भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश यांना पंचतत्त्व अथवा पंचमहाभूते म्हणून ओळखले जाते. याच पंचत्त्वांवर आधारीत मंदिरेही आपल्या देशात आहेत. दक्षिण भारतात या पंचमहापुतांवरील आधारीत मंदिरांची तिर्थयात्रा करणे, मानाचे समजले जाते. बहुतांशी मंदिरात दिवळीच्या आधी पंधरादिवसांपासून मोठा उत्सव सुरु होतो. हे सर्व धार्मिक सोहळे देवदिवाळीपर्यंत मोठ्या उत्सहात संपन्न होतात. अशाच एका मंदिराचे नाव आहे, एकंबरेश्वर मंदिर. तामिळनाडूमधील कांचीपुरम शहरात असलेले हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. शैव धर्माच्या हिंदू पंथासाठी हे पाच तत्वांशी संबंधित मंदिरांपैकी एक मंदिर आहे.
एकंबरेश्वर मंदिर हे पृथ्वीतत्वाचे प्रतिक मानले जाते. या मंदिरात भगवान शंकराची पूजा एकंबरेश्वर किंवा एकंबरनाथर किंवा राजलिंगेश्वरम म्हणून केली जाते. येथेच माता पार्वतीनं आंब्याच्या झाडाखाली बसून भगवान शंकराची तपश्चर्या केली होती. माता पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी येथे प्रत्यक्ष भगवान शंकर आल्याचे सांगितले जाते. तसेच ज्या झाडाखाली बसून पार्वतीमातेनं तपश्चर्या केली होती, ते झाड अद्यापही या मंदिर परिसरात आहे. हे झाड 3500 वर्ष जुने असल्याचे मानले जाते. तसेच या अंब्याच्या प्रत्येक फांदीला आलेल्या आंब्यांची चव वेगळी असल्याचे सांगितले जाते. (Shiv Temple)
एकंबरेश्वर मंदिर हे तामिळनाडूमधील कांचीपुरम मंदिरातील सर्वात मोठे आणि भव्य शिव मंदिर आहे. या मंदिराची गोपुरेही सर्वाधिक उंचीची गोपुरे म्हणून ओळखली जातात. हे मंदिर हजारो वर्षे जुने असल्याचे मानले जाते. पल्लव राजवंश, पांड्य वंश, चोल राजवंश आणि विजयनगरच्या राजांनी या मंदिराच्या वैभवात भर टाकली आहे. राजा कृष्ण सेवाराया यांनी या मंदिरासाठी मोठे योगदान दिल्याची नोंद आहे. शिवाय मंदिराचा काही भाग नव्यानं बांधून मंदिराला आत्ताचे भव्य स्वरुप राजा कृष्ण सेवाराया यांनी दिल्याची माहिती आहे.
या मंदिराचे वास्तुशास्त्र अदभूत असेच आहे. भव्य अशा या मंदिराच्या गर्भगृहासमोर हजार-स्तंभ असलेला हॉल आहे. त्याला याराम काल मंडपम म्हणतात. यामध्ये 1008 शिवलिंगाच्या मूर्ती आहेत. राजा कृष्णदेव रायाने यांची उभारणी केली आहे. हा हजारस्तंभ असलेला हॉल बघण्यासाठी आजही हजारो पर्यटक या मंदिरात येतात. एक अदभूत रचना म्हणून याकडे बघितले जाते. (Shiv Temple)
या मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. त्यातील प्रमुख आख्यायिका माता पार्वतीबाबत सांगण्यात येते. या मंदिर परिसरातील आंब्याच्या झाडाखाली माता पार्वतीने महादेव शंकराची पूजा मांडली. शिवप्राप्तीसाठी माता पार्वतीने याच आंब्याच्या झाडाखाली वाळूचे शिवलिंग केले आणि कठोर अशी तपश्चर्या केली. भगवान शंकर माता पार्वतीच्या या तपश्चर्येनं खूष होऊन पुजा स्थळी आले. त्यांनी माता पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी सर्वत्र गंगाजल शिंपडले. गंगाजल अंत्यत वेगानं आणि मोठ्याप्रमाणात येत असल्यानं माता पार्वतीची तपश्चर्या भंग झाली.
आपल्या शिवलिंगाची हानी होऊ नये म्हणून माता पार्वतीनं या शिवलिंगाला मिठी मारली, आणि पुजा सुरु ठेवली. यावेळी माता पार्वतीला भगवान शंकरानं प्रत्यक्ष दर्शन दिले. महादेवांनी येथेच माता पार्वती बरोबर विवाह केल्याचे सांगितले जाते. या पौराणिक कथेला आधार म्हणून कायम भक्तांना या अंब्याच्या झाडाला दाखवण्यात येते. 3500 वर्ष जुने असलेल्या या अंब्याच्या प्रत्येक फांदीवरील आंब्याची चव वेगळी आहे. भक्त हा महादेवाचा चमत्कार समजतात. (Shiv Temple)
=============
हे देखील वाचा : ओपन रिलेशनशिपचा वाढतोय ट्रेंन्ड
============
याशिवाय मंदिराचा उल्लेख अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये आणि तामिळ साहित्यात आहे. तसेच वास्तुकलेवर आधारीत पुस्तकांमध्येही या मंदिराच्या वास्तुकलेचा समावेश करण्यात आला आहे. त्याचा अभ्यास कऱण्यासाठी अनेक विद्यार्थी या परिसराला भेट देतात. मंदिर परिसर 25 एकरांमध्ये पसरलेला आहे. मंदिरात प्रवेशासाठी गोपुरम म्हणून ओळखले जाणारे चार प्रवेशद्वार आहेत. सर्वात उंच गोपुरम हे दक्षिणेकडील आहे. त्यामध्ये 11 मजले असून त्याची उंची 58.5216 मीटर आहे. मंदिराचे दगडी बांधकाम 9व्या शतकात चोल राजवटीत बांधण्यात आले आहे. मात्र मंदिर किमान 600 AD पासून अस्तित्वात असल्याचे सांगण्यात येते.
मणिमेगलाई आणि पेरुम्पननुप्पटाई यांसारख्या शास्त्रीय तमिळ संगम साहित्यात मंदिराचा उल्लेख आहे. त्यात 300 ईसापूर्व काळातील हे एकंबरेश्वर मंदिर असल्याचे सांगण्यात आले आहे. मंदिरात मार्च ते एप्रिल मोठा उत्सव होतो. त्याचा शेवट कल्याणोत्सवाच्या उत्सवाने होतो. दहा दिवसांत मंदिराच्या मुख्य देवतांच्या उत्सवमूर्तीसह विविध मिरवणुका काढल्या जातात. या सोहळ्यासाठी हजारो भाविक मंदिर परिसरात येतात.
सई बने