Home » लोणारला येणार ? भाग १

लोणारला येणार ? भाग १

by Correspondent
0 comment
Lonar Lake | K Facts
Share

एका भटकंतीच्या मासिकात ‘लोणारचा वाटाड्या’ हा लेख वाचायला मिळाला. आणि मनाने, शालेय वयात भूगोलात शिकलेल्या उल्कापाती सरोवराबद्दल वेध घ्यायला सुरुवात केली.  तो वाटाड्या म्हणजे लोणारचा वैज्ञानिक, पौराणिक, ऐतिहासिक अभ्यास करणारे श्री.सुधाकर बुगदाणे. तिथल्या शिवाजी हायस्कूलमधले शिक्षक. यांचं लोणार सरोवर परिसरात या बाबत महत्तम कार्य आहे.आता ते हयात नाहीत. पण खरोखरच लोणार सरोवर, वनपरिसर, मंदिरे या सर्वांचे जतन व संवर्धन याबाबत त्यांनी दाखवलेला मार्ग अनुसरावा तीच त्या वाटाड्याला खरी आदरांजली ठरेल.

तो लेख आणि तो वाटाड्या मला नंतर कधीच भेटले नाहीत. पण लोणार सरोवर मात्र मनात तरंग उमटवत राहिले. मुंबईसारख्या शहरातून सहसा कोणी जात नाहीत अशा ठिकाणी जाण्याची आमची टाटा हॉस्पिटल गृपची परंपराच मग ८ सप्टेंबर २००६ रोजी रात्रीच्या देवगिरी एक्सप्रेसने पहाटे साडेपाचला जालन्याला उतरून तिथून एस.टी. ने लोणार गाठलं. जालना-लोणार प्रवास दोन तासाचा. पण प्रभातगारवा असल्याने निसर्ग न्याहाळत दोन तासांत लोणारला पोचलो तेव्हा जराही मरगळ नव्हती. विश्रामगृहात आधीच आरक्षण करून ठेवलं होतं.

विश्रामगृहाच्या खोल्यांसमोरच लोणारच्या सरोवराचा रम्य देखावा दृष्टीस पडतो. पावसाळा संपता संपता तिथे गेलं की शरद ऋतूचा आल्हाद असतो. हिरव्याकंच वनराईने पूर्ण सरोवराच्या परिघाला व्यापलेले असते. एखाद्या खोलगट थाळीत पाणी भरावं तसं ते सरोवर दिसतं. काचेसारखं स्वच्छ पाणी, पण हिरव्या रंगाचा गडदपणा जाणवतो तो त्या पाण्याखालच्या शेवाळ्यामुळे. लोणार सरोवराचा (Lonar Lake) परीघ साधारण २ कि.मी. एवढा आहे. नयनरम्य देखावा आणि जलाशयाची गुढता आपल्याला अक्षरशः खिळवून ठेवते.

लोणार सरोवर (Lonar Lake)

विश्रामगृहातल्या खानसाम्याने समोर आणलेला चहा आणि पोह्यांच्या नाश्त्यावर ताव मारून लगेचच आम्ही लोणार गावात फेरफटका मारायला बाहेर पडलो. लोणारच्या या उल्कापाती विवराची तुलना अमेरिकेच्या अँरिझोना विवरावरोबर होते. आफ्रिकेतील घाना येथे असणारे १०,००० मीटर व्यासाचे ‘बोसुमत्वी’ विवर हे जगात प्रथम क्रमांकाचे विवर आहे, न्यू क्युबेक हे कॅनडामधील ३,५०० मीटर व्यासाचे विवर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे विवर असून आपले लोणारचे १८०० मीटर व्यासाचे विवर तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण गमतीचा भाग म्हणजे बेसाॅल्ट युक्त खडकांचे तयार झालले जगातील हे एकमेव सरोवर आहे.

लोणार सरोवर हे ज्वालामुखी उद्रेकातून निर्माण झालं की अशनीपातातून? असा मतवाद होता. कारण टेकलाईट नावाचे गोलाकार पारदर्शक तपकिरी काचमणी या विवराच्या आजुबाजुला सापडतात. जे चंद्रावरील विवरांमधेही आढळलेत. व ती चंद्रविवरे ज्वालामुखीपासून बनली आहेत असा शोध आहे. अशनी फुटुन तिचा एक तुकडा ७०० मीटर लांब जाऊन पडला तिथे ३००मीटर व्यासाचा खोलगट भाग बनला तेच अंबरतळे असावे. बेसाॅल्ट युक्त खडकांचे तुकडे तुकडे होऊन तयार झालेले मायक्रोब्रेशिया लोणार सरोवरात आहेत. तसेच तिथल्या गाळात निकेलचे प्रमाण अत्यल्प व लोहाचे प्रमाण जास्त. एरोलाईट प्रकारची उल्का (अशनी) आदळून हे विवर झालं याला जास्त पुष्टी मिळते.

दगडांच्या आतमधे प्रचंड प्रमाणात लोह असावं याचा पुरावा आम्हाला मिळाला तो तिथल्या एक गाईड कडून. त्याने छोट्याशा खड्याने काही दगडांवर आघात केले. त्यात एका मोठ्या आयताकृती दगडातून घंटानाद केल्याप्रमाणे आवाज आला. आम्ही तो जाणीवपूर्वक ऐकला. लोणारच्या विवरात मिथेन खाणारे जीवाणू आढळलेत जे ग्लोबल वाॅर्मिंगची समस्या दूर करायला मदत करू शकतात.

क्रमशः

” शुभं भवतु “

लेखक – युधामन्यु गद्रे
Contact: yudhamanyu@gmail.com


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.