Home » शिवरायांना मानणाऱ्या मुस्लिम मुख्यमंत्र्यांनी घेतले होते अनेक महत्वपूर्ण निर्णय! पण..

शिवरायांना मानणाऱ्या मुस्लिम मुख्यमंत्र्यांनी घेतले होते अनेक महत्वपूर्ण निर्णय! पण..

by Correspondent
0 comment
A R Antulay | K Facts
Share

आज महाराष्ट्रातल्या राजकारणी मंडळींचा सर्वात आवडता विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या नावावरती अनेक राजकीय मंडळींनी आपली राजकीय पोळी भाजली.

अनेकांनी महाराजांच्या नावाचा वापर करत सत्ता गाजवली. तर अनेक जण याच महाराजांच्या नावाचा वापर करत आजही आपला राजकारणात दबदबा कायम ठेवत आहेत. मात्र सत्तेवर येताच या राजकारणी मंडळींना छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडतो की काय? असा अनेकांना नकळत प्रश्न पडून जातो.

निवडणुकांचे वारे वाहू लागल्यानंतर प्रत्येक राजकारणी मंडळीच्या तोंडातून निघणार “शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जन्मभूमीत…” हे वाक्य निवडणुकीनंतर कुठे गायब होतं हे कळत सुद्धा नाही.

एवढेच काय, छत्रपती शिवरायांच्या साक्षीने वचननाम्यात दिलेले वचन आणि त्याच्यासोबत शिवरायांची प्रतिमा या राजकारणी मंडळींच्या बॅनर वरून कुठे हटवली जाते हे सुद्धा सर्वसामान्यांना कळत नाही.

मात्र आज आपण याच राजकारणातला थोडा हटके असा किस्सा बघणार आहोत. अनेकांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यानंतर फक्त हिंदू एवढाच धर्म आठवतो. मात्र आज आपण एका मुस्लिम शिवप्रेमी मुख्यमंत्र्यांची गोष्ट पाहणार आहोत.

A R Antulay
A R Antulay

हो! आज-काल अनेकजण स्वतःला शिवप्रेमी म्हणवून घेतात मात्र आज आपण बघनार आहे, शिवप्रेमी मुख्यमंत्र्यांनी आपल्या कृतीतून आणि निर्णयातून आपली शिवनिष्ठा कशी दाखवून दिली होती ते.

तर झालं असं की, १९८० च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींच्या (Indira Gandhi) काँग्रेसने मोठा विजय मिळवत आणि पुलोदचं सरकार बरखास्त करत महाराष्ट्रावर सत्ता मिळवली.

महाराष्ट्रावर काँग्रेसने सत्ता मिळवल्यानंतर, इंदिरा गांधींनी पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या बॅरिस्टर ए. आर. अंतुले (A R Antulay) यांना मुख्यमंत्री बनवण्याचे ठरवले. पुढे ९ जून १९८० रोजी अंतुले हे महाराष्ट्राचे पाहिले मुस्लिम आणि कोकणातील पाहिले मुख्यमंत्री झाले होते.

त्यानंतर त्यांनी शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि त्यांच्या इतिहासासंदर्भात अनेक महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय घेतले होते. अंतुले हे मूळचे कोकणातले असल्याने आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी रायगड ही कोकणात येत असल्याने, अंतुले यांना याचा प्रचंड अभिमान होता.

त्यामुळे त्यांनी कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड असे केले होते. अहो इतकंच काय तर, लंडनहून शिवाजी महाराजांची भवानी तलवार परत आणण्याची घोषणाही त्यांनीच केली होती. तशी त्यांनी त्यांच्या काळात धडपडही केली होती.

त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा इतिहासावर १४ खंड प्रकाशित करण्याचे अंतुले यांनी ठरवले होते. त्यासाठी प्रसिद्ध इतिहासकारांची समितीही त्यांनी स्थापन केली होती. मात्र पुढे काही कारणास्तव अंतुले यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागल्याने, तलवारीचा आणि खंड प्रकाशनाचा निर्णय हा राहूनच गेला.

गड किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय सुद्धा अंतुले यांनी घेतला होता. मात्र या सर्वात अंतुले यांचा आजून एक महत्त्वपूर्ण निर्णय होता तो म्हणजे, मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराजांचं तैलचित्र लावण्याचा.

छत्रपती शिवाजी महाराज - मंत्रालय तैलचित्र
छत्रपती शिवाजी महाराज – मंत्रालय तैलचित्र

अंतुले यांनी मंत्रालयात हे तैलचित्र लावल्यानंतर ते चित्र बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्यांना व्यवस्थित दिसतं ना? याची खात्री त्यांनी स्वतः केली होती. हा त्यावेळी सर्वात जास्त गाजलेला किस्सा होता.

एवढंच काय तर, शिवरायांच्या विचारांची प्रभावित झालेल्या मुख्यमंत्री अंतुले यांनी RBI चा विरोध असतानाही ५० कोटींची शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी केली होती.

तर अशी होती महाराष्ट्राच्या पहिल्या मुस्लिम मुख्यमंत्र्यांची छत्रपती शिवाजी महाराजांवरील शिवनिष्ठा.

– निवास उद्धव गायकवाड


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.