Home » श्रीलंकेत लाल क्रांती आणि अनुरा दिसानायके

श्रीलंकेत लाल क्रांती आणि अनुरा दिसानायके

by Team Gajawaja
0 comment
Anura Kumara Dissanayake
Share

पाकिस्तान, बांगलादेश यांच्यापाठोपाठ आता श्रीलंका या शेजारी राष्ट्राकडून भारताला सतर्क रहाण्याची गरज आहे. कारण श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लाल क्रांती घडून आली आहे. अर्थात चीनचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणा-या अनुरा कुमारा दिसानायके यांची निवड झाली आहे. अनुरा कुमारा हे जेवढे चीनचे समर्थक आहेत, तेवढेच ते भारतद्वेषी म्हणूनही ओळखले जातात. कम्युनिष्ट विचारांचा त्यांच्यावर मोठा पगडा असून श्रीलंकेतील भारतातील गुंतवणुकीला त्यांनी कायम विरोध केला आहे. चीनसाठी श्रीलंकेत पायघड्या घालण्या-या अनुरा कुमारा यांनी आपण राष्ट्रपतीपदावर आलो तर पहिल्यांदा अदानी समुहाला श्रीलंका बंदी करु अशी घोषणा केली होती. श्रीलंकेत अदानी समुहाने मोठी गुंतवणूक केली असून भारतानंही तेथील सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. मात्र आता अनुरा यांच्या निवडीनंतर ही गुंतवणूक धोक्यात आली असून भारताच्या समुद्री सिमांनाही धोका निर्माण झाला आहे. (Anura Kumara Dissanayake)

श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोठी उलथापालथ झाली आहे. चीनचे कट्टर समर्थक असलेल्या अनुरा कुमारा दिसानायके यांनी श्रीलंकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय नोंदवला आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाची ते आता शपथ घेणार आहेत. सध्याचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे हे या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यानं हा भारताला मोठा फटका मानला जातो. नॅशनल पीपल्स पॉवरचे 57 वर्षाचे नेते अनुरा कुमारा दिसानायके निवडणुकीत विजयी झाल्याने त्यांचा शपथविधी लवकरच करण्यात येणार आहे. 2022 मध्ये श्रीलंकेत झालेल्या जनक्रांतीचे ते जनक मानले जातात. यावेळी श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोसळली होती. आता दोन वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत अनुरा कुमारा हे 42 टक्के मते मिळवून विजयी झाले. त्यांचा हा विजय निसटता आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या एका गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून श्रीलंका पुन्हा एका उठावाकडे वाटचाल करत असल्याचे सांगण्यात येत आहे. याला कारण म्हणजे अनुरा कुमारा यांच्या पक्षाची विचारसरणी आहे. (Anura Kumara Dissanayake)

श्रीलंकतेत मोठ्या प्रमाणात चीनची गुंतवणूक आहे. त्याला अनुरा कुमारा यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे. चीनच्या हवाली श्रीलंकेतील सर्वात मोठे बंदर देण्यात आले आहे. आता चीन या बंदरावरुन संपूर्ण हिंद महासागरावर सत्ता स्थापन कऱण्याचा मनसुबा ठेऊन आहे. मात्र श्रीलंकेतील एका गटाचा चीनच्या या गुंतवणुकीला विरोध आहे. 2022 च्या उठावानंतर श्रीलंकेची कोसळलेली अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी भारतानं मोठा मदतीचा हात दिला. अनेक भारतीय कंपन्यांनी श्रीलंकेत गुंतवणूक केली आहे. शिवाय श्रीलंकेला जोडणारा पूलही बांधण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. हे असतांना चीनने या सर्वाला विरोध केला होता. आता चीनच्या मतानुसार चालणारे अध्यक्ष श्रीलंकेत झाल्यास भारतीय गुंतवणुकदारांना मोठा फटका बसणार आहेच शिवाय भारताच्या सागरी सुरक्षेलाही धोका निर्माण होणार आहे. (Anura Kumara Dissanayake)

अनुरा कुमारा दिसानायके हे डाव्या पक्षाच्या जनता विमुक्ती पेरामुना पक्षाचे नेते आहेत. हा जेव्हीपी पक्ष भारताच्या विरोधासाठी ओळखला जातो. 1980 च्या दशकात, भारताने श्रीलंकेत एलटीटीईला सामोरे जाण्यासाठी शांतता रक्षक दल पाठवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा सर्वात आधी याच जेव्हीपी पक्षाने विरोध केला होता. या पक्षाच्या नेत्यांनी डिसेंबर 2023 मध्ये चीनला भेट दिली आणि चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. तेव्हापासून अनुरा कुमारा यांची भारतविरोधी भाषा अधिक तीव्र झाली आहे. याच पक्षानं श्रीलंकेतील अदानी समूहाचा पवन ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. अदानी प्रकल्प हा श्रीलंकेच्या ऊर्जा सार्वभौमत्वाला धोका असल्याचे अनुरा यांनी म्हटले होते. अदानी समूहाने पवन ऊर्जा केंद्र विकसित करण्यासाठी यावर्षी श्रीलंका सरकारसोबत करार केला. श्रीलंकेत अदानी समुह 442 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 367 कोटीची गुंतवणूक करणार होते. आता हा सर्वच प्रकल्प अडचणीत आला आहे. (Anura Kumara Dissanayake)

==============

हे देखील वाचा : रशियावर युक्रेनची आणि व्हॅक्यूम बॉम्बची एन्ट्री

===============

अनुरा कुमारा यांची लोकप्रियता वाढली ती श्रीलंकेतील अर्थव्यवस्था ढासळल्यावर झालेल्या जनआंदोलनामध्ये. त्यानंतरच्या काळातही अनुरा यांची लोकप्रियता कायम राहिली. परिणामी या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. अनुरा कुमारा सत्तेत आल्यावर आर्थिक सुविधा वाढतील अशी जनतेची अपेक्षा आहे. अनुराचे वडील उत्तर मध्य श्रीलंकेतील अनुराधापुरा जिल्ह्यातील एक शेतमजूर होते. 1990 च्या दशकात श्रीलंकेत साम्यवादाची विचारसरणीचा विद्यार्थी नेता म्हणून अनुरा प्रसिद्ध होते. 2000 मध्ये त्यांनी पहिली संसदीय निवडणूक जिंकली. तेव्हा त्यांना तत्कालीन अध्यक्ष चंद्रिका बंदरनायके कुमारतुंगा यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. या सर्व काळात त्यांच्या पक्षाची विचारसरणी ही कायम वादात राहिली आहे. आता याच पक्षाच्या हाती आणि अनुरा कुमारा यांच्या हाती श्रीलंकेची सत्ता गेली आहे.(Anura Kumara Dissanayake)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.