उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे 14 जानेवारी 2024 पासून सुरु होणा-या कुंभमेळयासाठी तयारी अंतीम टप्यात आली आहे. प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी करोडो भाविक येणार आहेत. त्याची सुरुवात झाली असून आत्ताही ही नगरी लाखो भाविकांनी सजली आहे. या सर्वात महाकुंभ मेळा क्षेत्र उत्तरप्रदेशमधील 76 वा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. यामध्ये 4 तालुक्यांतील 67 गावांचा समावेश करण्यात आहे. या क्षेत्रात आता भाविकांची उपस्थिती असून त्यांच्या सुखसोयीसाठी प्रशासन सज्ज आहे. या सर्वच कुंभमेळा क्षेत्रात दुकाने उभारण्याचे काम सुरु आहे. 14 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2024 कालावधीसाठी उभारण्यात येणा-या या दुकानांचे भाडे 90 लाखाच्या पार गेले आहे. (Maha Kumbh Mela)
प्रयागराज महाकुंभची तयारी पूर्ण आली आहे. या भव्य सोहळ्याला 40 कोटी भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अशावेळी त्याचे आयोजन चोख ठेवण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यातूनच स्वतंत्र कुंभमेळा जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. आता या भागातील दुकानांच्या निविदा जाहीर होत आहेत. या निविदांचे दर काही लाखांच्या पार गेले आहेत. मात्र दुकाने लाखात गेली असली तरी यातील खाद्यपदार्थांचे दर आणि त्यातील स्वच्छता यावर प्रशासनाचे नियंत्रण राहणार आहे. उत्तरप्रदेशमधील प्रसिद्ध अशा अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल या कुंभमेळ्यात असणार आहेत. तसेच या भागातील अनेक प्रसिद्ध दुकानदारही कुंभमेळ्यात आपले दुकान उभे रहावे म्हणून निविदांसाठी अर्ज करीत आहेत. 900 स्क्वेअर फुटांच्या दुकानाचे भाडे 92 लाख रुपये निश्चित करण्यात आले आहे. मात्र या दुकानातील खाद्यपदार्थांची किंमत 30 रुपयांपेक्षा जास्त नसावी असे बंधनीही प्रशासनातर्फे घालण्यात आले आहे. कुंभमेळ्यासाठी मोक्याच्या जागेवरील दुकानांच्या भाड्यांचा दर खूप महाग आहे. (Social News)
संगम स्नान जेथे होणार आहे, तेथून काही अंतरावर कचोरी व्यावसायिकांची दुकाने असणार आहेत. त्यानंतर लाडू व्यावसायिकांची दुकाने असणार आहेत. त्यांचे भाडे 75 लाख रुपये ठेवण्यात आले आहे. प्रयागराज महाकुंभचे एकूण क्षेत्र 4000 हेक्टर आहे. जत्रा परिसरात बांधकामासाठी ठिकठिकाणी जेसीबीने जमिनीचे सपाटीकरण करण्यात येत असून नदीवरही काही अस्थायी पूल बांधण्याचे काम चालू आहे. या सर्वच ठिकाणी खाद्य दुकाने मोठ्या प्रमाणात उघडण्यात आली आहे. त्याचबरोबर परेड ग्राऊंडमध्येच महाकाल प्रसाद भोग आणि कचोरी भांडार या दुकानाची 75 लाख रुपयांना विक्री होत आहे. महाकुंभाचे आयोजन पाहता प्रशासनाने कमीतकमी 10 हजार दुकाने उघडण्याचे उद्दीष्ठ ठेवले आहे. या सर्वच दुकानांवर खाद्यपदार्थांच्या किंमती मोठ्या अक्षरात लिहिण्याचे बंधन आहे. कुंभमेळ्यासाठी येणारा भाविकांचा मोठा आकडा पहाता प्रशासनामध्येही नव्यानं नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. (Maha Kumbh Mela)
=====
हे देखील वाचा : हिंदूसाठी लढणा-या चिन्मय दास यांना अटक !
========
महाकुंभमेळ्यासाठी फक्त भारतातूनच नाही तर परदेशातूनही मोठ्या प्रमाणात भाविक आणि अभ्यासक येतात. एवढ्या मोठ्या मेळ्याचे आयोजन कसे होते, हे बघण्यासाठी देश विदेशातील तज्ञ येतात. या सर्वांसाठी महाकुंभमेळा 2025 हा एक रोलमॉडेल असेल अशी तयारी प्रशासन करीत आहे. याशिवाय उत्तरप्रदेश सरकारनेही अनेक देशांमधील राजदूत, प्र शासकीय अधिकारी यांना कुंभमेळ्याचे आमंत्रण दिले आहे. या सर्वाचे नियोजन करण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने महाकुंभ मेळा राज्याचा 76 वा जिल्हा म्हणून जाहीर केला आहे. महाकुंभमेळ्यात प्रयागराजच्या सदर, सोराव, फुलपूर आणि करचना तालुक्याचा समावेश होतो. या 4 तालुक्यांतील संपूर्ण परेड परिसर आणि 67 गावांचा महाकुंभमेळ्यात समावेश करण्यात आला आहे. प्रयागराज महाकुंभ दरम्यान एकूण सहा शाही स्नान होतात, त्यावेळी साधू संतांची आणि भाविकांची मोठी गर्दी होते. मकर संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारीला महाकुंभाचे पहिले शाही स्नान होणार आहे. दुसरे शाही स्नान 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्येला होणार आहे. तिसरे शाही स्नान बसंत पंचमीला म्हणजेच 3 फेब्रुवारीला होईल. चौथे शाही स्नान पौष पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. माघी पौर्णिमेच्या दिवशी पाचव्या शाही स्नानाचे आयोजन करण्यात येणार असून, 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी सहाव्या शाही स्नानाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतरच महाकुंभमेळ्याची समाप्ती होईल. (Social News)
सई बने