लखनऊच्या एकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कृणाल पांड्याच्या लखनऊने रोहित शर्माच्या मुंबईचा पाच धावांनी पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. याचबरोबर त्यांनी आपला प्लेऑफचा मार्गदेखील सुकर केला. मुंबईचा प्लेऑफचा मार्ग या पराभवानंतर थोडा खडतर होऊन गेला आहे. हातात असलेला एक सामना जिंकून मुंबईला दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर नजर ठेवून राहावे लागणार आहे.(LSG vs MI)
प्रथम फलंदाजी करतांना खराब सुरुवातीनंतरदेखील लखनऊच्या संघाने ३ बाद १७७ धावांपर्यंत मजल मारली. फलंदाजीसाठी तेवढ्याशा अनुकूल नसलेल्या खेळपट्टीवर लखनऊचे सलामीवीर तेवढीशी कमाल करू शकले नाहीत. जेसन बेहरनडॉफने दिपक हुड्डाला अवघ्या पाच धावांवर असतांना पव्हेलीयनचा रस्ता दाखवला. दिपक हुड्डानंतर डीकॉकदेखील जास्त वेळ तग धरू शकला नाही. १६ धावांच्या वैयक्तिक धावसंखेवर असतांना अनुभवी पियुष चावलाने त्याचा बळी मिळवला.(LSG vs MI)
दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर आलेल्या प्रेरक मंकडला तर पहिल्याच चेंडूवर माघारी परतावे लागले. संघाचे तीन फलंदाज लवकर बाद झालेले असतांना संघांचा कर्णधार कृणाल पांड्या आणि अष्टपैलू मार्कसने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. संथ खेळपट्टीला समजून घेत त्यांनी संयमाने फलंदाजी केली. खेळपट्टीवर तग धरून राहत त्यांनी संघाला अवघड स्थितीतून बाहेर काढले. शेवटच्या काही षटकांत मार्कसने तुफान फटकेबाजी करत संघाला चांगल्या स्थितीत नेवून ठेवले. त्यादरम्यान कर्णधार कृणाल पांड्या ४९ धावांवर असतांना दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. मार्कसने ४७ चेंडूत ४ चौकार आणि ८ षटकारांसह ८९ धावा ठोकल्या.(LSG vs MI)
लखनऊने दिलेल्या विशाल लक्षाचा पाठलाग करायला उतरलेल्या मुंबईची सुरुवात अत्यंत उत्तम झाली. ईशान किशन आणि रोहित शर्माने मैदानाच्या चहूबाजूला फटकेबाजी करत ९० धावांची सलामी दिली. दहाव्या षटकात मात्र रवी बिष्णोईच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित शर्मा झेलबाद झाला. त्यानंतर लगेचच बिष्णोईने ईशान किशनला देखील पव्हेलीयनचा रस्ता दाखवला. रोहित शर्माने बाद होण्यापूर्वी २५ चेंडूत ३७ धावा केल्या तर ईशान किशनने शानदार अर्धशतक ठोकले.
लयीत असलेल्या सुर्यकुमार यादवला आपली कमाल दाखवता आली नाही. आपला आवडता शॉट खेळण्याच्या नादात तो अवघ्या सात धावांवर त्रिफळाचीत झाला. नेहाल वढेराला देखील वेगवान फटकेबाजी करण्यात अपयश आले. २० चेंडूंचा सामना करत तो अवघ्या १६ धावा करू शकला. एकानंतर एक फलंदाज बाद झाल्याने रनगती कमी झाली आणि मुंबईला आपल्या लक्षापर्यंत पोहोचता आले नाही. शेवटच्या काही षटकात फटकेबाजी करत टिम डेव्हिडने सामना जिवंत ठेवला होता परंतु त्याला संघाला विजयापर्यंत नेता आले नाही.(LSG vs MI)
======
हे देखील वाचा : गुजरातचा प्लेऑफ मध्ये प्रवेश तर मुंबईचा दुसऱ्या स्थानाचा निर्धार
======
तत्पूर्वी मुंबईकडून जेसन बेहरनडॉफने ४ षटकात ३० धावा देत २ बळी मिळवले तर पियुष चावलाने ३ षटकात २६ धावांच्या मोबदल्यात १ बळी मिळवला. लखनऊकडून रवी बिष्णोईने सुंदर खेळाचे प्रदर्शन करत ४ षटकात २६ धावांच्या मोबदल्यात २ बळी मिळवले तर यश ठाकूर आणि मोहसिन खान यांनी अनुक्रमे २ आणि १ बळी मिळवले. या पराभवानंतर मुंबईचा प्लेऑफ मार्ग खडतर झाला आहे तर लखनऊच्या संघाने प्लेऑफच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या सामन्यात विजय मिळवत आपल्या प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत.