Home » Maharashtra State Lottery : अनेकांना लखपति बनवणारी राज्य लॉटरी बंद होणार?

Maharashtra State Lottery : अनेकांना लखपति बनवणारी राज्य लॉटरी बंद होणार?

by Team Gajawaja
0 comment
Maharashtra State Lottery
Share

पूर्वी रस्त्यांवर, नाक्यांवर, रेल्वे स्टेशनवरच्या एखाद्या दुकानात आपल्याला हमखास गुलाबी, पिवळ्या, निळ्या रंगाचे कागद विक्रीला ठेवलेले दिसायचे. काही लोक ते विकत घेतायत हे सुद्धा आपण पाहायचो. तेव्हा आपण लहान असताना आपल्याला प्रश्न पडायचा, ‘हा कागद विकत घेऊन यांना काय फायदा होत असेल ? आणि हे नक्की आहे तरी काय ?’ पण नंतर हळूहळू कळत गेलं की हा नुसता कागद नाही, तर नशीब आजमावण्याची नामी संधी आहे! एक कागद आपलं भविष्य ठरवू शकत नाही, असं आपण म्हणतो, पण याच एका कागदाने अनेकांचं नशीब फळफळलंय! हा कागद म्हणजे लॉटरीचं तिकीट! आता या लॉटरीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, कंपन्या आहेत, पण आपल्या राज्यात एक प्रतिष्ठित लॉटरी आहे, ती म्हणजे महाराष्ट्र राज्य लॉटरी! सध्या ही लॉटरी बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पण ही लॉटरी कोणी आणि कधी सुरु केली ? या लॉटरीचा इतिहास काय ? जाणून घेऊ. (Maharashtra State Lottery)

महाराष्ट्रातली प्रसिद्ध लॉटरी, अर्थात राज्य लॉटरी सुरु झाली १९६९ मध्ये. गांधीवादी विचारसरणीचा तेव्हाही महाराष्ट्रावर पगडा होता. अनेक आदर्शवादी लोक आपल्यामध्ये होते. पण तरीही समाजात भ्रष्टाचार, स्मगलिंग, दारूचा काळाबाजार या गोष्टी सुरु झाल्या होत्या. यातच एक झटपट श्रीमंत होण्याच स्वप्न दाखवणारा शॉर्टकट होता, तो म्हणजे मटका ! एका मडक्यात हा बेटिंगचा खेळ व्हायचा, म्हणून याला मटका असं नाव होत.

तर साधारण चाळीसच्या दशकात गुजरातमधून मुंबईला आलेल्या कल्याण भगत नावाच्या माणसाने याचा शोध लावला. न्युयोर्क आणि बॉम्बे कॉटन मार्केट ओपन आणि क्लोज होण्यावरून बेटिंग सुरु करण्यात आलं. रतन खत्री नावाचा एक सिंधी माणूस कल्याण भगतचा मॅनेजर होता. त्याने या मटक्याच्या धंद्याला यश मिळवून दिलं. पुढे जाऊन १९६४ साली रतन खत्रीने स्वतःचा वेगळा मटका सुरु केला. त्याकाळी महाराष्ट्रात गिरणी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. पण त्यांचं इनकम हे खूपच तुटपुंज होतं. अशा वेळी मग हे लोक मटका लावून नशीब आजमावू लागली. यामुळे रतन खत्री, कल्याण भगत यांच्यासारखे मटका किंग करोडपती बनत होते. त्याकाळी या धंद्याची उलाढाल दररोज एक कोटी पर्यंत जायची, असं म्हणतात. हा मटका आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून, पोलिसांकडून खूप प्रयत्न केले जात होते, पण तो काही आटोक्यात येत नव्हता. (Maharashtra State Lottery)

