Home » Maharashtra Board Students Protest: हे ‘षडयंत्र’ कोणाचे आहे रे ‘भाऊ’ ?

Maharashtra Board Students Protest: हे ‘षडयंत्र’ कोणाचे आहे रे ‘भाऊ’ ?

by Team Gajawaja
0 comment
Maharashtra Board Students Protest Marathi info
Share

”दहावी आणि बारावीची वार्षिक परीक्षा ‘ऑफलाईन’ घेण्याबाबत शिक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी सोमवारी महाराष्ट्रातील प्रमुख शहरात असंख्य विद्यार्थी रस्त्यावर उतरले (Maharashtra Board Students Protest). आतापर्यंत सर्व अभ्यास ‘ऑनलाईन’ पद्धतीने झाला, मग परीक्षाच का ‘ऑफलाईन’ पद्धतीने घेता? असा सवाल त्यांनी केला. मुंबईतील धारावी भागात शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांच्या घरासमोर निदर्शने करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी चक्क लाठीमार करण्यात आला. 

नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जळगाव, नांदेड आणि इतर शहरातही विद्यार्थ्यांनी एकाचवेळी आंदोलन केले. याचा अर्थ हे आंदोलन पूर्वनियोजित होते. मात्र या आंदोलनाबाबत राज्य सरकार पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. त्यामुळे अचानक झालेले हे विद्यार्थी-आंदोलन चांगलेच गाजले ((Maharashtra Board Students Protest). 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तारूढ आघाडीतील पक्ष आणि विरोधी बाकावर बसलेला भाजप यांच्यात  परस्परांवर मात करण्यासाठी अतिशय खालच्या पातळीवरून जी चिखलफेक सुरू आहे. त्यामुळे महत्वाच्या प्रश्नांकडे आघाडी सरकारचे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा हा एक सबळ पुरावा आहे.

अलीकडे आघाडी सरकारचा कोणताही निर्णय ‘वादग्रस्त’ ठरत असून भाजप त्याचे चांगलेच भांडवल करीत आहे असे दृष्टोत्पत्तीस येत आहे. आघाडी सरकारने ‘वाईन’ बाबत घेतलेल्या निर्णयावरून तर सर्वांचेच ‘ताळतंत्र’ सुटलेला दिसून येतोय. जणू काही तोच राज्याचा जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे अशा पद्धतीने त्या निर्णयावर ‘खल’ सुरु झाला आहे. 

राज्यसरकारच्या निर्णयांवर आतापर्यंत प्रामुख्याने केवळ विरोधी पक्षाचं टीका करीत होते मात्र आता ‘समाजमाध्यम’ देखील एक प्रमुख ‘टीकाकार’ बनले आहे हे सरकारने आता  लक्षात घेण्याची गरज आहे.  

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी विद्यार्थी एकाचवेळी कसे रस्त्यावर उतरले, याचे गूढ आघाडी सरकारला वेळीच उमगले नाही. गृहमंत्री वळसे पाटील यांनी त्यामागे पूर्वनियोजित ‘षडयंत्र’ असल्याचा आरोप केला आहे.

मात्र दोन-तीन दिवसापासून  या आंदोलनाबाबत समाज-माध्यमांतून संदेश फिरत होते असे आता कळून आले आहे (Maharashtra Board Students Protest). मग असे असताना सरकारची गुप्तचर यंत्रणा काय काम करीत होती, असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. 

=====

हे देखील वाचा : व्हाय आय किल्ड गांधी: अभिनेते आणि जनमानसातील प्रतिमा

=====  

राज्यातील प्रमुख शहरात एकाचवेळी शेकडो विद्यार्थी निदर्शने करतात आणि त्याची माहिती कोणालाच नसते, हे गुप्तचर यंत्रणेचे अपयशच म्हणावे लागेल. गृहमंत्री म्हणतात त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे ‘षडयंत्र’ असल्याचा आता तपास केला जाईलच. 

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामागे कोणीतरी ‘हिंदुस्थानी भाऊ’ आहे असे आता कळून आले आहे. असंख्य विद्यार्थी ज्याचे ऐकून रस्त्यावर उतरतात तो हा ‘हिंदुस्थानी भाऊ’ एका दिवसात कसा प्रकाशात आला?  तसे असल्यास तो चमत्कारच म्हटला पाहिजे. 

आता या ‘हिंदुस्थानी भाऊ’ उर्फ विकास पाठक यांच्याशी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. याचा अर्थ दहावी-बारावीची परीक्षा ‘ऑफलाईन’ घेण्याबाबत वर्षा गायकवाड यांनी  यापूर्वी सर्व संबधितांशी विचारविनिमय केलेला दिसत नाही. एकदा निर्णय घेतल्यानंतर त्याला विरोध होताच पुन्हा चर्चा करण्याची तयारी दर्शविणे म्हणजे आधीच्या निर्णयात खूपच कमतरता असल्याचे सिद्ध करण्यासारखे आहे.

 

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सर्वात जास्त नुकसान झाले ते शिक्षणक्षेत्राचे. ‘कोरोना’ च्या दहशतीमुळे कोणत्याच निर्णयात ठामपणा नसल्यामुळे ”कधी शाळा सुरू तर कधी बंद”, तर परीक्षा कधी ऑनलाईन तर कधी ‘ऑफलाईन’ यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक कायम संभ्रमावस्थेत राहिले. 

=====

हे देखील वाचा : Freedom Convoy: कॅनडाचे पंतप्रधान झाले भूमिगत!

=====  

परीक्षांबाबतही अनेकवेळा गोंधळाचेच वातावरण निर्माण झाले. अर्थात या गोंधळाचे खापर ‘कोरोना’ च्या वेगवेगळया लाटांवर सोपवून चालणार नाही. विशेष म्हणजे महत्वाच्या निर्णयांबाबत आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये कसलाही समन्वय नसल्याचे अनेकदा आढळून आले आहे. त्यामुळे हा मंत्रिमंडळाचा सामूहिक निर्णय आहे की एकट्या मंत्र्याने घेतला आहे, असाही संभ्रम निर्माण होऊ शकतो.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलन (Maharashtra Board Students Protest) प्रकरणी पोलिसांनी आता त्या ‘हिंदुस्थानी भाऊ’ला अटक केली आहे. त्यामुळे या आंदोलनामागे नक्की कोणाचे ‘षडयंत्र’ आहे हे कळून येईल. मात्र या सर्व प्रकरणात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड चांगल्याच तोंडघशी पडल्याचे दिसून आले. शिक्षण खात्यात  कोणाचा पायपोस कोणात नाही हेही सिद्ध झाले. यापुढे कोणतेही महत्वाचे निर्णय घेताना ते विचारपूर्वक घेतले जावेत आणि त्यामध्ये मंत्रिमंडळाचा सामूहिक चेहरा दिसण्याची गरज आहे. त्यामध्येच महाविकास आघाडी सरकारचे हित आहे.  

— श्रीकांत नारायण
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.