Home » अजित पवारांवर एवढी नामुष्की का ओढवली?

अजित पवारांवर एवढी नामुष्की का ओढवली?

लोकसभा निवडणुकीतील परभवानंतर अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार?

by Team Gajawaja
0 comment
Ajit-pawar-featured
Share

२०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या अनपेक्षित निकालांचीच चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. या निवडणुकांमध्ये भाजपाचे सर्वाधिक नुकसान हे उत्तर प्रदेश व महाराष्ट्रासारख्या राज्यात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रात करण्यात आलेलं फोडाफोडीचं राजकारणच भाजपाच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचं बऱ्याच विश्लेषकांचं मत आहे.

महाराष्ट्रातील भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीला मोठा धक्का बसलाय. एकनाथ शिंदे यांच्या गटाचे यश जवळपास ५०% असून अजित पवार यांच्या पक्षाची कामगिरी मात्र सर्वात निराशाजनक ठरली आहे. (Loksabha Results Updates)

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने चार जागा लढवल्या होत्या पण त्यांना फक्त एकाच जागेवर विजय मिळवता आला.

या पराभवानंतर रोहित पवार यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यानुसार अजित पवार गटाचे बरेचसे आमदार हे परतीच्या वाटेवर असून ते त्यांच्या संपर्कात असल्याचं स्पष्ट झालंय.

एकूणच ही परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि खासकरूनअजित पवार (Ajit Pawar)  यांच्या कारकीर्दीसाठी चिंताजनक आहे.

Ajit-pawar1

खरंतर आपल्या काकांचा पक्ष फोडूनही अजित पवार यांच्यावर इतकी नामुष्कीची वेळ का आली? आणि आता अजित पवार हे नेमकी कोणती पावलं उचलणार? याविषयीच आपण सविस्तर आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.

भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीने महाराष्ट्रात ४५+ चा नारा दिला होता. मात्र, त्यांना महाराष्ट्रात निम्म्या जागाही मिळवता आल्या नाहीत. महाराष्ट्रात भाजपला केवळ ९ जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीला एकूण १७ जागा मिळाल्या आहेत.

यात एकनाथ शिंदे यांना ७ जागा मिळाल्या असून अजित पवार यांना फक्त एकाच जागेवर विजय मिळवता आलेला आहे. महायुतीत येऊनही अजित पवार यांच्या हाती फारसं काहीच लागलेलं नाही हे यातून स्पष्ट झालं आहे. (Loksabha Results Updates)

महायुतीमध्ये येणं आणि नंतर जगावाटपावरुन झालेले वाद हे अजित पवार यांच्या पराभवामागचं महत्त्वाचं कारण असल्याचं राजकीय विश्लेषकांनी मत मांडलं आहे.

===

हेदेखील वाचा : होर्डिंग लावण्यासाठी पाळावे लागतात ‘हे’ नियम

===

अजित पवार यांनी राष्ट्रवादी फोडून भाजपासोबत जाणं हे त्यांच्या बऱ्याचशा मतदारांना खटकलं आणि त्यामुळेच त्यांच्यावर ही नामुष्की ओढवली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबरोबरच महायुतीत आल्यावर जगावाटपावरुन झालेली धुसफूस, तसेच बारामती सातारा आणि म्हाडासारख्या महत्त्वाच्या जागांवरुन उडालेले खटके यामुळेही अजित पवार यांना हा फटका बसल्याचं सांगितलं जातं.

अजित पवार यांचा हा राजकीय पराभव तर आहेच पण वैयक्तिक पातळीवरही अजित पवार यांना जनतेचा तसेच कुटुंबाचा रोष पत्करावा लागला आहे. पक्ष फोडल्यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि इतर कुटुंबीयांच्या जिव्हारी लागतील अशी वक्तव्य केल्यानेही अजित पवार यांच्यावर ही नामुष्कीची वेळ ओढवली असल्याचं काही तज्ञांचं म्हणणं आहे.

याबरोबरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना उभं करणंही अजित पवार यांना चांगलंच महागात पडल्याचं बोललं जातंय. बारामतीच्या जागेवर झालेले दारुण पराभव पाहता अजित पवार यांचं आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाणं त्यांना महागात पडल्याचंही सांगितलं जात आहे.

या पराभवामुळे अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपा व शिवसेनेबरोबरच्या युतीबाबत फेरविचार करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबरोबरच येत्या विधानसभा निवडणुकांसाठी जागांवरुन वाटाघाटी करण्याच्या बाबतीत अजित पवार महायुतीसमोर काही वेगळ्या अटी ठेवतील असंही सांगण्यात येत आहे.

Ajit-pawar2

इतकंच नव्हे तर महायुतीत आल्याने झालेले नुकसान पाहता अजित पवार (Ajit Pawar) हे पुन्हा स्वगृही म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. याची एक झलक आपण २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीदरम्यान पाहिलीच होती, त्यामुळे अजित दादा या पराभवानंतर कधीही यु-टर्न घेऊ शकतात असं सांगितलं जात आहे. (Loksabha Results Updates)

यापैकी काहीच न करता अजित पवार हे पुन्हा एकदा ग्रासरूट लेवलपासून आपल्या पक्षबांधणीकडे लक्ष देतील, लोकांना जाऊन भेटतील, पक्षातील लोकांची मतं जाणून घेतील आणि विधानसभेच्या तयारीला लागतील अशी शक्यताही काही राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.

लोकसभा निवडणूकीत झालेला हा पराभव अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला नेमकं काय वळण देणार याकडे साऱ्या महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष लागलं आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.