Home » माता सतीचे शक्तीपीठ असलेले माँ तारापीठ मंदिर…

माता सतीचे शक्तीपीठ असलेले माँ तारापीठ मंदिर…

by Team Gajawaja
0 comment
Tarapith Temple
Share

बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाटपासून 8 किमी अंतरावर द्वारका नदीच्या काठावर असलेल्या मॉं तारापीठ मंदिरात (Tarapith Temple) आता देवीच्या भक्तांचा मेळा भरला आहे. माता सतीच्या डोळ्याचा अंश या ठिकाणी असल्याची मान्यता आहे. त्यामुळेच या मंदिराला तारापीठ असे म्हटले जाते. बंगालमध्ये असलेल्या शक्तीपीठांपैकी हे तारापीठ प्रमुख आहे. त्यामुळेच नवरात्रौत्सवात या मंदिरात भक्तांचा अहोरात्र मेळा भरलेला असतो. हे मंदिर तंत्रपीठ असल्याचीही मान्यता असल्यानं या नवरात्रौत्सवात येथे अनेक साधूही देवीच्या दर्शनाला येतात. 

देवीची 51 शक्तीपीठे असल्याची मान्यता आहे. यापैकी 5 शक्तीपीठे पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात आहेत. यामध्ये बकुरेश्वर, नल्हाटी, बंदिकेश्वरी, फुलोरा देवी आणि तारापीठ यांचा समावेश आहे. यापैकी तारापीठ हे सर्वात प्रमुख धार्मिक स्थळ याबरोबरच सिद्धपीठ मानले जाते. पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाटपासून 8 किमी अंतरावर द्वारका नदीच्या काठावर हे मॉ तारपिठ मंदिर(Tarapith Temple) आहे.   

 नवरात्रीमध्ये देवीची तीनवेळा आरती केली जाते,  तर अष्टमीला विशेष पुजा आणि आरती केली जाते.  पौराणिक मान्यतेनुसार या महातीर्थात माता सतीच्या उजव्या डोळ्याच्या बुबुळाचा तारा पडला होता.  त्यामुळे या धार्मिक स्थळाला नयन तारा असेही म्हणतात. त्यामुळेच या मंदिराला तारापीठ (Tarapith Temple) असे नाव पडले. नवरात्रीच्या नऊ दिवसात येथे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते.

विजया दशमीनंतर दोन दिवसांनी, त्रयोदशीला,  तारा देवीला गर्भगृहातून मंदिराच्या आवारात आणण्यात येते.   येथे देवीची पूजा केली जाते. यावेळी स्थानिकांसोबत अन्य ठिकांणाहून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी असते.   तारा मातेची पूजा केल्याने रोगापासून मुक्ती मिळते, अशी धारणा भक्तांमध्ये असल्याने या पुजेचे महत्त्व अधिक वाढले आहे. तारापीठ हे तंत्र साधनेचेही केंद्र मानले जाते.  नवरात्रीच्या नऊ दिवसात येथे साधू-संतांचा मेळावा भरतो. हे साधू-संत देवीच्या आराधनेत मग्न होतात.  नऊ दिवसात देवीच्या दर्शनाला आलेले भक्त या साधूंचाही आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी  करतात.  

या मॉं तारापीठ मंदिराबाबत(Tarapith Temple) अनेक आख्यायिका सांगण्यात येतात. त्यातील बहुतांश आख्यायिका या देवी सतीसंदर्भात आहेत. राजा दक्षने यज्ञाला आमंत्रण न दिल्याने अपमानित होऊन देवी सतीने यज्ञकुंडात उडी मारून आत्महत्या केली, अशी आख्यायिका आहे.  देवी सतीच्या विरहाने भगवान शिव या यज्ञस्थळी पोहचले.  आणि देवी सतीबरोबर राजा दक्षाने केलेल्या व्यवहाराने ते दुःखी झाले.  देवी सती आता आपल्याला दिसणार नाही, हे जाणून त्यांचा क्रोध वाढला. त्यांनी या  क्रोधात यज्ञ मोडला आणि देवी सतीचे शरीर घेऊन ते बाहेर पडले.  या घटनेने सर्व देवही भयभीत झाले. 

भगवान शिवाच्या क्रोधाला आवर घालण्यासाठी भगवान विष्णूंना विनंती करण्यात आली.  त्यांनी देवी सतीच्या शरीराला वेगळे केले. असे मानण्यात येते की,  ज्या ठिकाणी पृथ्वीवर देवी सतीच्या देहाचे अंश पडले त्याच ठिकाणी शक्तीपीठांची स्थापना झाली. देवीच्या डोळ्याचा अंश जिथे पडला तिथेच हे मॉं तारापिठ असल्याची मान्यता आहे. आणखी एका कथेनुसार देवी सतीच्या तीन डोळ्यांचे तारे तीन वेगवेगळ्या ठिकाणी पडले. द्वारका नदीच्या पूर्वेकडे देवी सतीचा तिसरा (उर्ध्वगामी) डोळा पडला, त्याच ठिकाणी उग्रतारा पीठ आहे.  भागीरथीच्या उत्तरेस, त्रियुगी नदीच्या पूर्वेस देवी सतीच्या डाव्या डोळ्यातील रत्न पडले, म्हणून हे स्थान नील सरस्वतीतारा पीठ म्हणून प्रसिद्ध आहे.  

या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वसिष्ठऋषींनी येथे देवी सतीची पूजा, ताऱ्याच्या रुपात केली होती.   त्यामुळेही या शक्तीस्थळाला तारापीठ असे म्हटल्याचे सांगण्यात येते. या मंदिराचा पाया लाल विटांनी बनलेला आहे. मंदिराच्या गर्भगृहात देवीच्या दोन प्रतिमा आहेत. मातेची प्रतिमा  एका धातूच्या प्रतिमेने छळलेली आहे नवरात्रात या मुर्तीला विशेष सजावट करण्यात येते. त्यामुळे मातेचे हे रुप डोळ्यात साठवण्यासाठी भक्तांची गर्दी होते. 

या मंदिरात वर्षभर भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येते. तारापीठ मंदिर (Tarapith Temple) कालीच्या रूपातील भगवान शिवाच्या विनाशकारी पैलूचे प्रतिनिधित्व करते. हे मंदिर भारतीय स्थापत्यशास्त्राचाही उत्तम उदाहरण आहे. देवीच्या मंदिराच्या चारही बाजुला छोटा बुरुज आहे.  सर्व बांधकाम लाल विटांनी केलेले आहे.  गाभाऱ्यात देवीच्या प्रतिमेवर चांदीचा मुकुट आहे. देवीच्या डोक्यावर चांदीची छत्री असून देवीचे कपाळ लाल कुंकुमने सजवले जाते. हे कुमकुम माँ ताराच्या आशीर्वादाचे प्रतीक म्हणून पुजारी भक्तांच्या कपाळावर लावतात.  

=========

हे देखील वाचा : उज्जैनच्या भुखी माता मंदिरात यादिवशी असते भाविकांची गर्दी 

=========

मंदिरात रोज सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत देवीची पूजा होते.  तसेच  पहाटे चार वाजता शहनाई वादन करण्यात येते. आता नवरात्रीच्या नऊ दिवसात पहाटे चार वाजल्यापासून देवीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी आहे. अष्टमीला हा भक्तांचा मेळा अधिक वाढणार आहे…

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.