प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याची तयारी आता युद्धपातळीवर सुरु आहे. या महाकुंभमेळ्यात साधुसंतांचे आखाडे महत्त्वाचे असतात. या आखाड्यांना अपेक्षित अशा जागेचे वाटप करण्यात आले असून त्यांचे भूमिपूजन आता होत आहे. यानिमित्त विशेष होम आणि यज्ञ सुरु झाले आहेत. तसेच 2025 चा महाकुंभ निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी संतांनी माता गंगा, यमुना सरस्वती यांची प्रार्थनाही केली. याता या आखाड्यांमध्ये संताची ध्यानाची जागा आणि सभास्थाने बांधण्यात येत आहेत. तसेच आखाड्यातील लंगरही बांधले जात असून संतांच्या निवासस्थानाची बांधणी सुरु करण्यात आली आहे. या आखाड्यांचे धर्मध्वज उभारणी 22 डिसेंबरला होणार असून कुंभमेळा प्रवेश यात्रा 2 जानेवारीला होणार आहे. या सर्वच आखाड्यांचा इतिहास मोठा आहे. (Mahakumbh)
प्रयागराज महाकुंभ 2025 साठी प्रयागराजमध्ये विविध आखाड्यांमधील लाखो भाविक आणि साधू संत यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. आदि शंकराचार्यांनी प्रस्थापित केलेल्या परंपरेनुसार देशभरातील विविध आखाड्यांचे ऋषी-मुनीही या कुंभमेळ्यात सहभागी होतात. देशभरातील या सर्व आखाड्यांचे नियम आणि मानपान वेगवेगळे आहेत. मुळात आदि शंकराचार्यांनी 13 आखाडे तयार केल्याची माहिती आहे. यात ऋषींना अध्यात्मिक ज्ञानासोबत शस्त्रांचेही ज्ञान दिले जाते. त्यामुळे प्रत्येक आखाड्यांची शस्त्रे ही वेगवेगळी आहेत. शैव, वैष्णव आणि उदासीन संप्रदायाच्या एकूण 13 मान्यताप्राप्त आखाड्यांनंतर आणखी एक आखाडा तयार झाला आहे. (Social News)
2019 मध्ये प्रयागराजमध्ये कुंभ मध्ये किन्नर आखाड्याला परवानगी दिली आणि आखाड्यांची संख्या 14 झाली आहे. कुंभमेळ्यात कुठला आखाडा कधी स्नान करणार याचे नियम हे तयार करण्यात आले आहेत. त्याच क्रमानुसार आखाडे हे शाही स्नानासाठी जातात. आखाड्यांच्या या शाही स्नानाच्या मिरवणुका म्हणजे, त्याचे शक्ती प्रदर्शन असते. ते बघण्यासाठी लाखो भाविक या मार्गावर उपस्थित असतात. शाही स्नानासीठी साधु-संत हत्ती-घोडे यांच्यासह घंटानाद करत जातात. नागा साधु तलवारी-बंदुकांचे प्रदर्शन करतात. या शोभायात्रेत अन्य भाविकांना प्रवेश नसतो.साधुंचे स्नान झाल्यावर मग त्रिवेणी संगम घाट सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येतो. हिंदू धर्माची पताका घेतलेले हे आखाडे आणि त्यातील साधुंचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक महाकुंभमेळ्यात येतात. त्यात शैव सन्यासी पंथाचे 7 आखाडे आहेत. (Mahakumbh)
श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी- दारागंज प्रयाग, उत्तर प्रदेश, पंच अटल आखाडा- चौक हनुमान, वाराणसी उत्तर प्रदेश, श्री पंचायती आखाडा निरंजनी- दारागंज, प्रयाग, उत्तर प्रदेश, श्री तपोनिधी आनंद आखाडा पंचायती त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र, श्री पंचदशनाम जुना आखाडा- बाबा हनुमान घाट, वाराणसी, उत्तरप्रदेश, श्री पंचदशनाम आवाहन आखाडा – दशाश्वमेध घाट, वाराणसी, उत्तरप्रदेश, श्री पंचदशनाम पंच अग्नि आखाडा- गिरीनगर, भवनाथ, जुनागढ, गुजरात . याशिवाय बैरागी वैष्णव पंथाचे 3 आखाडे आहेत. त्यात श्री दिगंबर अनी आखाडा- शामलाजी खाकचौक मंदिर, सांभर कंठा, गुजरात, श्री निर्वाणी आखाडा- हनुमान गाडी, अयोध्या, उत्तरप्रदेश, श्री पंच निर्मोही अनी आखाडा- धीर समीर मंदिर बन्सिवत, वृंदावन, मथुरा, उत्तरप्रदेश, यांचा समावेश आहे. उदासीन पंथाचे 3 आखाडे आहेत. श्री पंचायती बडा उदासीन आखाडा- कृष्णनगर, कीतगंज, प्रयाग, उत्तरप्रदेश, श्री पंचायती आखाडा नवीन उदासीन- कंखल, हरिद्वार, उत्तराखंड, श्री निर्मल पंचायती आखाडा- कंखल, हरिद्वार, उत्तराखंड यांचा समावेश आहे. आता यात किन्नर आखाड्याचीही भर पडली आहे. (Social News)
========
हे देखील वाचा : महाकुंभमध्ये मुक्काम कुठे कराल ?
========
महाकुंभमेळ्यातील पहिले शाही स्नान 13 जानेवारी रोजी होईल. तोपर्यंत सर्व आखाड्यांमध्ये त्यांची स्वतंत्र लंगर व्यवस्था उभारण्यात येईल. या आखाड्यात आहाराचे पक्के नियम असतात. यातील अनेक साधुसंत हे एकअन्न घेत असतात. शिवाय फलाहार घेणारे साधुही असतात. प्रत्येक आखाड्यानुसार त्यांच्या भोजनाचे वैशिष्ट असते. याशिवाय महाकुंभमेळ्यात येणा-या भाविकांनाही या आखाड्यातील लंघरमध्ये प्रसादाची सोय करण्यात येते. या सर्वच आखाड्यांमध्ये तेथील साधुंच्या शस्त्रांचे प्रदर्शन बघण्यासाठीही भाविक मोठ्या संख्येनं येतात. महाकुंभमेळ्यानिमित्त भारतभरातील हे सर्व साधुसंत एकाच छताखाली येतात. त्यामुळे त्यांच्यातील वैचारिक आदान प्रदानही येथे होते. याशिवाय अनेक आखाड्यांमध्ये भाविकांसाठी धार्मिक ग्रंथांचे पारायण करण्यात येते. (Mahakumbh)
सई बने