जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे आज ब्रिज कँडी रुग्णालयात निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्या ९२ वर्षांच्या होत्या. ८ जानेवारी रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना ब्रिज कँडी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. गेल्या २८ दिवसांपासून त्या मृत्यूशी झुंज देत होत्या. आज त्यांची ही झुंज अखेर अपयशी ठरली.
गायिका लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ साली झाला होता. त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षांपासून संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. चित्रपटाच्या कित्येक पिढ्या बदलल्या पण लताजींचा स्वर मात्र कायम राहिला. नायिका, गीतकार, संगीतकार, निर्माते, दिग्दर्शक इतकेच नव्हे, तर प्रेक्षकांचीही पिढीही बदलली, पण लताजींचे स्वरांनी मात्र रसिकांना मंत्रमुग्ध करत राहिले. चित्रपटासाठी आणि चित्रपटाबाहेरही त्यांनी गायन केले आहे. दोन्ही शैलींमधला फरक त्यांनी अगदी सहज आत्मसात केला होता.

सात दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये आणि चित्रपटसृष्टीबाहेरही गायन केले आहे. या काळात त्यांनी विविध भाषांमध्ये ३०००० गाणी गायली आहेत. काजोलसाठी त्या जशा गायल्या आहेत, तशाच त्या तिची आई तनुजा आणि मावशी नूतन यांच्यासाठीही गायल्या होत्या.
=====
हे देखील वाचा: लता मंगेशकर म्हणजे फक्त सात शब्द, सात सूर, सप्तरंगी वाटचाल इतकेच नव्हे तर बरेच काही आहे.
=====
संगीत क्षेत्रातील फिल्मफेअर तसंच, इतर अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. यामध्ये विशेष उल्लेखनीय पुरस्कार म्हणजे – पद्मभूषण (१९६९) दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९),फिल्फेअर लाईफटाइम आचिवमेंट) अवार्ड (१९९३), महाराष्ट्र भूषण (१९९७) पद्मविभूषण (१९९९) भारतरत्न (२००१) लीजन ऑफ ऑनर (२००६).
लताजींना, १९८९ साली संगीत नाटक अकादमी, इंदिरा कला संगीत विद्यापीठ, खैरागड आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्राप्त झाली होती.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, अमिताभ बच्च्चन, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह देशातील अनेक मान्यवर व्यक्तींनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनाने संगीत जगताचे खूप मोठे नुकसान झाले आहे.