श्री राम हे नाव कानी पडताच करोडो भारतीयांचे हात आपसूक जोडले जातात. समस्त भारतीयांच्या मनावर राज्य करणा-या प्रभू श्रीरामांना अयोध्येत भव्य अशा मंदिरात विराजमान करण्यात येणार आहे. अयोध्येत होत असलेल्या या प्रभू श्रीरामांच्या मंदिरात आपले प्रभू कधी विराजमान होणार याची उत्सुकता तमाम देशवासीयांना लागली होती. तो दिवस आता कुठला असेल हे स्पष्ट झाले आहे. नव्या वर्षात, म्हणजे, 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लांच्या मुर्तीची अभिषेक घालून प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी 22 जानेवारीला दुपारी 12.30 ची वेळ नक्की करण्यात आली आहे. आता नेमकी दुपारी 12.30 हीच वेळ का निवडली आहे, याची चर्चा सुरु झाली आहे. सर्वातील पवित्र असा हा मुहूर्त असून रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी यासारखा दुसरा कुठलाच उत्तम मुहूर्त असू शकत नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. (Ayodhya Temples)
22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंतचा शुभ काळ प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या अभिषेकसाठी निवडण्यात आला आहे. या एक तासाच्या कालावधीत मूर्तीचा अभिषेक केला जाईल. त्याआधी 17 जानेवारी 2024 पासून या अभिषेक सोहळ्याची तयारी सुरु होणार आहे. 5 दिवस अगोदर पासून संबंधित पुजा विधी करण्यात येणार आहेत. या दिवशी शिवयोग असेल. यानंतर अनुक्रमे सिद्ध, साध्या, शुभ, शुक्ल आणि ब्रह्मयोग असे 6 शुभ योग तयार होतील. 22 जानेवारीला सूर्योदयापासून ब्रह्मयोग असेल, ब्रह्मयोग सकाळी 8.46 वाजता संपल्यानंतर आयंद्र योग होईल. हा सर्व सोहळा झाल्यावर प्रभू रामांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांना दुस-या दिवसाची वाट पाहावी लागणार आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवारी भाविकांना भौम प्रदोषाचे दर्शन होणार आहे. मंगळवारी होणाऱ्या प्रदोष व्रताला भौम प्रदोष म्हणतात. 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून मृगशीर्ष नक्षत्र असेल. हे नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते. मृगशीर्ष नक्षत्रामुळे हा शुभ मुहूर्त रामलल्ला विराजमान करण्यासाठी काढण्यात आला आहे. (Ayodhya Temples)
ज्योतिषशास्त्रानुसार मृगशीर्ष नक्षत्र हे शेतीचे काम, व्यवसाय आणि परदेश प्रवासासाठी उत्तम मानले जाते. या शुभ मुहूर्तावर प्रभू रामचंद्रांच्या मुर्तीवर अभिषेक केल्यास देशाची प्रगती होईल. शास्त्रात पाच प्रकारच्या बाधांचा उल्लेख आहे. ज्यामध्ये रोग, अग्नि, नियम, चोर आणि मृत्यू यांचा समावेश आहे. रामललाच्या जीवन अभिषेकाच्या शुभ मुहूर्तावर एकही बंदी नाही. हा 22 जानेवारीचा दिवस म्हणजे, अनेक शुभ संयोगांचा एक दुर्मिळ संयोग आहे. त्यामुळे या मंदिराला शतकानुशतके स्थैर्य आणि प्रतिष्ठा मिळणार असल्याचे जाणकारांनी सांगितले. (Ayodhya Temples)
याशिवाय सोमवार, 22 जानेवारी 2024, पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील कूर्म द्वादशी आहे. कूर्म द्वादशी व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. विष्णु पुराणानुसार, या तिथीला भगवान विष्णूंनी कूर्म म्हणजेच कासवाचा अवतार घेतला होता. त्यानंतरच समुद्रमंथन झाले. पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार घेऊन मंदार पर्वताला आपल्या पाठीवर घेतले. तेव्हापासून कच्छपाचे रूप स्थिरतेचे प्रतीक मानले गेले आहे. कूर्म द्वादशीच्या