या वर्षात दोन चंद्रग्रहण आहेत. त्यातील दुसरे चंद्रग्रहण पुढच्या काही तासातच होणार आहे. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हा मोठ्या कुतूहलाचा विषय आहे. या वर्षी दोन चंद्रग्रहण असून एक चंद्रग्रहण यापूर्वीच, 25 मार्च 2024 रोजी झाले. आता दुसरे चंद्रग्रहण 18 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. हे आंशिक चंद्रग्रहण असून जगातील अनेक भागांमध्ये ते दिसणार आहे. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि त्यामुळे पृथ्वीमुळे सूर्यप्रकाश चंद्रावर पडत नाही. या घटनेला चंद्रग्रहण म्हणतात. मात्र या अनोख्या खगोलीय घटनेसोबत यावेळी होणारे चंद्रग्रहण अजून खास ठरणार आहे, कारण सुपरमूनवर यावेळी चंद्रग्रहण होणार आहे. यावेळी आकाशाताले अद्भूत दृश्य बघण्यासाठी अभ्यासकांसह सामान्य नागरिकही उत्सुक आहेत. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. मात्र बहुतांश युरोपीय देशात सुपरमूनवरील हे चंद्रग्रहण दिसणार आहे. (Lunar Eclipses And Supermoons)
पुढच्या काही दिवसात 2024 वर्षातील दुसरे चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण जगातील अनेक देशांमध्ये दिसणार असले तरी भारतातील खगोलप्रेमींना मात्र चंद्रग्रहण बघता येणार नाही. यावेळी होणारे चंद्रग्रहण हे खगोलप्रेमींसाठी अभ्यासाचा एक विषय आहे, कारण या चंद्रग्रहणादरम्यान सुपरमूनही असणार आहे. आंशिक चंद्रग्रहण 17-18 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. भारतीय वेळेनुसार, 18 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी चंद्रग्रहण होईल. मात्र, हे चंद्रग्रहण दिवसा होत असल्याने भारतात दिसणार नाही. जगातील ज्या भागात रात्र असेल त्या भागात हे चंद्रग्रण दिसेल. भारतीय वेळेनुसार, आंशिक चंद्रग्रहण सकाळी 7 वाजून 42 मिनिटांनी सुरु होईल. त्यानंतर तासाभरात म्हणजे, सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी संपेल. सकाळी 8 वाजून 12 मिनिटे हा ग्रहणाचा सर्वोच्च क्षण असेल. (Lunar Eclipses And Supermoons)
वर्षातील हे दुसरे चंद्रग्रहण जगाच्या अनेक भागांत दिसणार आहे. हे उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या बहुतेक भागातून पाहिले जाऊ शकते. यासोबतच आफ्रिका, पश्चिम आशिया आणि रशियाच्या काही भागात आंशिक चंद्रग्रहण दिसणार आहे. ही खगोलीय घटना अंटार्क्टिकाच्या काही भागातही दिसणार आहे. या चंद्रग्रहणाच्यावेळी आणखी एक खगोलीय घटना होणार आहे. सप्टेंबर विषुववृत्ताच्या जवळ असल्यामुळे, ही उन्हाळ्यातील शेवटची पौर्णिमा असणार आहे. या काळात चंद्र सामान्य पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा मोठा दिसेल. त्यामुळे याला सुपरमून असेही म्हणतात. याशिवाय या सुपरसूनला युरोपीय देशात हार्वेस्ट मून म्हणूनही ओळखला जाते. हे नाव प्राचीन काळी शेतकऱ्यांनी दिले होते. यंत्रे आणि दिव्यांचा शोध लागण्यापूर्वी शेतकरी रात्रीच्या वेळी पिकांची कापणी करण्यासाठी चंद्रप्रकाशावर अवलंबून असत. चंद्राचा आकार मोठा झाला की विषुववृत्ताच्या पौर्णिमेला शेतकरी पीक कापणीला जात असत. म्हणूनच या भागातील शेतक-यांनी या सुपरमूनला हार्वेस्ट मून म्हटले होते. हे चंद्रग्रहण युरोप, आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी महासागर, आर्क्टिक, अंटार्क्टिका या मर्यादित भागात दिसणार आहे. (Lunar Eclipses And Supermoons)
==============
हे देखील वाचा : हि-यांचा ग्रह !
===============
चंद्रग्रहणाचे तीन प्रकार आहेत. पहिले पूर्ण चंद्रग्रहण. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीत प्रवेश करतो तेव्हा असे घडते, ज्यामुळे चंद्र लाल होऊ शकतो. म्हणूनच याला ब्लड मून असेही म्हणतात. दुसरे म्हणजे पेनम्ब्रल चंद्रग्रहण. जेव्हा चंद्र बाह्य सावलीत जातो तेव्हा त्याला पेनम्ब्रल चंद्रग्रहण असेही म्हणतात. या काळात चंद्र किंचित गडद होतो आणि दुर्बिणीनेही तो पाहणे कठीण होते. तिसरे म्हणजे आंशिक चंद्रग्रहण. नावाप्रमाणेच, जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र पूर्णपणे संरेखित नसतात तेव्हा आंशिक चंद्रग्रहण होते. त्यामुळे चंद्राचा फक्त एक भाग पृथ्वीच्या सावलीत येतो. 18 सप्टेंबर 2024 चे चंद्रग्रहण झाल्यावर पुढील संपूर्ण चंद्रग्रहण 4 मार्च 2025 रोजी होईल. हे ब्लड मून प्रकारातील चंद्रग्रहण असणार आहे. यात तब्बल एक तास ‘ब्लड मून’ अमेरिका, कॅनडा आणि दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांना दिसेल. त्याची झलक उत्तर आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर पहाटे पहायला मिळेल. अर्थात हे चंद्रग्रहणही भारतातून दिसणार नाही. (Lunar Eclipses And Supermoons)
सई बने