Home » श्री पंचायती बडा उदासीन आखाडा

श्री पंचायती बडा उदासीन आखाडा

by Team Gajawaja
0 comment
Maha khumbh Mela
Share

प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यासाठी मिरवणुकीनं आखाड्यांचे आगमन होत आहे. अनेक आय़ुधे घेतलेले या आखाड्यातील साधू त्यांच्या वेगळ्या वेशभुषेनं लक्ष वेधून घेत आहेत. या सगळ्यात गुरुन नानक यांच्या पुत्रानं ज्या आखाड्याची स्थापना केली त्या आखाड्याचाही समावेश आहे. हा आखाडा म्हणजे, श्री पंचायती बडा उदासीन आखाडा. या आखाड्याचे मुळ स्थान हे प्रयागराज हेच असल्यामुळे आता होणा-या महाकुंभमेळ्यात जणू यजमानपदाचे स्थान प्राप्त झाले आहे. 4 मोठ्या गटांमध्ये विभागलेल्या या श्री पंचायती बडा उदासीन आखाड्याचा इतिहास उत्सुकतापूर्ण आहे. प्रयागराज येथील श्री पंचायती बडा उदासीन आखाडाही प्रयागराजच्या संगमस्थळी उभारण्यात आलेल्या महाकुंभमेळ्याच्या स्थानी पोहचला आहे. या आखाड्याचा भव्य मंडप सजला असून यमध्ये मुख्य स्थान आहे ते गुरू नानक यांचे पुत्र श्रीचंद यांना. याच श्रीचंद यांनी श्री पंचायती बडा उदासीन आखाड्याची स्थापना केल्याची माहिती आहे. प्रयागराज येथेच आखाड्याचे मुख्य स्थान आहे. आता महाकुंभमेळ्यानिमित्त देशभरातून या आखाड्याचे साधू प्रयागराजमध्ये आले असून आखाड्याचा प्रयागराजचा आश्रम या साधू संतांनी गजबजून गेला आहे. (Maha khumbh Mela)

श्री पंचायती बडा उदासीन आखाडा हा सर्व आखाडा परंपरेचा मुळ मानला जातो. उदासीन पंथाच्या 3 आखाड्यांपैकी हा एक आखाडा आहे. या आखाड्याचे महामंडलेश्वर रूपेंद्र प्रकाश महाराज आहेत. त्यांच्याच देखरेखीखाली सध्या या आखाड्याच्या महामंडप प्रयागराज संगमस्थळावर आहे. श्री पंचायती बडा उदासीन आखाडयाचे प्रमुख देवता श्री श्री 1008 चंद्रजी भगवान आणि ब्रह्माजी यांचे चार पुत्र आहेत. हा आखाडा आपल्या उदासीन परंपरेचे पालन करतो. यातील सर्वच साधू या परंपरेचे पालक कठोरपणे करतात. हे सर्वच साधू या परंपरा पाळण्यासाठी रानावनात रहातात. ध्यानधारणा करतात. पानांपासून किंवा सुक्या गवतापासून तयार केलेल्या गादीवर झोपतात. मनुष्याच्या प्रगतीसाठी मनुष्यापासून दूर राहून ध्यान करणे हे या आखाड्यातील साधूंचे उद्दिष्ट असते. या आखाड्याच्या 1600 शाखा आहेत. त्यातून देशभारातील किमान 40 लाख भाविक या आखाड्याचे पाठिराखे आहेत. (Social News)

या आखाड्याच्या मुख्य शाखा प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार आणि त्र्यंबकेश्वर येथे आहेत. या चारही ठिकाणी महाकुंभमेळा होतो. याचस्थानी श्री पंचायती बडा उदासीन आखाड्याचे मोठे आश्रम असून सर्वच महाकुंभमेळ्याच्या आयोजनात या आखाड्याची महत्त्वाची जबाबदारी असते. या चारही महाकुंभस्थानी असलेल्या आखाड्याच्या या आश्रमांना पंगत असे म्हटले जाते. चा सर्वच आश्रमांमध्ये चार महंत असून त्यांच्या देखरेखीखाली या सर्व आश्रमांचा कारभार चालवला जातो. या चारही महंतामध्ये एकाची सर्वसंमतीनं श्रीमहंत म्हणून नेमणूक केली जाते. या श्रीमहंताकडे सर्वश्रेष्ठदर्जा असतो. या आखाड्याची स्थापना गुरु नानक यांचे पुत्र श्रीचंद यांनी केल्यामुळे या आखाड्यात शीख धर्मातील अनेक परंपराही पाळल्या जातात. आखाड्याच्या नावातील उदासीन हा शब्दही याच शिख परंपरेतून आला आहे. उदासीन हा शब्द उदासियान या पंजाबी शब्दाचा अपभ्रंश असल्याची माहिती आहे. गुरू हरगोविंद यांचे पुत्र बाबा गुरंदित्ता यांनी या संप्रदायाच्या स्थापनेत महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळेच श्री पंचायती बडा उदासीन आखाड्यामध्ये भक्त सनातन धर्माच्या परंपरा आणि शीख धर्माची शिकवण या दोघांचेही आनंदाने पालन करतात. (Maha khumbh Mela)

========

हे देखील वाचा : पंच दशनाम आवाहन आखाडा

======

प्रयागराजच्या संगमस्थली या श्री पंचायती बडा उदासीन आखाड्याची मोठा मंडप असून त्याला छावणी असे म्हटले जाते. या शिबिराची सर्व व्यवस्था आखाड्यातील साधूंतर्फे बघितली जाते. आखाड्याच्या छावणीच्या उभारणीतील आवश्यक तांत्रिक बाजूही हे साधू सांभाळतात. याबाबत आखाड्यातील सर्वोच्च साधू महाकुंभमेळा सुरु होण्यापूर्वी साधारण वर्षभर आधी तयारीला जातात. छावणी उभारण्यापासून नंतर होणा-या भोजनावळीसाठी सर्वांची नेमणूक केली जाते. हे साधूच या महाकुंभमेळ्यादरम्यान छावणीतील स्वयंपाकाची जबाबदारी सांभाळतात. हा सर्व स्वयंपाक बहुतांश साजूक तुपामध्ये केला जातो. आखाड्यातील अनेक साधू एकधान्य भोजन करतात. त्यांच्यासाठी वेगळे स्वयंपाकघर असून पहाटेपासून हे भोजनगृह काम करते. यात हजारो भाविकांनाही प्रसाद म्हणून भोजन देण्यात येते. यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी आहे, ते साधू ब्रह्म मुहूर्तावर आपल्या कामाला लागतात. आखाड्यातील काही साधू यापासून वेगळे रहात फक्त धान्यधारणा करतात. या सर्वांची व्यवस्था श्री पंचायती बडा उदासीन आखाड्याच्या मुख्यालयातर्फे केली जाते. (Social News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.