पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खानला (Imran Khan) अटक करण्यात आली. अल-कादिर ट्रस्ट घोटाळ्याप्रकरणी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोच्या आदेशानुसार पाकिस्तानी रेंजर्सनी माजी पंतप्रधान असलेल्या इम्रान खान (Imran Khan) यांना अक्षरशः फरफटत नेलं. त्यांच्या कॉलरला पकडून त्यांना गाडीत कोंबण्यात आलं. इम्रान खान यांना ज्या प्रकरणात अटक झाली आहे तो, अल कादिर ट्रस्ट घोटाळा सुमारे 60 अब्ज पाकिस्तानी रुपयांचा आहे. त्यात इम्रानसह त्यांची पत्नी बुशरा बीबी आणि बुशराची मैत्रीण फराह गोगी यांचीही हातभार आहे. इम्रान यांना अटक होताच त्यांच्या पीटीआय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानमध्ये आंदोलन सुरु केले आहे. यात संपूर्ण पाकिस्तानच अस्थिर झाल्याचे रुप आहे.
‘हमारे कप्नान को छोड दो’ अशीच इम्रान खान (Imran Khan) यांच्या चाहत्यांची मागणी आहे. एक क्रिकेटपट्टू ते देशाचा पंतप्रधान असा प्रवास केलेल्या इम्रान खानची प्रतिमा एक लव्हर बॉय म्हणून जास्त लोकप्रिय होती. क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तान क्रिकेट संघाचा हुकमी एक्का म्हणून इम्रान खानकडे पाहिलं जात असे. याच दरम्यान इम्रान खान आणि त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चाही तेवढीच केली जायची. क्रिकेटनंतर राजकारणात आलेल्या इम्रान खान यांची ही लव्हर बॉयची प्रतिमा काही बदलली नाही. त्यांनी तिसरे लग्न केले ते बुशारा बेगम यांच्याबरोबर. राजकारणात त्यांना या बुशारा बेगम यांचा मोठा पाठिंबा मिळाला. पण त्याआधीचीही इम्रान यांची दोन लग्न गाजली आणि त्यांचे घटस्फोटही. याव्यतिरिक्त प्रेमप्रकरणंही तेवढीच गाजली.

लग्नाआधी पिता झालेल्या इम्रान खान (Imran Khan) यांच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच चढ-उतार आहेत. तीन पत्नी आणि मैत्रिणी असा सगळा गोतावळा सांभाळणा-या इम्रान खान यांना यांचे वैयक्तिक आयुष्य रंगेल असेच आहे. सध्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान असलेल्या इम्रान खानवर (Imran Khan) 140 हून अधिक खटले सुरू आहेत. त्यातील एका प्रकरणात त्यांना अटक झाली असून या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्या अटकेच्या आधी त्यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडिओ शेअर करत, मला अटक झाल्यास तरुणांनी पुढे यावे असे आवाहन केले आहे. मात्र आता तरुणांना आवाहन करुन आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त करणा-या इम्रान खान हे तरुणपणी रंगेल व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. इम्रान यांच्या प्रेमप्रकरणाबाबत एक हकीगत सांगितली जाते. ही घटना 1987-88 मधील आहे. तेव्हा इम्रान खान हे नाव पाकिस्तानी क्रिकेटमध्ये स्टारच्या भूमिकेत होतं. इम्रान इंग्लंडला असतांना त्याची लंडनच्या यूके स्ट्रीट नाईट क्लबमध्ये सीता व्हाईटबरोबर भेट झाली. सीता, इटलीची रहिवासी होती आणि तिचे लग्न झाले होते. पहिल्याच भेटीत दोघंही प्रेमात पडले. सीता ही विवाहित होती. काही काळानंतर या प्रेमप्रकरणावर विराम पडला. मात्र या प्रेमात तिस-याची एन्ट्री झाली होती. सीता गरोदर राहिली. तेव्हा इम्राननं होणा-या बाळाचे लिंग कुठले आहे, हे जाणून घेतले. सीताला मुलगी होणार होती, वैद्यकीय अहवालात हे स्पष्ट झाल्यावर इम्राननं या मुलीचे पालकत्व घेण्यास नकार दिला. कारण त्याला मुलगा हवा होता. पुढे सीताला मुलगी झाले. तिचे नाव टायरियन खान व्हाईट असे आहे. टायरियनसाठी सीता कोर्टात गेली. कॅलिफोर्निया कोर्टाने इम्रानला टायरियन खान व्हाईटचे वडील घोषित केले. पण पाकिस्तानच्या जनतेला आता समानतेची वागणूक देण्याचं आश्वासन देणारा इम्रान अजूनही टायरियनला आपली मुलगी मानत नाही.
