गेल्या काही वर्षात चीनमधील लोकसंख्या झपाट्यानं कमी होत आहे. या देशानं राबविलेल्या एक कुटुंब एक मुल या धोरणाचा अत्यंत भीषण परिणाम देशाच्या भविष्यावर झाला आहे. पुढील काही वर्षात चीनचे अस्तित्वच धोक्यात येईल अशी परिस्थिती आहे. देशाच्या अस्तित्वावर आलेले हे संकट दूर करण्यासाठी चीन सरकारनं अनेक योजना राबवायला सुरुवात केली आहे. चीनमध्ये आता चक्क विद्यापीठातच प्रेमाचे धडे देण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून असलेल्या एक मुल धोरणामुळे चिनमधील नातेसंस्था बिघडली आहे. त्यातच वाढती महागाई आणि नोकरीच्या ठिकाणी असलेल्या जबाबदा-या यामुळे तेथील तरुण पिढी ही कुटुंबसंस्थेपासून दूर गेली आहे. या सर्वांचा परिणाम तेथील जनसंख्या वृद्धीवर झाला. त्यामुळे चीन प्रशासन आता तरुणांना लग्न करण्यासाठी प्रोत्साहीत करीत आहे. (China)
त्यासाठी महाविद्यालयात विशेष वर्ग घेण्याचा प्रस्ताव आहे. फारकाय लग्न आणि बाळंतपणासाठी सरकारनं विशेष निधी देण्याचीही योजना आखली आहे. महासत्ता बनू पाहणा-या चीनसाठी घटता प्रजनन दर ही सध्याची सर्वात मोठी समस्या बनली आहे. यामुळे या देशात पुढच्या पाच वर्षात सर्वाधिक वृद्ध नागरिक असणार आहेत. मात्र तरुणांचे प्रमाण झपाटयानं कमी होणार आहे. यासाठी चीन सरकार अनेक प्रयोग राबवत आहे, या प्रयोगातून प्रजनन दर वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी अनेक विचित्र प्रयोगही चीनी सरकार करीत आहे. चिनी कंपन्या ऑफिसमध्ये प्रेम आणि लैंगिक संबंध ठेवण्यासाठी, डेटिंगसाठी, मूल होण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. कर्मचाऱ्यांना लग्नासाठी मोठमोठे पॅकेज दिली जात आहेत. (International News)
आता या सर्वांच्या पुढे जाऊन चिनी विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्येही विद्यार्थ्यांना प्रेमाचे धडे देण्यात येणार आहेत. चिनी विद्यापिठात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल त्यासाठी समोर ठेवण्यात आला आहे. यानुसार चिनी महाविद्यालयातील 57% विद्यार्थ्यांना शैक्षणिक दबावामुळे नातेसंबंधांमध्ये रस नाही. हेच विद्यार्थी पुढे नोकरी करु लागले की त्यांना त्यांच्या नोकरीत सातत्यानं प्रमोशन आणि पगारवाढ हवी असते. यासाठी त्यांना नातेसंबंध वाढवण्यात वेळ देणे म्हणजे, मोठे नुकसान करुन घेण्यासारखे वाटते. या सर्वांतून विद्यार्थ्यांना बाहेर काढायचे असेल तर त्यांना महाविद्यालयीन शिक्षणात प्रेम, नातेसंबंध, कुटुंबाची गरज याबाबत शिक्षण देण्याची गरज असल्याचे चीन सरकारचे मत आहे. यासाठी आता चीन सरकारनं चीन मधील सामाजिक संस्थानाही आवाहन केले आहे. त्यांनी विद्यापिठात जाऊन विद्यार्थ्यांना विवाहाचे महत्त्व किती आहे, हे सांगावे असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या 1.4 अब्ज लोकसंख्या असलेला चीन झपाट्याने वृद्ध होत आहे. यात निवृत्त होणा-यांची संख्या अधिक होत असल्यामुळे सरकारी तिजोरीवरचा बोजा वाढत आहे. भविष्यात चीनमध्ये कारखाने चालू ठेवायचे असतील तर अन्य देशातील कामगार आयात करावे लागतील अशी गंभीर परिस्थिती आहे. ही सर्व परिस्थिती लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी चीनने 1979 मध्ये लागू केलेल्या एक मूल धोरणामुळे ओढावली आहे. या काळात एकापेक्षा जास्त अपत्ये होण्यास सक्त बंदी होती. (China)
====
हे देखील वाचा : चीनमध्ये सोन्याचा पाऊस !
========
यामुळे चीनची लोकसंख्या नियंत्रित झाली आणि आर्थिक प्रगतीचा वेगही वाढला. पण आता 45 वर्षानंतर या योजनेचे दुष्परिणाम समोर आले आहेत. या योजनेमुळेच चीन आता जगातील सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या असलेला देश होऊ पहात आहे. असे झाले तर चीनच्या प्रगतीचे चक्र उलटे फिरणार आहे. त्यामुळेच आता चीनमध्ये तीन मुले जन्माला घालण्यास परवानगी देण्यात आली आहे. तीन मुले जन्माला घालणा-याला दाम्पत्याला विशेष सुविधाही देण्यात येत आहेत. तसेच या मुलांसाठी मोफत शिक्षणाची योजना सरकारची आहे. चायना अकादमी ऑफ सोशल सायन्सेसने 2019 मध्ये या सर्वांबाबत केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक अहवाल समोर आला आहे. यानुसार या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजेच 2050 पर्यंत चीनची लोकसंख्या 1 अब्ज 36 कोटींवर येईल. परंतु, कामगार संख्या केवळ 20 कोटींवर असणार आहेत. बाकी लोकसंख्या ही वृद्ध असणार आहे. असाच हा दर घटता राहिला तर चिनमधील कारखान्यांना टाळे लावावे लागणार आहे. यामुळे या देशात मोठे आर्थिक संकट निर्माण होणार आहे. हे सर्व टाळण्यासाठी आता चीन सरकार महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना प्रेमाचे धडे देणार आहे. (International News)
सई बने