महाकुंभमेळा…. (Mahakumbh) २०२५ या नवीन वर्षाची सुरुवातच या पवित्र आणि अतिशय धार्मिक अशा मोठ्या उत्सवाने झाली. जगाच्या कानाकोपऱ्यात साधनेमध्ये आपले जीवन व्यतीत करणारे मोठे मोठे साधू, संत, महात्मे या कुंभमेळ्याच्या निमित्ताने समोर आले आणि सगळ्यांना आपले दर्शन दिले. समुद्रमंथनाच्या कथेनुसार अमृताचे थेंब पृथ्वीवर प्रयागराज, नाशिक, हरिद्वार आणि उज्जैन या चार ठिकाणी पडले आणि इथे कुंभमेळ्याला सुरुवात झाली. अतिशय मोठा आणि जाज्वल्य इतिहास या कुंभमेळ्याला लाभलेला आहे. (Mahakumbh 2025)
दर बारा वर्षांनी येणारा हा धार्मिक उत्सव इतका पवित्र आणि मोठा समजला जातो की त्याची दखल थेट युनेस्कोने (UNSCO) घ्यावी आणि कुंभमेळ्याला ‘जागतिक सांस्कृतिक वारसा’ म्हणून घोषित करावे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. यंदा प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावर संपन्न झालेला कुंभमेळा हा नुसताच कुंभमेळा नव्हता तर तो महाकुंभमेळा होता. बारा नव्हे तर तब्बल १४४ वर्षांनी आलेला दुर्मिळ असा हा महाकुंभमेळा. याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनीच प्रयागराज गाठले. कारण पुढचा महाकुंभमेळा पाहायला आजच्या काळातील कोणीच या पृथ्वीवर जिवंत नसेल. (Prayagraj Mahakumbh)
अनेकांना वाटते की, महाकुंभ म्हणजे काय तर संत, महात्मे येतात आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. बस… अहो थांबा इतके पण सोपे नाही हे. कुंभमेळा ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. आपल्या पुराणांमध्ये देखील याबद्दल उल्लेख केला आहे. हिंदू धर्मातील सर्वात मोठा असणारा हा सोहळा सर्वांसाठीच एक मोठे आकर्षण ठरला. महाकुंभ सुरु होण्याआधीपासूनच याचा तुफान चर्चा आपण ऐकत होतो. सोशल मीडियावर व्हिडिओ, रिल्स पाहत होतो. ज्यांना कुंभमेळ्याबद्दल माहित नव्हते, ते तर यात सहभागी होण्यासाठी खूपच उत्सुक दिसले. (Marathi Top Stories)
हा कुंभमेळा (Kumbhmela) जेवढा प्रयागराजचा होता, त्यापेक्षा जास्त तो हिंदू धर्माचा होता. त्यामुळे यात सर्व काही सुरळीत आणि नीटच संपन्न व्हावे अशीच सर्वांची इच्छा होती. जरी दर बारा वर्षांनी हा कुंभमेळा येत असला तरी त्याची तयारी खूप वर्ष आधीच सुरु होते. त्या शहरात येणाऱ्या साधू, महात्म्यांच्या निवासाच्या सोयीपासून ते पर्वणीच्या दिवशी होणाऱ्या शाहीस्नानापर्यंत सर्वच गोष्टी प्लॅनिंग करून केल्या जातात.
या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आर्किटेक्ट, इंजिनियर्स, डॉक्टर्स आदी सर्वच दिग्गज आणि हुशार लोकांपासून ते सामान्य स्वछता कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच लोकं रात्रंदिवस काम करतात. लोकांची गैरसोयी टाळण्यासाठी, कोणतेही अनुचित प्रकार, अपघात होऊ नये यासाठी अनेक प्रयत्न करत तंत्रज्ञानाची मदत घेत काम केले जाते. सामान्य लोकांना आणि माहात्म्यांना कोणताही त्रास होऊ नये आणि हा उत्सव निर्विघ्न संपन्न व्हावा यासाठी सरकार देखील सतत काम करत असते.
यंदाच्या या महाकुंभसाठी ५०६० कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले होते. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या काळात सहा पर्वण्या झाल्या आणि हा महाकुंभ समाप्त झाला. १४४ वर्षांनंतर होणाऱ्या अतिशय दुर्मिळ अशा ग्रहस्थितीमुळे या कुंभमेळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्याचे प्रतीक असलेल्या महाकुंभ २०२५ साठी जगभरातून तब्बल ६० कोटींच्या वर भाविकांनी प्रयागराजमध्ये हजेरी लावली होती.