त्यानंतर 42 वर्षीय इम्रान (Imran Khan) ब्रिटिश अब्जाधीश जेम्स गोल्डस्मिथ यांची मुलगी जेमिमा हिच्याबरोबर प्रेमात पडला. हे प्रेमप्रकरण खूप गाजलं. कारण जेमिमाचे वडिल हे अब्जाधीश आणि राजघराण्याशी संबंधित होते. इम्राननं जेमिमाबरोबर लग्न केलं. हे त्याचं पहिलं लग्न. त्यावेळी जेमिमा 21 वर्षाची तर इम्रान 42 वर्षाच्या पुढे. 2004 पर्यंत हे लग्न टिकलं. नंतर दोघांचा घटस्फोट झाला. इम्रानची प्रेमप्रकरणं हे जेमिमाच्या नाराजीचे कारण असल्याचे स्पष्ट झालं होतं. जेमिमाला सुलेमान आणि कासिम ही दोन मुलं आहेत. वयाच्या 30 व्या वर्षी जेमिमा या दोन्ही मुलांना घेऊन ब्रिटनमध्ये गेली, ती कायमचीच. या जेमिमावरही पाकिस्तानमधील पुरातन वस्तूंची तस्करी केल्याचा आरोप आहे.
========
हे देखील वाचा : Al Qadir Trust Case नक्की काय आहे? ज्यामुळे इमरान खान यांना अटक झालीय
========
इम्रानचा दुसरा विवाह 6 जानेवारी 2015 रोजी रेहम खानसोबत झाला. रेहम ही पत्रकार आहे. रेहमचेही हे दुसरे लग्न होते. पण या दोघांमध्ये फार काळ सलोख्याचे संबंध राहिले नाहीत. अवघ्या नऊ महिन्यात इम्रान आणि रेहमचा घटस्फोट झाला. रेहमला पहिल्या लग्नापासून तीन मुलं होती. या मुलांना घेऊन ती इम्रानपासून दूर झाली.
इम्रान खानने 2018 मध्ये पंजाबच्या राजकीय घराण्यातील बुशरा बीबीशी तिसरे लग्न केले. या लग्नानं बरीच खळबळ उडाली. कारण बुशारा बीबीची प्रतिमा काळी जादू करणारी अशी आहे. बुशराचेही हे दुसरे लग्न आहे. 2015 मध्ये बुशरा आणि इम्रान पहिल्यांदा भेटले. तेव्हापासून राजकारणात इम्रानचा दर्जा वाढत गेला. बुशरा बीबी पाकिस्तानमधील राजकीयदृष्ट्या प्रभावशाली वट्टू कुटुंबातून येते. बुशरा बीबी अध्यात्मिक मार्गदर्शक म्हणूनही ओळखली जाते. पहिल्या लग्नापासून बुशराला पाच मुले आहेत. इम्रान खानबरोबर लग्न झाल्याबरोबर बुशारा बीबीला राजकारणात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. आता ज्या प्रकरणात इम्रानला अटक झाली आहे. त्यामागे प्रमुख बुशारा असल्याची माहिती आहे. इम्रानची पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची खुर्ची डळमळीत झाल्यावर याच बुशराने पंतप्रधानांच्या निवासस्थानात अनेक कोंबड्यांना जिंवत जाळल्याचा आरोपही करण्यात आला असून बुशारा जादूटोणा करते, असा आरोपही लावण्यात आला आहे. आता इम्रानला अटक झाल्यावर या बुशारालाही अटक होणार अशी चर्चा पाकिस्तानच्या राजकारणात आहे.
सई बने