Home » एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल चार वेळा प्रेमात पडले होते रतन टाटा… 

एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल चार वेळा प्रेमात पडले होते रतन टाटा… 

by Team Gajawaja
0 comment
Ratan Tata
Share

काही व्यक्तिमत्व अशी असतात की, त्यांचे नाव जरी समोर आले तरी त्यांना मनापासून नमस्कार केला जातो. त्यांच्याबद्दल कायम चांगलं बोललं जातं. त्यांच्या विचारांनी लाखोंना नवीन प्रेरणा मिळते. अशा काही मोजक्या व्यक्तींमध्ये रतन टाटा (Ratan Tata) यांचे नाव आवर्जून घेतलं जातं. 

28 डिसेंबर 1937 रोजी नवल टाटा आणि सोनू टाटा या दांपत्याच्या पोटी रत्न टाटांचा जन्म झाला. रतन टाटा यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यावर त्यांच्या आजी, नवाजबाई टाटा यांनी त्यांना दत्तक घेतले.  रतन टाटांचे आजोबा आणि टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. त्यांचे  सुरुवातीचे शिक्षण शिमला येथील जॉन कॅनन आणि मुंबईतील कॅथेड्रल स्कूलमध्ये झाले. त्यांनी 1962 मध्ये अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. 1975 मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून प्रगत व्यवस्थापनाची पदवी देखील त्यांनी संपादन केली.  

टाटा समूह, हा  भारतातील सर्वात जुन्या औद्योगिक घराण्यांपैकी एक असला तरी रतन टाटा यांच्या हाती जेव्हा या व्यवसायाची धूरा आली तेव्हा त्यांनी पारंपारिक व्यवसायाबरोबरच नवीन क्षेत्रांमध्येंही टाटा समूहाचा प्रसार केला. त्याचा परिणाम म्हणजे आता मिठापासून ते नवीन तंत्रज्ञानापर्यंत सर्व क्षेत्रात टाटा समुहाचा दबदबा वाढला आहे. याचं कारण म्हणजे रतन टाटा यांची व्यवसायकडे बघण्याची आधुनिक, कल्पक दृष्टी.  या त्यांच्या कल्पक वृत्तीचे अनेक किस्से सांगितले जातात.  

NELCO कंपनीमध्ये प्रभारी संचालक 

1971 मध्ये राष्ट्रीय रेडिओ आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपनी (NELC–O) मध्ये प्रभारी संचालक म्हणून रतन टाटा यांची नियुक्ती झाली. त्यावेळी ही कंपनी आर्थिक तोटा सहन करत होती. पण रतन टाटा यांनी हे पहिलेच आव्हान स्विकारुन  नेल्को कंपनीचा हिस्सा 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात यश मिळवले. पण आणीबाणीचा फटका कंपनीला बसला. 1977 मध्ये युनिअन आणि अन्य वादानंतर रतन टाटा यांना नेल्को कंपनी बंद करावी लागली.  (Ratan Tata)

=====

हे देखील वाचा – टाटा समूहात इंटर्न म्हणून सामील झालेले एन चंद्रशेखरन, ‘असे’ पोहचले कंपनीच्या शीर्षस्थानी

=====

टाटा इंडस्ट्रीजचे उत्तराधिकारी

जेआरडी टाटा यांनी 1981 मध्ये रतन टाटा यांना टाटा इंडस्ट्रीजचे उत्तराधिकारी बनवण्याची घोषणा केली.  1991 मध्ये रतन टाटा यांना टाटा इंडस्ट्रीज आणि त्यांच्या इतर कंपन्यांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. रतन टाटा यांच्या कतृत्वावर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले, पण त्याकडे दुर्लक्ष करीत रतन टाटा यांनी मिठापासून ते सॉफ्टवेअरपर्यंत विविध क्षेत्रात टाटा समुहाचा विस्तार केला.

TATA Tea, TATA Motors, TATA Steel या कंपन्यांचा भारतातच नव्हे, तर परदेशातही दबदबा वाढला.  आज टाटा समूहाचा व्यवसाय सुमारे 100 देशांमध्ये पसरलेला आहे. लाखो कर्मचारी या समुहात कामाला आहेत. आपल्या नफ्यातील सर्वात मोठा हिस्सा टाटा धर्मादाय कार्यासाठी देतातच शिवाय अनेक तरुणांच्या स्टार्टअपसाठी टाटांनी आर्थिक सहाय्य दिले आहे. या सर्वांचे मूळ म्हणजे, व्यवसाय सुरु करताना आर्थिक स्वातंत्र लागते याची जाणीव रतन टाटा यांना आहे.  

असा घेतला अपमानाचा बदला 

याबाबत टाटा आणि फोर्ड यांच्या भेटीचा किस्सा सांगितला जातो. 1998 मध्ये टाटांनी इंडिका कार बाजारात आणली. रतन टाटा यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली पण इंडिका कारला बाजारात प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे तोट्यात गेलेल्या कंपनीला वाचवण्यासाठी टाटा मोटर्सच्या भागीदारांनी रतन टाटा यांना कंपनी विकण्याचा सल्ला दिला. 

टाटा कंपनी विकण्याची ऑफर घेऊन अमेरिकेत फोर्ड मोटर्समध्ये गेले. फोर्ड चेअरमन विल्यम क्ले फोर्ड जूनियर यांनी रतन टाटा यांना, जेव्हा तुम्हाला या व्यवसायाबद्दल काहीच माहिती नाही, तेव्हा तुम्ही ही कार लॉन्च करण्यासाठी इतके पैसे का गुंतवले? अशा शब्दात विचारणा केली. शिवाय तुमची कंपनी विकत घेऊन आम्ही उपकार करत आहोत, असे अभिमानाने सांगितले. यामुळे रतन टाटा खूप नाराज झाले. त्यांनी फोर्ड बरोबर झालेला व्यवहार थांबवून आपला देश गाठला.(Ratan Tata)  

भारतात परत आल्यावर त्यांनी नव्यानं इंडिका कारचा अभ्यास केला. बाजाराचा अभ्यास केला. कारमध्ये काही बदल केले. याचा त्यांना फायदा झाला. कारची मागणी वाढू लागली. दुसरीकडे रतन टाटा यांना सल्ला देणाऱ्या फोर्ड यांची कंपनी तोट्यात जाऊ लागली. या कंपनीची अवस्था एवढी बिकट झाली की, 2008 च्या अखेरीस फोर्ड दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली. त्यावेळी रतन टाटा यांनी फोर्ड कंपनीला त्यांच्या लँड रोव्हर आणि जग्वार या लक्झरी सीरीज कार खरेदी करण्याची ऑफर दिली.  

आज लँड रोव्हर आणि जग्वार या टाटा समूहाचा एक भाग आहेत. रतन टाटा यांच्या याच जिगरी वृत्तीमुळे टाट समुहाचा आलेख प्रत्येक क्षेत्रात चढता राहिला आहे.  

कर्तबगार असूनही विनयशील स्वभाव 

रतन टाटा यांच्या यशाचे मूळ त्यांच्या स्वभावात आहे. अत्यंत विनयशील अशा रतन टाटा यांनी कधीही लहानांचा उपहास केला नाही की, मोठ्यांबरोबर अरेरावी केली नाही. टाटा यांनी सर्वसामान्यांचा विचार केला आणि त्यामुळेच त्यांची भरभराट झाली.  याच विचारातून आलेली गाडी म्हणजे नॅनो कार.  

रतन टाटांनी फक्त एक लाख रुपयांमध्ये कर अशी ‘नॅनो’ कारची घोषणा केली तेव्हा तो चेष्टेचा विषय झाला होता. कंपनीची निर्मिती करण्यापासून त्यांना विरोध झाला. राजकीय आंदोलने झाली. या सर्वांतून टाटांनी गुजराथमध्ये नॅनो कारचा भव्य असा प्रकल्प उभारला आणि लाखो मध्यंमवर्गीयांचे चारचाकी घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. जगातली सर्वात स्वस्त कार म्हणून नॅनो कारचा उल्लेख करण्यात येतो.  

प्रेमाचे किस्से 

28 डिसेंबर 2012 रोजी रतन टाटा टाटा समूहाच्या सर्व कार्यकारी जबाबदाऱ्यांमधून निवृत्त झाले. मात्र, निवृत्तीनंतरही रतन टाटा तेवढेच सक्रीय आहेत. रतन टाटा अविवाहीत आहेत. याबाबत त्यांना अनेकवेळा विचारण्यात आले. टाटांनीही या प्रश्नाचे उत्तर दिलखुलासपणे दिले आहे. एका मुलाखतीत रतन टाटा यांनी प्रेमाचे किस्से सांगितले आहेत. (Ratan Tata)

रतन टाटा एकदा नाही तर तब्बल चारवेळा प्रेमात पडले होते. अमेरिकेत असताना रतन टाटा एका मुलीच्या प्रेमात पडले होते. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. 1962  च्या या काळात भारत-चीन युद्ध चालू होते. त्यावेळी रतन टाटा भारतात आले. पण त्यांची मैत्रिण भारतात आली नाही. नंतर तिने दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न केल्याचे टाटांना समजले. त्यानंतर ही टाटा प्रेमात पडले. पण प्रत्येकवेळा लग्नापर्यंत गोष्ट आली की तुटायची….त्यामुळे नंतर प्रेमात पडण्याचे थांबवल्याचे रतन टाटा यांनी मिष्किलपणे सांगितले. .

अर्थात टाटा यांनी मनापासून प्रेम  केले, ते त्यांच्या कामावर आणि त्यांच्या उद्योग समुहावर आणि तिथल्या प्रत्येक कर्मचाऱ्यावर. त्यांच्या कार्याचा अनेक पुरस्कारांनी गौरव झाला. भारत सरकारने रतन टाटा यांना दोनवेळा पद्म पुरस्काराने सन्मानित केले आहे. अनेकवेळा रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी करण्यात येते, पण हा पुरस्कार मिळो वा न मिळो रतन टाटा यांनी आपल्या कार्यातून लाखो भारतीयांच्या मनात मानाचे स्थान पटकावले आहे.  (Ratan Tata)

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.