एकीकडे मटका सगळीकडे फेमस होत होता, तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या सरकारी तिजोरीवर ताण येऊ लागला होता. याच कारण होतं दुष्काळ, अन्नधान्याची टंचाई, बेरोजगारी इत्यादी. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक आणि अर्थमंत्री होते शेषराव वानखेडे. राज्याच्या तिजोरीचा प्रश्न सोडवायचा असेल, तर लोकांच्या व्यसनाला चांगल्या गोष्टीत बदलण्याची गरज आहे, हे वानखेडेंनी नाईकांना पटवून दिलं आणि यातूनच महाराष्ट्र राज्य लॉटरीचा जन्म झाला. मटक्याचा पैसा सरकारकडे वळवण्यासाठी शेषराव वानखेडे यांनी १२ एप्रिल १९६९ रोजी राज्य लॉटरीची घोषणा केली. त्यावेळी विरोधीपक्षातल्या अनेकांनी राज्य सरकारवर टीका केली. सरकार जुगाराला खतपाणी घालतंय, असा सगळ्यांचा सूर होता. पण लॉटरी विक्रीतून अपंग, सुशिक्षित व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल शिवाय यातून मिळणाऱ्या महसुलाचा उपयोग राज्याच्या विकासासाठी होईल, याची ग्वाही राज्य सरकारला होती. (Maharashtra State Lottery)

या लॉटरीसाठी मंत्रालयात स्वतंत्र लॉटरी संचालनालय सुरू केलं गेलं होतं. आता खुद्द राज्य शासनाने आणलेली लॉटरी असल्यामुळे लोकांचा त्यावर लगेच विश्वास बसला आणि काही दिवसातच ती फेमस झाली. यामुळे मटक्यावर काही प्रमाणात आळा बसला.

=================

हे देखील वाचा : India Constitution : भारतीय संविधानाला उधार का थैला का म्हणतात?

=================

सत्तरच्या दशकात या लॉटरीची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. त्याकाळात महिन्याला एकदा सोडत होणारी महाराष्ट्र लॉटरी महिन्यातून तीन वेळा, शिवाय दिवाळी, दसरा अशा खास प्रसंगीसुद्धा निघत होती. पुढे महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या या लॉटरीची कॉपी इतर राज्यांनीसुद्धा केली. थोडक्यात, त्यांनी सुद्धा राज्य लॉटरी सुरु केली.(Marathi News)

त्यामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरीची लोकप्रियता कमी झाली. आसाम, मणिपूर, मिझोरम, नागलैंड या ईशान्य भारतातल्या राज्यांच्या लॉटरीवर बंदी घालणं सरकारला जड जाऊ लागलं. दरम्यान या लॉटरीवर जीएसटी आल्यानंतर २८ टक्के कर बसायला सुरवात झाली. तरीही गेल्या जवळपास ५५ वर्षात राज्य सरकारने या लॉटरीतून शेकडो कोटींचा महसूल कमवला. तर गेल्या काही वर्षात ६१९ पेक्षा जास्त व्यक्ती लखपती आणि काही कोट्याधीश सुद्धा झाले आहेत. आता तर ही लॉटरी सुद्धा ऑनलाईन झाली आहे. पण अजूनही लोकं स्टॉलवर जाऊन तिकीट काढायलाच पसंती देतायत. एवढं असून सुद्धा सरकार आता महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा निर्णय घेणार आहे. (Maharashtra State Lottery)

कारण महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाला आता राज्य लॉटरी चालवणं आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य राहिलं नाही, असं वाटतं आहे. त्यामुळे ही लॉटरी बंद करण्यावर विचार सुरू आहे. साधारण महाराष्ट्रात २० हजारा पेक्षा जास्त महाराष्ट्र राज्य लॉटरीची तिकीट विक्री करणारे विक्रेते आहेत. त्यामुळे या निर्णयामुळे या सर्वांना समस्येला तोंड द्याव लागेल. पण महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता युनियननुसार जर लॉटरी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला, तर त्याला तीव्र विरोध केला जाईल. सरकारला लॉटरी जुगार वाटतो, मात्र तो आमच्यासाठी रोजगार आहे. असंही त्यांचं म्हणण आहे. त्यामुळे अनेकांच नशीब चमकावणाऱ्या या लॉटरीच्या नशीबी काय हे येत्या काही दिवसात कळेल.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.