प्रयागराजचा महाकुंभमेळा हा अनेक कारणांनी खूपच गाजला. या कुंभमेळ्यामधे अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे हा महाकुंभमेळा कायम सगळ्यांच्या स्मरणात राहील. मुख्य म्हणजे या महाकुंभामध्ये आजची आधुनिक पिढी देखील सक्रिय दिसली. त्यांना देखील याबद्दल एक वेगळीच उत्सुकता आणि ओढ होती. आजच्या आधुनिक सोशल मीडियाच्या काळात हा महाकुंभ कमालीचा भाव खाऊन गेला.
या कुंभामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले की, या जगात मनुष्याला कोणत्याही संकटातून फक्त अध्यात्माच तारू शकते. कारण मोठं मोठ्या कंपन्यांमध्ये लाखो रुपये पगार घेणारे अनेक लोकं या महाकुंभामध्ये संन्यासी वेशात दिसले. काहींनी तर संन्यास देखील घेतला. याचे मोठे उदाहरण म्हणजे, IITin बाबा उर्फ अभय सिंग. मूळचा हरियाणाचा असलेल्या अभय सिंगने IIT मुंबईमधून एरोस्पेस इंजिनियरिंगच्या डिग्री घेतली. परदेशात नोकरी करणारा हा अभय सिंग नैराश्यात गेला. त्यातुन बाहेर पडण्यासाठी त्याने त्याची गलेगठ्ठ पगाराची नोकरी सोडली आणि तो अध्यात्माकडे वळाला.
अजून एक उदाहरण म्हणजे अतिशय सुंदर असलेली अभिनेत्री आणि कन्टेन्ट क्रिएटर हर्षा रिछारिया. आपल्या सुंदरतेमुळे व्हायरल झालेली हर्षा देखील दोन वर्षांपासून साध्वी होण्याच्या दिशेने प्रवास करत आहे, मात्र ती अजून पूर्णपणे साध्वी झालेली नाही. याशिवाय महाकुंभामध्ये रुद्राक्षच्या माळा विकणाऱ्या मोनालिसा भोसलेला कोणी विसरूच कसे शकते. रंगाने सावळी असली तरी तिच्या डोळ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अगदी तिला फिल्म्सच्या देखील ऑफर येत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
हा कुंभमेळा अजून एका गोष्टीसाठी खूपच चर्चेत आला आणि तो म्हणजे अभिनेत्री ममता कुलकर्णीने घेतलेल्या संन्यासामुळे. अगदी चित्रपटासारखीच फिल्मी सिचवेशन ममताच्या संन्यास घेण्यामध्ये झाली. ममताने संन्यास घेतल्यानंतर तिला किन्नर अखाड्याचे महामंडलेश्वर पद दिले गेले. मात्र यावरून अनेकांनी तीव्र विरोध केला आणि मोठा वाद निर्माण झाला. ममताला महामंडलेश्वर बनवल्यानंततर किन्नर अखाड्यात मोठा संघर्ष सुरू झाला. त्यानंतर आता ममताला महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलं आहे. पण पुन्हा तिच्या पदावर नेमण्यात आलं.
अतिशय पवित्र असणाऱ्या या महाकुंभला गालबोट लागले ते २९ जानेवारी रोजी मध्यरात्री झालेल्या एका दुर्घटनेमुळे. मौनी अमावस्येची पर्वणी साधत लाखो भाविक प्रयोगराजमध्ये आले. मात्र मध्यरात्री १ वाजता संगम किनाऱ्यावर अमृतस्नानापूर्वी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली आणि माहितीनूसार या घटनेत १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
ज्या महाकुंभाचे महत्व जाणून सामान्य लोकांसोबतच अनेक मोठमोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रयागराज गाठत संगमामध्ये स्नान केले तिथे भारताचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींनी देखील आपली उपस्थिती दर्शवली. ५ फेब्रुवारी रोजी मोदीजी प्रयागराजमध्ये आले. त्यांनी मोटर बोटमध्ये बसून संपूर्ण संगम परिसराची पाहणी तर केली, सोबतच पवित्र अशा त्रिवेणी संगमामध्ये स्नान देखील केले. शिवाय देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील या पवित्र पाण्यांमध्ये स्नान केले.
इतकेच नाही तर या महाकुंभमध्ये जगातील सर्वात श्रीमंत महिला उद्योजक असलेल्या लॉरेन पॉवेल जॉब्स यांनी देखील सहभाग घेतला होता. त्यांनी संगमवर कल्पवास करत भारतीय संस्कृतीला खूपच जवळून पाहिले. एवढेच नाही तर त्यांनी निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरि यांचं निवसथानी जाऊन भगवे वस्त्र परिधान करून सनातन धर्म समजून घेतला. यासोबतच भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक असलेले मुकेश अंबानी आणि गौतम अदाणी यांनी देखील महाकुंभामध्ये कुटुंबासह हजेरी लावली आणि सेवा केली.
इंफोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष राज्यसभा सदस्य सुधा मूर्ति यांनी देखील तीन दिवस आपल्या कुटुंबासोबत संगम परिसरात व्यतीत केले. सोबतच पद्म विभूषण बांसुरी सम्राट पं. हरि प्रसाद चौरसिया, सितार वादक पद्मश्री शिव नाथ मिश्र-देवव्रत मिश्र, पद्मभूषण पं. विश्व मोहन भट्ट, नृत्यांगना डोना गांगुली, हरिहरन आदी दिग्गज कलाकारांनी त्यांची कला देखील या काळात महाकुंभामध्ये सादर केली.
सेलिब्रिटींबद्दल सांगायचे झाले तर या महाकुंभमध्ये हॉलीवुड स्टार कोल्डप्ले सिंगर क्रिस मार्टिन आणि त्याची गर्लफ्रेंड डकोटा जानसन, अक्षय कुमार, विकी कौशल, सुनील शेट्टी, विवेक ओबेराय, अभिनेत्री हेमा मालिनी, कॅटरिना कैफ, प्रीति जिंटा, रवीना टंडन, राशा टंडन, अनुपम खेर, जूही चावला, रेमो डिसुझा आदी अनेक कलाकार या महाकुंभामध्ये सहभागी झाले होते. यासोबतच मराठीमधील स्वप्नील जोशी, प्राजक्ता माळी, मिलिंद सोमण, सौरभ चौगुले, प्रवीण तरडे, स्नेहल तरडे आदी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
१४४ वर्षांनी येणारा हा महाकुंभमेळा बजेटच्या दृष्टीने देखील मोठा ठरला. ५०६० कोटींचे बजेट असलेल्या या कुंभमेळ्यामधे भाविकांच्या दृष्टीने अनेक सोयी करण्यात आल्या होत्या. महाकुंभ मेळ्याच्या सुरक्षेसाठी ५५ हून अधिक फोर्स सोबतच तब्बल ४५,००० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
शिवाय या महाकुंभच्या संपूर्ण व्यवस्थापनासाठी २,७५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने ४० कोटी भाविकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सक्षम केले आहे. त्यासोबतच AI-आधारित तब्बल २६८ व्हिडीओ कॅमेरे गर्दीच्या हालचालींच्या निरीक्षणासाठी तैनात करण्यात आले होते. वाहतूक व्यवस्थापनासाठी आणि पार्किंगची सोय करण्यासाठी २४० AI-आधारित प्रणाली तैनात करण्यात आली होती.
===========
हे देखील वाचा : Instagram Feed : इंस्टाग्रामवर अश्लील आणि हिंसक कंटेंटच का दिसतोय?
===========
एक गोष्ट तर नक्कीच आहे, आपण कितीही चांगली भरपूर पैसे खर्चून तयारी केली, तरी देखील जेव्हा प्रॉपर इव्हेंट होतो तेव्हा काही ना काही तरी कमी जाणवतेच. प्रयागराजच्या कुंभमेळ्यामधे अनेक चांगल्या गोष्टी झाल्या असल्या, तरी देखील अनेक चुकीच्या गोष्टी देखील घडल्या. कदाचित येणाऱ्या लोकांच्या संख्येचा अंदाज बांधताना सरकार चुकले आणि त्यामुळे लोकांची गैरसोय झाली. कल्पना करू शकत नाही एवढी गर्दी, ट्रॅफिक झाले. रस्ते बंद करावे लागले. रेल्वे बंद कराव्या लागल्या. लोकांना जागेअभावी रस्त्यावर किंबहुना जागा मिळेल तिथे झोपावे लागले. अनेक नातेवाईक लहान मुलं हरवले, चोऱ्या झाल्या, छोटे छोटे अपघात झाले.
मात्र असे असले तरी महाकुंभ चांगला संपन्न झाला. अनेक अर्थाने गाजला. यातून आपण काय करू नये आणि काय करावे हे सगळ्यांचं समजले. येत्या दोन वर्षात नाशिकमध्ये कुंभमेळा होतो, त्या पार्श्वभूमीवर हा महाकुंभ महाराष्ट्र सरकारसाठी एक चांगले उदाहरण नक्कीच ठरेल. याच कुंभमेळ्यामधे सर्व धर्म समभाव पाहिला मिळाला, जात पात यापेक्षा धर्म नक्कीच श्रेष्ठ हे सुद्धा याच महाकुंभामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ते म्हणतात ना ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड……
हर हर गंगे….