प्रयागराज येथे होणारा महाकुंभमेळा हा सर्वार्थानं अद्वितीय करण्यासाठी उत्तरप्रदेश सरकार प्रयत्न करीत आहे. येथे येणा-या करोडो भाविकांना सर्व सुविधा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. तसेच या सर्व भाविकांना भक्तीसराची मेजवानीही देण्यात येणार आहे. महाकुंभात सामिल होणा-या भाविकांना शंकर महादेवन, कैलाश खेर, कविता पौडवाल यांच्यासह अनेक मान्यवर गायकांच्या गाण्याचा कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या महाकुंभ 2025 मध्ये आत्तापर्यंत 45 करोड भाविक सहभागी होतील, अशी आकडेवारी आहे. यात देश-विदेशातील भाविकाचा समावेश असेल. हे भाविक गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमात पवित्र स्नान करण्यासाठी गर्दी करणार आहेत. महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या शाही स्नानाला मोठ्या संख्येनं साधू संतही आत्तापासून प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. या सर्व धार्मिक वातावरणात अधिक भर घालणार आहेत, ते मान्यवर गायक. महाकुंभमेळ्यात मुख्य ठिकाणी भव्य असे मंडप टाकण्यात येत असून यामध्ये मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. भारतातील विविध भागातील कलाकार यात सहभागी होणार आहेत. (Maha Kumbh Mela)
हिंदू संस्कृती आणि भारतीय कलांचा हा मेळा या कुंभनगरीत साजरा केला जाणार आहे. याशिवाय मान्यवर गायक आणि संगीतकारही या धार्मिक सोहळ्यात आपली कला सादर करण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत. यात गायक आणि संगीतकार शंकर महादेवन, कैलाश खेर, सोनू निगम, विशाल भारद्वाज, ऋचा शर्मा, जुबिन नौटियाल आणि श्रेया घोषाल या कलाकारांचा समावेश आहे. हे कलाकार महाकुंभमेळ्यातील विविध ठिकाणी आपले कार्यक्रम सादर करणार आहेत. एकूण 45 दिवसांच्या या भक्तीमेळ्याला मोठ्या प्रमाणात विदेशी नागरिकही येणार आहेत. जगभरातील मान्यवर नेते, राजदूत आणि देशविदेशातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर प्रयागराज येथे येणार आहेत. या सर्वांसमोर भारतीय संस्कृतीचे व्यापक दर्शन या मेळ्याच्या माध्यमातून घडवण्यात येणार आहे. महाकुंभमेळ्यात यासाठी ठिकठिकाणी मोठे मंडप उभारण्याचे काम सुरु झाले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने उत्तर प्रदेश संस्कृती विभागाकडून सादर होत आहे. (Social News)
महाकुंभमेळ्यातील गंगा मंडपामध्ये बहुतांश कार्यक्रम सादर होतील. गंगा मंडप अतिशय भव्य असून त्यात 10 हजार भाविकांना बसण्याची व्यवस्था कऱण्यात आली आहे. हे सर्व कार्यक्रम दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत सादर होतील. महाकुंभमेळ्यासाठी आत्तापासूनच प्रयागराजमध्ये भाविकांची गर्दी सुरु झाली आहे. ही गर्दी पहाता कुंभमेळा सुरु होण्याच्या आधीपासूनच हे सांस्कृतिक कार्यक्रम सुर कऱण्यात येतील. 10 जानेवारी रोजी प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांची संगीत रजनी होत आहे. तर 12 जानेवारी रोजी प्रसिद्ध लोकगायिका मालिनी अवस्थी स्थानिक भाषेतील गाणी सादर करणार आहेत. याशिवाय 18 जानेवारी रोजी कैलाश खेर यांच्या गाण्यांचा कार्यक्रम होईल. तर 19 जानेवारी रोजी प्रसिद्ध गायक सोनू निगम यांची संगीत संध्या होईल. 20 जानेवारीला प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूर मैथिली भाषेतील लोकप्रिय गाणी सादर करतील. (Maha Kumbh Mela)
====
हे देखील वाचा : बंदूकीचा शोध लागला तरी कसा ?
========
31 जानेवारीला जेष्ठ गायिका कविता पौडवाल गाणी सादर करतील. याशिवाय 1 फेब्रुवारीला विशाल भारद्वाज, 2 फेब्रुवारीला रिचा शर्मा, 8 फेब्रुवारीला जुबिन नौटियाल, 10 फेब्रुवारीला रसिका शेखर, 14 फेब्रुवारीला हंसराज रघुवंशी आणि 24 फेब्रुवारीला श्रेया घोषाल या सर्वांच्या भक्तीसंगीताचे कार्यक्रम होणार आहेत. उत्तरप्रदेश सरकार हा महाकुंभ 2025 भव्यदिव्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचीही मदत घेत आहे. या कुंभमेळ्यासाठी भलामोठा पोलीस फाटाही प्रयागराजमध्ये दाखल कऱण्यात आला आहे. यासर्वांसाठी नवीन 50 पोलीस ठाणी बांधण्यात आली आहेत. या सर्व पोलीस ठाण्यांचे शुभोभिकरणही करण्यात आले आहे. शिवाय महाकुंभात सामिल होणा-या भाविकांसाठी महाकुंभ परिसरातील अरैल येथे यमुनेच्या तीराजवळ अनोखे शिवालय उद्यान उभारण्यात येत आहे. 40 हजार चौरस मीटरमध्ये उभारण्यात येणाऱ्या या उद्यानात भारतातील सर्व प्राचीन शिवमंदिरांचे रूप एकाच ठिकाणी भाविकांना पाहता येणार आहे. यात देशभरातील 22 मंदिरांचे स्वरूप पहाता येतील. तसेच 12 ज्योतिर्लिंग यात असून समुद्र मंथनाचा भव्य देखावाही इथे बघता येणार आहे. एकूणच प्रयागराजचा महाकुंभ हा भाविकांसाठी पर्वणीचा ठरणार आहे. (Social News)
सई बने