‘येस वी कॅन’ अशी साधीसोपी घोषणा करत बराक ओबामा (Barack Obama) अमेरिकेचे अध्यक्ष बनले, तेव्हा ते फक्त ४७ वर्षांचे होते. अमेरिकेचा पहिला कृष्णवर्णीय अध्यक्ष म्हणून त्यांनी नवा इतिहास लिहिला. दहशतवादाशी लढा सुरूच ठेवत अमेरिकी अर्थव्यवस्था रूळावर आणण्याचं स्वप्न त्यांनी अमेरिकी जनतेला दाखवलं आणि महत्त्वाचं म्हणजे, ते बऱ्याच अंशी पूर्णही केलं. २००९ ते २०१७ अशी आठ वर्ष सत्तेत राहिलेल्या ओबामा यांची कारकीर्द जगातल्या कोणत्याही राजकीय नेत्याला हेवा वाटेल अशीच आहे.
केनियाचे नागरिक असलेले कृष्णवर्णीय वडील आणि अमेरिकी आई यांचं अपत्य असलेल्या बराक यांना आपल्या वडिलांचा सहवास फारसा लाभला नाही कारण त्यांच्या लहानपणीच आई- वडील वेगळे झाले. लहानपणी ‘बॅरी’ असं टोपणनाव असलेले बराक त्यानंतर कधी आई आणि तिचे दुसरे पती, तर कधी आजी- आजोबांबरोबर राहात मोठे झाले.

हावर्ड विद्यापीठात त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि नंतर लगेचच शिकागो लॉ स्कूलमध्ये कायदा शिकवण्याचं काम स्वीकारलं. १९९७ मध्ये इलिनॉइस इथं सेनेटर म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दीची खरी सुरुवात झाली. तिथपासून अमेरिकेच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास त्यांनी केवळ १२ वर्षांत पूर्ण केला.
ती ११ मिनिटं
२०१० मध्ये भारत भेटीवर आलेल्या बराक ओबामांसारख्या जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्तीला मुंबईत एका पोलिस उपायुक्ताने तब्बल ११ मिनिटं त्यांच्या कारमध्ये बसून राहाण्यास भाग पाडलं होतं. या दौऱ्यादरम्यान ७ नोव्हेंबर रोजी ओबामा मुंबईतल्या सेंट झेवियर्स कॉलेजला भेट देणार होते. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार ओबांमाची अंतर्गत सुरक्षा अमेरिकी एजंट्सकडे होती, तर बाह्य परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांकडे होती.
ओबामांच्या भेटीच्या एक दिवस आधी अमेरिकी एजंट्सनी झेवियर्स कॉलेजमध्ये मेटल डिटेक्टर्स लावले, तेव्हाच त्यांच्यात आणि मुंबई पोलिसांमध्ये खटका उडाला. सुरक्षेची जबाबदारी असलेले मुंबईचे डीसीपी के एम मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी त्याला जोरदार आक्षेप घेत मेटल डिटेक्टर्स काढून टाकायला लावले व त्याजागी आपले डिटेक्टर्स बसवले. (Lesser known story of Barack Obama)

प्रत्यक्ष भेटीच्या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास प्रसन्ना यांना झेवियर्स कॉलेजच्या छतावर अमेरिकी बंदूकधारी (स्नायपर्स) तैनात असलेले दिसले. बाह्यसुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांकडे असल्यामुळे ही बाब नियमांचे उल्लंघन करणारी होती. प्रसन्ना यांनी स्नायपर्सना खाली उतरण्यास सांगितले, मात्र ते ऐकत नव्हते.
ओबामांची भेटीची वेळ जवळ येत असल्यामुळे वातावरणात प्रचंड तणाव होता. अखेर प्रसन्न यांनी थेट आपले पिस्तूल काढून स्नायपर्सवर रोखत खाली उतरायला सांगितले. प्रसन्ना यांनी बंदूक रोखल्याचं कळताच मुंबईचे आयुक्त संजीव दयाळसुद्धा झेवियर्सला धावले. तिकडे झेवियर्सला जाण्यासाठी ओबामा आपल्या वाहनात बसले, मात्र दयाळ आणि प्रसन्न यांनी त्यांच्या ताफ्याला निघण्याची परवानगी दिली नाही.
====
हे देखील वाचा – डॉक्टर ते क्रूरकर्मा दहशतवादी… अयमान अल जवाहिरी!
====
दयाळ यांनी अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत सर्व प्रकार सुरक्षेच्या नियमांच्या विरोधात असल्याची जाणीव करून दिली आणि अखेर त्यांना मुंबई पोलिसांचे म्हणणे मान्य करावे लागले. प्रसन्ना यांनी अक्षरशः क्यूआरटीच्या सशस्त्र कर्मचाऱ्यांची तुकडी घेऊन अमेरिकी सुरक्षा अधिकाऱ्यांना खाली उतरवले आणि मगच ओबामा यांच्या ताफ्याला निघण्याची परवानगी देण्यात आली.
हे सर्व होईपर्यंत तब्बल ११ मिनिटं ओबामा त्यांच्या गाडीतच बसून होते आणि त्यांचे सुरक्षा अधिकारी हातातल्या बंदुकीच्या ट्रिगरवर बोट ठेवूनच गाडीभोवती कडं करून उभे होते. सुरक्षेच्या आंतरराष्ट्रीय नियमांनुसार बाह्य क्षेत्राची जबाबदारी मुंबई पोलिसांकडे असताना अमेरिकी सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यात हस्तक्षेप केला असता, तर भारत आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या व्यक्तीची सुरक्षा करण्यास असमर्थ असल्याचा चुकीचा संदेश त्यातून जगभरात गेला असता, म्हणून प्रसन्ना यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं. अर्थातच या संपूर्ण घटनेची फारशी वाच्यता केली गेली नाही आणि आजही त्यावर भाष्य केले जात नाही.( Lesser known story of Barack Obama)
लोकप्रियता कायम
सत्तेत असताना फक्त आपल्या देशातच नव्हे तर ओबामा (Barack Obama) संपूर्ण जगभरात लोकप्रिय होते. कोणत्याही राजकीय नेत्याला हेवा वाटावी अशी कारकीर्द त्यांनी घडवली. ओसामा बिन लादेनचा खातमा, अमेरिकी नागरिकांच्या हिताची विधेयकं संमत करणं, शांततेचं नोबेल पारितोषिक अशा विविध घटनांनी त्यांची कारकीर्द झळाळून निघाली.
जगातील सर्वोच्च आणि बलाढ्य समजल्या जाणाऱ्या पदावर विराजमान असूनही सामान्यांशी असणारा त्यांचा संवाद खूप काही सांगणारा होता. लहान मुलांना कडेवर घेणारे, त्यांच्याशी वाकून बोलणारे, आपल्या कर्मचाऱ्यांना बरोबरीने वागवणारे, पत्नी मिशेलसोबत मोहक नातं जपणारे, कोणत्याही सर्वसामान्य बापाप्रमाणे आपल्या टीनएजर मुलींची जाहीरपणे काळजी करणारे ओबामा त्यांच्या कारकीर्दीपेक्षा या साधेपणामुळे जास्त लक्षात राहातील.
– कीर्ती परचुरे