बॉलिवूडमध्ये खाष्ट सासू, पाताळयंत्री खलनायिका, प्रेमळ आई अशा विविध भूमिका अजरामर करणाऱ्या ललिता पवार. करियरच्या सुरूवातीपासूनच ललिता पवार (Lalita Pawar) यांना आघाडीची नायिका होण्याची इच्छा होती. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षापासून सिनेसृष्टीत त्यांनी कामाला सुरूवात केली. त्यावेळी त्यांचे दोन्ही डोळे व्यवस्थित होते. मात्र या एका घटनेनंतर त्यांचा एक डोळा कायमस्वरूपी अधू झाला.
१९४२ साली प्रदर्शित झालेला ‘जंग ए आझादी’ या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान प्रसिद्ध अभिनेते भगवान दादा यांनी ललिता यांना कानशिलात लगावली. त्यांची ही थप्पड इतकी जबरदस्त होती की, त्यामुळे त्या जागीच बेशुद्ध पडल्या. त्यांच्या कानातून रक्तस्त्राव सुरु झाला. हा रक्तस्त्राव थांबण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांचा त्यांच्या शरिरावर परिणाम झाला. त्यांना एका डोळ्याने अंधुक दिसू लागले. इतकेच नाही तर त्यांना अर्धांगवायू झाला. त्यांची डावी बाजू निकामी झाली.
खरे पाहता शुटींग दरम्यानचा हा सीन भगवान दादांसाठी नवीन होता. स्क्रिप्टनुसार त्यांनी ललिता पवार यांना कानाखाली लावणे अपेक्षित होते. मात्र अशाप्रकारचा मारण्याचा अभिनय त्यांनी यापुर्वी कधीच केला नव्हता. भगवानदादा पैलवान होते आणि फिल्मी दुनियेत नवखे होते. त्यांनी चुकून ललिता यांच्या कानफटीत एक सणसणीत ठेवून दिली. त्यामुळे ललिता यांच्या डाव्या डोळयाची रक्तवाहिनी फुटली, चेहऱ्याला तात्पुरता पॅरॅलिसिसचा अटॅक आला. सतत तीन वर्षे उपचार घेऊनही शेवटी त्यांच्या डाव्या डोळ्यात दोष निर्माण झाला. त्यांना मुख्य नायिकेच्या भूमिका सोडून देऊन पुढे चरित्र नायिकेच्या भूमिका कराव्या लागल्या.
भारतीय चित्रपटसृष्टीत प्रदीर्घ काळ काम करणार्या महिला अभिनेत्री म्हणून ललिता पवार यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या साइटवर नोंदवलेल्या नोंदीनुसार हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी सात दशके काम केले. याकाळात त्यांनी ७०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सात दशकांच्या या कारकीर्दीत त्यांनी सकारात्मक, नकारात्मक आणि मोहक अशा सर्व प्रकारच्या पात्रांना जिवंत केले आहे.
शब्दांकन – शामल भंडारे.