दिवशी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केल्याने मंदिराला शतकानुशतके स्थिरता प्राप्त होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मकर संक्रांतीच्या काळात 16 जानेवारी ते 24 जानेवारी 2024 या तारखा शुभ मानल्या जातात. मंदिर ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांच्या सांगण्यानुसार यापूर्वी 24 जानेवारी ही तारीख अभिषेकसाठी निवडण्यात आली होती. दरम्यान, मंदिर ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंद देव गिरी यांनी काशी आणि इतर मठ आणि मंदिरांच्या विद्वान आणि आचार्यांशी चर्चा केली. भगवान श्रीरामांचा जन्म अभिजीत योगात झाला होता. 24 तारखेला हा योग अल्प कालावधीसाठी तयार होत होता. पण 22 जानेवारीला हा अभिजित योग दीर्घ कालावधीचा आहे. त्यामुळे 22 जानेवारी 2024 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक सोहळ्याला देशातील 4000 संत-महात्मे आणि समाजातील 2500 मान्यवर उपस्थित राहणार आहेत. (Ayodhya Temples)
तीन वर्षांपूर्वी 5 ऑगस्ट 2020 रोजी जेव्हा राम मंदिराची पायाभरणी झाली. यावेळी या मुहूर्तावरुन वाद झाला होता. वाराणसीच्या संत आणि ज्योतिषींनी याबाबात प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार 5 ऑगस्ट रोजी दुपारी 12:05 वाजता राम मंदिराच्या पायाभरणीसाठी शुभ मुहूर्त अशुभ होता. ज्योतिष पीठ आणि शारदा पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी सूर्य दक्षिणायन असताना हा संपूर्ण क्षण अत्यंत अशुभ म्हणून घोषित केला होता. त्यावेळी झालेला हा विरोध लक्षात घेऊन यावेळी मंदिर ट्रस्टने काशी आणि इतर ठिकाणच्या मठ आणि मंदिरांशी शुभ मुहूर्तावर चर्चा केली आहे.
श्रीरामांच्या मुर्तीवर अभिषेक सोहळ्याच्या दोन दिवस आधी सर्वसामान्य भाविकांना दर्शन सुविधा बंद होण्याची शक्यता आहे. हा सोहळा खूप मोठा असून त्यात देशविदेशातील मान्यवरही सहभागी होणार आहेत. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी एसपीजी घेणार आहे. त्यासाठी हा परिसर दोन दिवस सर्वसामान्यांसाठी बंद होऊल, अशी शक्यता आहे. मात्र अयोध्येत आधीच उपस्थित असलेल्या भाविकांसाठी अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने एलईडीद्वारे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. (Ayodhya Temples)
==========
हे देखील वाचा : इंद्रदेवही या देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात…
==========
दरम्यान, आंध्र प्रदेशातील प्रभू रामचंद्रांचे भक्त सी. श्रीनिवासन यांनी प्रभू रामांसाठी एक किलो सोन्याचे सिंहासन दान करणार असल्याची घोषणा केली आहे. सिंहासनासोबतच श्रीनिवासन 8 किलो चांदीच्या चरण पादुकाही भगवान रामांच्या चरणी अर्पण करणार आहेत. सी. श्रीनिवासन हे कांची शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांचे शिष्य आहेत. या पादुकांमध्ये 10 बोटांच्या जागी रत्ने आहेत. याशिवाय पादुकांवर भगवान श्रीरामाशी संबंधित गदा, कमळ, स्वस्तिक, सूर्य आणि चंद्र अशी चिन्हे आहेत. श्रीनिवासन यांनी 40 दिवस अयोध्येतील नंदीग्राम, भारत कुंड आणि सूर्य कुंड येथे या चरण पादुकांवर पुजा केली आहे. अयोध्येच्या 84 कोसी परिक्रमेच्या मार्गावर येणाऱ्या सर्व धार्मिक स्थळांवर चरण पादुका पूजन करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामांच्या अभिषेक सोहळ्याची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसा तमाम भारतीयांमध्ये उत्साह वाढू लागला आहे.
सई बने