Home » लंडनमध्ये आता भव्य असे भगवान जगन्नाथ मंदिर

लंडनमध्ये आता भव्य असे भगवान जगन्नाथ मंदिर

by Team Gajawaja
0 comment
London
Share

लंडनमध्ये (London) आता भव्य असे भगवान जगन्नाथ मंदिर उभारण्यात येत आहे. भव्य अशा या मंदिरासाठी ओडिशा येथील व्यावसायिकाने  254 कोटी दान केले आहेत. या मंदिराचा पहिला टप्पा 2024 पर्यंत पूर्ण होऊन लंडनमधील भगवान जगन्नाथाच्या भक्तांना दर्शन घेता येणार आहे.  ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये (London) होणा-या या  जगन्नाथ मंदिरासाठी उद्योजक बिस्वनाथ पटनायक यांनी देणगी दिली आहे. हे मंदिर इंग्लंडमधील धर्मादाय आयोगाकडे नोंदणीकृत श्री जगन्नाथ सोसायटी द्वारे बांधले जाणार आहे.

फिनेस्ट ग्रुपचे संस्थापक बिस्वनाथ पटनायक आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरुण कार हे लंडनमध्ये (London) उभारण्यात येणा-या जगन्नाथ मंदिराचे प्रमुख देणगीदार आहे. ही एक खाजगी इक्विटी गुंतवणूक फर्म आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक वाहने, हायड्रोजन लोकोमोटिव्ह, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि फिनटेकमध्ये गुंतवणूक करते. फिनेस्ट ग्रुपच्या कंपन्यांकडून मिळालेली देणगी ही मंदिराच्या जमीन खरेदीसाठीही वापरली जाणार आहे. लंडनमधील (London) हे जगन्नाथाचे मंदिर भव्य असणार आहे. मंदिर 15 एकर जमिनीवर उभारण्यात येणार आहे. ही जमीन खरेदी करण्यासाठी फिनेस्ट ग्रुपने 71 कोटी रुपये आधीच या मंदिराच्या व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द  केले आहेत. फिनेस्ट ग्रुपचे बिस्वनाथ पटनायक आणि अरुण कार या दोघांनीही यावर्षी फोर्ब्स इंटरनॅशनल मॅगझिन ब्रँडच्या कव्हर पेजवर स्थान मिळवलं आहे. त्यानंतरच त्यांनी जनन्नाथ मंदिराच्या उभारणीची घोषणा केली आहे. यासंदर्भात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लंडनमध्ये पहिले श्री जगन्नाथ संमेलन झाले. यावेळी लंडनमध्ये राहणारे अनेक भारतीय मोठ्यासंख्येनं उपस्थित होते. लंडनमध्ये अनेक भारतीय स्वतंत्र उद्योजक आहेत. तर काही भारतीय लंडनच्या संसदेतही मान्यवर स्थानावर आहेत. या सर्वांनी या संमेलनात भाग घेतला. यात भारतीय उच्चायुक्तालयाचे उपायुक्त सुजित घोष, लेखक अमिश त्रिपाठी उपस्थित होते. याशिवाय पुरीचे महाराज गजपती दिव्यसिंह देब,  महाराणी लीलाबती पट्टमहादेई आदी मान्यवरही भारतातून उपस्थित होते. याचवेळी फिनेस्ट ग्रुपचे  बिस्वनाथ पटनायक यांनी या जगन्नाथ मंदिरासाठी 254 कोटी रुपयांची देणगी देणार असल्याची माहिती दिली. बिस्वनाथ पटनायक हे भगवान जगन्नाथाचे भक्त आहेत. ओडिशातील भगवान जगन्नाथाच्या मंदिराला ते नियमीत भेट देतात. असेच मंदिर हे लंडनमध्ये (London) व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.  मंदिर उभारणीच्या परवानगीसाठी स्थानिक सरकारकडे आवश्यक कागदपत्रे देण्यात आली असून बिस्वनाथ यांच्या पुढाकारानं मंदिरासाठी 15 एकर जमिनही खरेदी करण्यात आली आहे.  

याबातमीमुळे भगवान जगन्नाथांचे आद्य सेवक आणि पुरुषोत्तम क्षेत्रातील श्री जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजपती महाराजांनी आनंद व्यक्त केला आहे.  भगवान जगन्नाथाच्या दरबारात धर्मभेद नसतो. त्यामुळे परदेशात भगवान जगन्नाथाचे मंदिर उभारल्यास विश्वबंधुत्वाची भावना प्रत्यक्षात साकारल्याचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. बौद्ध, जैन आणि शीख धर्मीयांसाठीही भगवान जगन्नाथाचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे लंडनमधील या नव्या भगवान जगन्नाथाच्या मंदिराच्या उभारणीचे गजपती महाराजांनी स्वागत केले आहे.  

=======

हे देखील वाचा : भारतातील सर्वाधिक मोठा समुद्र किनारा

======

याआधीच नोव्हेंबर 2021 मध्ये लंडनमध्ये भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. या तिन्ही मूर्ती सध्या लंडनमधील सर्वात जुन्या साउथॉलच्या श्री राम मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत. लंडनमध्ये 2024 मध्ये जेव्हा भगवान जगन्नाथाचे मंदिर बांधून पूर्ण होईल, तेव्हा या तिनही मुर्ती विधिपूर्वक तेथे स्थापन केल्या जाणार आहेत.  2024 मध्ये होणा-या या सोहळ्यासाठी संपूर्ण इंग्लडमधील भारतीय नागरिकांना आमंत्रण देण्यात येणार आहे.ओडिशामधील पुरी येथे असलेल्या भगवान जगन्नाथाचे मंदिर हे भारतातीलच नाही तर परदेशातील जगन्नाथ भक्तांची लगबग असणारे भव्य मंदिर आहे.  जगन्नाथ या शब्दाचा अर्थ जगाचा स्वामी असा होतो.   हे मंदिर हिंदूंच्या चार धामांपैकी एक म्हणून गणले जाते. या मंदिराचा वार्षिक रथयात्रा उत्सव प्रसिद्ध आहे. यामध्ये मंदिरातील तीन प्रमुख देवता,  भगवान जगन्नाथ, त्यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा या तिघांचीही भव्य आणि सजवलेल्या रथातून मिरवणूक काढली जाते.  आता लंडनमध्येही भगवान जगन्नाथाचे भव्य मंदिर उभारल्यावर अशाप्रकारचा उत्सव होणार का, याकडेही भाविकांचे लक्ष लागले आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.