाहेर पडल्यावर लिझ ट्रस यांचा समावेश झाला. बोरीस जॉन्सन यांचा छुपा पाठिंबा लिझ यांना सुरवातीपासून होता. त्यामुळेच त्यांच्या विजयाचे गणित अवघड वाटत असले तरी ते नंतर सुलभ झाले.  (Why Rishi Sunak lost the UK Prime Minister election)

पत्नी अक्षता राणीपेक्षा श्रीमंत?

ऋषी सुनक यांच्या विजयात पहिला अडथळा आला तो त्यांच्या पत्नी अक्षता यांचा. अक्षता या इन्फोसिसचे नारायणमुर्ती यांच्या कन्या. त्यामुळे त्यांच्याकडे असलेले कंपनीचे शेअर्स आणि त्यांची श्रीमंती हा सर्वात चर्चेचा मुद्दा ठरला. अक्षता या इंग्लडच्या राणीपेक्षाही कशा श्रीमंत आहेत, ही चर्चा ब्रिटनच्या सोशल मिडीयात रंगवण्यात आली. 

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए केलेल्या ऋषी सुनक यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून राजकारण, तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. राजकारणात येण्यापूर्वी ऋषी यांनी गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्स आणि हेज फंडमध्ये काम केले. यानंतर त्यांनी एक गुंतवणूक फर्मही स्थापन केली आहे.  

आपल्या व्यवसायातून सुनक यांच्याकडे $840 दशलक्षची संपत्ती होती. ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत संसदपटू म्हणून त्यांचा उल्लेख होतो. अक्षतासोबत लग्न केल्यानंतर त्याची संपत्ती झपाट्याने वाढली. अक्षता या इन्फोसिसमध्ये 0.93 टक्के शेअरहोल्डर आहे आणि त्यांचे मूल्य $794 दशलक्ष आहे. एकूण हे सुनक कुटुंब राणीपेक्षाही श्रीमंत असल्याची चर्चा सुरु झाली. हीच चर्चा त्यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली.

 

अक्षता यांच्याकडे नाही ब्रिटिश नागरिकत्व 

अक्षता यांच्याकडे 430 दशलक्ष पौंडांची संपत्ती आहे. याशिवाय त्यांच्याकडे ब्रिटीश नागरिकत्वही नाही. यामुळे अक्षता या व्यवसाय ब्रिटनमधून करतात, पण ब्रिटनच्या निवासी नसल्याचा गैरफायदा घेऊन कर भरण्याचे टाळतात. यामुळे, दरवर्षी 2 दशलक्ष पौंड ब्रिटनला गमवावे लागतात, अशा आशयाच्या बातम्या आल्या. यांचा ऋषी सुनक यांच्या लोकप्रियतेवर परिणाम झाला. त्यांना जनतेतून मिळणार पाठिंबा कमी झाला. 

ऋषी सुनक यांचे दुहेरी नागरिकत्व 

ऋषी सुनक यांच्या अमेरिकेतील ग्रीन कार्डचा मुद्दाही पुढे आला. कॅलिफोर्नियामध्ये सुनक यांचे 5 दशलक्ष पौंड किंमतीचे आलिशान पेंटहाऊस आहे. त्याचे फोटोही सोशल मिडियावर फिरु लागले. दुहेरी नागरिकत्वावरुन टिकेचे धनी झाल्यावर सुनक यांनी अमेरिकन नागरिकत्व सोडण्याचा निर्णय जाहीर केला, पण त्यापूर्वी खूप उशीर झाला होता. भरीस भर म्हणून सुनक कुटुंबियांच्या श्रीमंती थाटातील राहणीमानावरही टिका करण्यात आली. या सर्व ताणात सुनक यांची प्रचार मोहीम मागे पडली आणि लिझ त्यात पुढे आल्या.  (Why Rishi Sunak lost the UK Prime Minister election) 

जवळजवळ दोन महिने चाललेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर, लिझ ट्रस यांना कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडून ब्रिटनच्या पंतप्रधान पदावर बसवण्यात आले. आता त्यांनी त्यांचे स्वतंत्र मंत्रिमंडळ तयार केले असून त्यात ऋषी सुनक यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळेच सुनक यांची पुढची भूमिका काय राहिल याची उत्सुकता आहे. सुनक यांनी एकीकडे मी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा खासदार आहे. आमचे सरकार आहे. खासदार म्हणून असो वा अन्य मार्गाने, मी माझ्या सरकारला मदत करेन, असे आश्वासन दिले तरी लिझ आणि त्यांच्या मतामधील दुरावा कायम रहाणार आहे.  

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.