Home » आमदार असूनही गणपतराव देशमुखांनी आयुष्यभर एसटीने प्रवास केला; वाचा, त्यांचा एसटीतला ‘हा’ रंजक किस्सा

आमदार असूनही गणपतराव देशमुखांनी आयुष्यभर एसटीने प्रवास केला; वाचा, त्यांचा एसटीतला ‘हा’ रंजक किस्सा

by Correspondent
0 comment
Ganpatrao Deshmukh | K Facts
Share

नुकतेच शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक स्तरातून शोक व्यक्त करण्यात आला. तर कित्येकांनी जनसामान्यांचा आधार आणि माणसातला आमदार गेला असल्याचे म्हटले आहे.

असे म्हणले जाते, की माणूस गेल्यानंतरच त्याची खरी कीर्ती जगासमोर येते. हे उदाहरण गणपतराव देशमुख यांच्याबाबतीत तंतोतंत जुळते. गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) हयात असताना आमदार असूनही त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य एका सामान्य व्यक्ती प्रमाणे व्यतीत केले.

आमदारकीची किंवा राजकारणाची कोणतीही हवा डोक्यात शिरू न देता, त्यांनी आयुष्याभर आपल्या मतदार संघातील समस्या सोडवून लोकांची सेवा केली. शेवटी मृत्यूनंतर त्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी झालेली गर्दीच त्यांच्या कामाची पोचपावती आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Ganpatrao Deshmukh
Ganpatrao Deshmukh

सोलापूर जिह्यातील मोहोळ पंढरपूरमधील पेनुर या गावात १९२७ मध्ये गणपतराव देशमुख यांच्या जन्म झाला. लोक त्यांना आबा किंवा भाई या नावाने ओळखायचे. मॅट्रिक पूर्ण केल्यानंतर गणपतराव देशमुख पुण्यात शिक्षणासाठी आले.

सांगोलासारख्या दुष्काळी भागातून आलेला हा विद्यार्थी होता. मात्र त्या काळात शंकरराव मोरे, नाना पाटील, उद्धवराव पाटील, तुळशीदास जाधव, बापू लाड, दत्ता देशमुख यांच्या विचारांचा पगडा गणपतराव यांच्यावर पडला होता. त्यामुळे विधानसभेत आमदार झाल्यानंतरदेखील त्यांचा साधेपणा कायम राहिला.

दुष्काळी भागातील प्रश्न त्यांनी पोटतिडकीने आणि अभ्यासूपणे मांडले. सोलापूर, सांगली, सातारा या जिह्यांतील दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. शेतकरी आणि कामगारांच्या रोजगारासाठी लढा उभारला. १९६२ साली मंत्रालयात येण्यासाठी एसटीची पायरी चढणाऱ्या या लोकनेत्याने शेवटपर्यंत याच सरकारी वाहनाने मुंबईचा प्रवास केला.

त्यांचा एसटीतला एक किस्सा खूप फेमस आहे. आबा एक दिवस मुंबईला जाण्यासाठी सातारा एसटी स्टँडवर आले. आणि ते मुंबईला जाणाऱ्या एसटीत बसले. बस चालू होताच कंडक्टर तिकीटा फाडु लागला. तेव्हा कंडक्टरने आबांना तिकीट मागितल.

आपल्या राज्यात आमदारांना एसटी बसचा प्रवास मोफत आहे. त्यावेळी आबांनी कंडक्टरला सांगितले की मला मोफत प्रवास आहे. कंडक्टरला आबा आमदार आहेत हे माहीत नव्हते. कदाचित सामान्य वेशात असणाऱ्या आबांना कंडक्टरने ओळखले नसावे.

एखादे आमदार पांढरे शुभ्र स्टार्चचे कपडे न घालता, सामान्य माणसाप्रमाणे एसटी बसने प्रवास करतील यावर कंडक्टरचा विश्वासच बसेना. ज्यावेळी आपल्या एसटीत आमदार आहेत हे कंडक्टरला समजले, तेव्हा त्या कंडक्टरने एसटी डेपोत जाऊन कंट्रोलरला ही गोष्ट सांगितली. त्यानंतर कंट्रोलर आबांना सन्मानाने कार्यालयात घेऊन गेले आणि त्यांनी त्यांचा सत्कार पण केला.

आबांच्या साधेपणाचे किस्से इथेच संपत नाहीत… एकदा आबांना कोल्हापूरला जायचे होते. त्यावेळी आबांच्या जेवणाची वेळ झाली म्हणून, आबांनी आपल्या गाडी चालकाला गाडी एका शेताच्या कडेला सावली बघून थांबवायला सांगितली.

तिथे शेतातील पिकाला पाणी द्यायचे सुरु होत. एका आंब्याच्या झाडाखाली बसून आबांनी आणि ड्रायव्हरने दोघांनी जवळची भाकरी खाल्ली. आणि पुढच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात केली. ड्रायव्हर नवीन होता त्यामुळे त्याला या सर्व गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले होते. हा किस्सा खुद्द त्यांच्या ड्रायव्हर कडूनच ऐकायला मिळाला होता.

Ganpatrao Deshmukh

तर अशा या साध्या भोळ्या आमदार गणपतराव देशमुखांनी तब्बल ११ वेळा आमदारकीची खुर्ची पटकावली होती. एकाच मतदार संघातून, एकाच पक्षाच्या तिकिटावर सलग ५५ वर्षे आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम पण कदाचित त्यांच्याच नावावर असेल.

त्यांच्या मृत्यूनंतर विरोधकालाही पोरके झाल्यासारखे वाटत असेल. म्हणूनच आबांचे निधन झाले हे ऐकताच आमदार शहाजी पाटील यांना अश्रू अनावर झाले असावेत. आबांनी आयुष्यभर कमावलेली ‘इष्टेट’ ती हीच!!!

– निवास उद्धव गायकवाड


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.