२०२६ मधील पहिले चंद्रग्रहण मंगळवार, ३ मार्च २०२६ रोजी होत आहे. हे ग्रहण भारतात आंशिक चंद्रग्रहण म्हणून दिसेल, म्हणजेच ग्रहण फक्त चंद्रोदयाच्या वेळीच दिसणार आहे. त्यामुळे भारतात ग्रहणाचा सुतक नियम लागू होणार आहे. ग्रहण काळात बहुतांश मंदिरे बंद करण्यात येतात, कारण या काळात नकारात्मक ऊर्जा जास्त असते असे मानले जाते. मात्र असे असले तरी भारतातील काही मंदिरे ग्रहण काळातही भाविकांसाठी खुली असतात. त्यात श्रीकालहस्ती मंदिर, जगन्नाथ पुरी मंदिर आणि इस्कॉन मंदिरांचा समावेश आहे. शिवाय अन्य काही मंदिरेही ग्रहण काळात खुली असतात. यामागील धारणा अशी आहे की भगवान शंकर स्वतः या काळात राहू आणि केतूचे नियंत्रण करतात. इस्कॉनची मंदिरेही ग्रहण काळात खुली असतात. त्यामागे अशी भावना आहे की ग्रहण ही फक्त खगोलीय घटना आहे आणि कोणत्याही खगोलीय घटनेमुळे भक्तीमध्ये व्यत्यय येऊ नये. याच भावनेने इस्कॉन मंदिरांमध्ये ठरलेल्या वेळेनुसार आरती आणि नामजप केला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उज्जैनचे प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरही ग्रहण काळात भाविकांसाठी खुले असते. या मंदिरात ग्रहणांच्या वेळी भस्म आरती आणि दर्शन सुरू राहते. महाकाल म्हणजे काळ आणि मृत्यूचा देव असल्यामुळे ते ग्रहणांपासून अप्रभावित असतात. ते अजिंक्य आहेत आणि या काळातही त्यांच्या भक्तांचे रक्षण करतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे ग्रहण काळात महाकाल मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी असते.

वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण ३ मार्च रोजी होणार आहे. या चंद्रग्रहणाच्या वेळी भारतातील बहुतांश मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी बंद असतात. ग्रहण सुटल्यानंतर देवाला जलाभिषेक करून मंत्रघोषात दरवाजे उघडण्यात येतात. ग्रहणकाळामध्ये नकारात्मक ऊर्जा असल्याची धारणा असल्यामुळे मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात. ग्रहणकाळ संपल्यानंतर संपूर्ण मंदिराची स्वच्छता करून मंदिर भाविकांसाठी खुले केले जाते. मात्र भारतातील काही मोजक्या मंदिरांचे दरवाजे ग्रहण काळातही सदैव खुले असतात. यातील प्रमुख मंदिर म्हणजे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर. या मंदिराचे दरवाजे कधीही बंद होत नाहीत. येथे महाकालच्या रूपात स्वयंप्रकट भगवान विराजमान आहेत आणि त्यांची शक्ती ग्रहणांपासून अप्रभावित मानली जाते. त्यामुळे ग्रहण असो वा इतर कोणताही प्रसंग, मंदिराचा मुख्य दरवाजा सदैव खुला असतो. महाकालेश्वर यांना काळाचा स्वामी मानले जाते, म्हणून त्यांना ग्रहणाच्या सुतक काळापासून मुक्तता आहे. ग्रहणांच्या वेळी महाकालचे दर्शन घेतल्याने सर्व व्याधी दूर होतात, अशी मान्यता असल्यामुळे या काळात मोठी गर्दी होते.
यानंतर दिल्लीतील कालकाजी मंदिराचा उल्लेख होतो. या मंदिराचे दरवाजेही ग्रहण काळात खुले असतात. देवी कालका ही कालचक्राची रक्षा करते आणि सर्व ग्रह-ताऱ्यांचे नियंत्रण करते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे चंद्रग्रहण असो वा सूर्यग्रहण, त्याचा मंदिरावर परिणाम होत नाही, असे येथील पुजारी सांगतात. ग्रहणांच्या वेळी येथे नामजप आणि कीर्तनाचे आयोजन केले जाते. उत्तराखंडमधील प्रसिद्ध कल्पेश्वर मंदिरही ग्रहणांच्या वेळी उघडे राहते. अशी मान्यता आहे की याच ठिकाणी भगवान शंकरांनी माता गंगेच्या प्रवाहाचे नियंत्रण केले. एवढी शक्ती असलेल्या या स्थानी ग्रहण काळातही दरवाजे खुले असतात. केरळमधील कोट्टायम येथे असलेले श्रीकृष्ण मंदिर देखील ग्रहण काळात बंद होत नाही. येथे भगवान श्रीकृष्णाला दिवसातून दहा वेळा अन्नदान केले जाते. देवाच्या अन्नदानामध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून मंदिराचे दरवाजे कधीही बंद केले जात नाहीत, अगदी ग्रहण काळातही.
=======
हे देखील वाचा : Aircraft Carrier Power : युद्धनौकांची दहशत
=======
बिहारच्या गया येथील विष्णुपाद मंदिरही ग्रहण काळात भाविकांसाठी खुले असते. हे मंदिर पिंडदानासाठी प्रसिद्ध आहे. ग्रहण काळात पिंडदानाला विशेष महत्त्व असल्यामुळे येथे या काळात पिंडदान केले जाते. राजस्थानमधील बिकानेर येथील लक्ष्मीनाथ मंदिराचे दरवाजेही ग्रहण काळात खुले असतात. आंध्रप्रदेशमधील श्रीकालहस्ती मंदिर राहू-केतू पूजेसाठी प्रसिद्ध असल्यामुळे ग्रहण काळात उघडे राहते. वाराणसीतील काही मंदिरे आणि काही इस्कॉन मंदिरेही ग्रहणांच्या वेळी भाविकांसाठी खुली असतात. या काळात येथे सतत नामजप आणि पूजा केली जाते.
– सई बने
