अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर 20 जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प विराजमान होणार आहेत. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर अनेक कायदे बदलणार अशी चर्चा अमेरिकेत चालू झाली आहे. ट्रम्पचा धाक एवढा आहे की, अमेरिकेतील विद्यापीठानी त्यांच्या विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांना सुट्ट्या द्यायला नकार दिला आहे. तसेच जे विद्यार्थी सुट्टी घेऊन आपल्या देशात गेले आहेत, त्यांनाही परत बोलावण्यात येत आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर विद्यापीठांवरही अंकुश येणार आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, म्हणून अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. वर्षाअखेर आणि ख्रिसमची मोठी सुट्टी या विद्यापीठांना असते. या दरम्यान परदेशातील विद्यार्थी आपल्या देशात जातात. या विद्यार्थ्यांना परत येतांना ट्रम्प यांनी बदललेल्या परदेशी धोरणाचा फटका बसण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे ट्रम्प पदभार सांभाळण्यापूर्वी या सर्व विद्यार्थ्यांना परत अमेरिकेत बोलवण्यात येत आहे. त्यात भारतीय विद्यार्थ्यांचीही मोठी संख्या आहे. (Donald Trump)
भारतातून अमेरिकेत शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. सन 2021 मध्ये भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जारी केलेल्या व्हिसाची संख्या 96,000 होती. 2022 मध्ये 1,33,000 आणि 2023 मध्ये 1,40,000 पेक्षा जास्त झाली आहे. अमेरिकेत नव्या वर्षापासून ट्रम्प यांच्या हातात सत्ता जाणार आहे. ट्रम्प यांच्या संभाव्य धोरणांबद्दल अनेकांच्या मनात भीती आहे. सत्तेत येण्यापूर्वीच ट्रम्प यांनी काही गोष्टींवर कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. देशांतर्गत नोकरशाहीला शह देणारे निर्णय आणि इमिग्रेशन धोरण हे त्यातील प्रमुख मुद्दे आहेत. पदभार स्विकारल्यावर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे इमिग्रेशन धोरण आणि अमेरिकेत राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांबाबत अत्यंत कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे. याचा परिणाम अमेरिकेतील शैक्षणिक संस्थांवर होण्याची शक्याता जास्त आहे. (International News)
अमेरिकेतील अनेक विद्यापीठे ही भारत, चीन, कॅनडा सारख्या देशातून जाणा-या विद्यार्थ्यांच्या जोरावर चालवली जातात. ट्रम्प यांनी इमिग्रेशनचे धोरण बदलले तर या विद्यार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथील विद्यापीठ संचालकांमध्येही गोंधळाचा वातावरण आहे. अमेरिकन शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे त्यांच्या परदेशी विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना फोन करून त्यांना तात्काळ अमेरिकेत दाखल व्हा, असे सांगत आहेत. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांना अमेरिकेतून हद्दपार करण्याची शक्यता आहे. अमेरिकेत राहण्यासाठीची वैध कागदपत्रे आणि आवश्यक पुरावे सोबत ठेवण्याचेही आवाहन या विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे. त्यामुळे अमेरिकेत आता जे विद्यार्थी अन्य देशांतून आले आहेत, त्यांच्यामध्ये घबराट पसरली आहे. इतिहासातील सर्वात मोठी हद्दपार मोहीम आम्ही राबवू असे आश्वासन ट्रम्प यांनी निवडणुकीच्या दरम्यान दिले होते. तेच धोरण राष्ट्राध्यक्ष झाल्यावर राबवणार आहेत. मात्र यामुळे विद्यापीठ आणि विद्यार्थी या दोघांमध्येही खळबळ निर्माण झाली आहे. एका अहवालानुसार अमेरिकेतील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये चार लाखांहून अधिक मुले आहेत ज्यांची कागदपत्रे पूर्ण नाहीत. यातील काहींचे पालक विना कागदपत्रांसह अमेरिकेत छुप्या मार्गाने दाखल झाले आहेत. (Donald Trump)
========
हे देखील वाचा : चेस मास्टर गुकेश डोम्मराजू !
========
आता त्यांच्या मुलांकडेही योग्य कागदपत्र नसल्यामुळे त्यांच्या मुलांवरही हद्दपारीची वेळ येणार आहेत. ही बहुतांश मुले शाळा किंवा विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. अमेरिकेत अंदाजे 5,300 विद्यापीठे आणि महाविद्यालये आहेत. जगातील सर्वात पहिल्या 1,000 विद्यापीठांमध्ये 154 अमेरिकन विद्यापीठांचा समावेश आहे. यात मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हार्वर्ड विद्यापीठ, स्टॅनफोर्ड विद्यापीठ, कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ,कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले आदींचा समावेश आहे. अमेरिकेतील प्रत्येक राज्यात किमान एक राज्य विद्यापीठ आहे. याशिवाय अमेरिकेतही अनेक खाजगी विद्यापीठे आहेत. अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या 3,31,602 आहे. 2023-2024 या वर्षातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी नोंदणीत भारतातील ही सर्वाधिक संख्या आहे. यातील बहुतांश विद्यार्थी हे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत जातात. या विद्यार्थ्यांना पदवीनंतर अमेरिकेतली मोठ्या कंपन्यांमध्ये सहजपणे नोकरीही लागते. आता या सर्व विद्यार्थ्यांच्या वास्तव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय अमेरिकेतील विद्यापीठे ही आर्थिक धोरणाचा भाग आहे. कोविडच्या काळात भारतातून विद्यार्थी न गेल्यामुळे या विद्यापीठांना टाळे लावण्याची वेळ आली होती. आत्ताही ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अशीच वेळ येणार असल्याची चर्चा अमेरिकेत सुरु झाली आहे. (International News)
सई बने