Home » किर्लोस्कारांची यशस्वी गाथा

किर्लोस्कारांची यशस्वी गाथा

by Team Gajawaja
0 comment
Share

‘मराठी माणूस उद्योग करू शकत नाही; तो फक्त नोकरीच करू शकतो.’ असं आपण पिढ्यान् पिढ्या ऐकत आलो आहोत. हो ना ? पण तुम्हाला ही गोष्ट माहितेय का; की हा कलंक 1900 च्या काळातच एका सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांनी साफ पुसून टाकला. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ किर्लोस्करांनी रोवली. यांचाच आदर्श घेत अनेक मराठी उद्योजक पुढे नावारुपास आले. डी. एस. के.चे दीपक कुलकर्णी, गरवारे इंडस्ट्रीजचे आबासाहेब गरवारे, चितळे बंधुचे भास्कर चितळे, केसरी टुर्सचे केसरी पाटील, वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील अशा अनेक मराठी उद्योजकांनी स्वत:सह आपल्या देशाचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर उभारला. आज करोडोच्या कंपनीचा डोलारा सांभाळण्यात हे उद्योजक यशस्वी आहेत.

लक्ष्मण किर्लोस्कर हे भारतातील पहिले मराठी उद्योजक. सायकलच्या अगदी छोट्याशा दुकानापासून सुरुवात करुन आपला व्यवसाय 70 हून अधिक देशांत पोहचवणारे किर्लोस्कर हे पहिले उद्योजक ठरले. किर्लोस्करांना महाराष्ट्राचे हेन्रीफोर्ड म्हणूनही गौरवण्यात आलं आहे.(हेन्रीफोर्ड हे अमेरिकेतील नावाजलेलं उद्योग जगतातील नाव. फोर्ड मोटर कंपनीचे हेन्रीफोर्ड संस्थापक आहेत.)

लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्म 20 जून 1869 बेळगाव जिल्ह्यातील गुर्लहोसूर या छोट्याशा गावात झाला. लहानपणापासूनच त्यांना चित्रकला आणि यांत्रिकी वस्तूंचं प्रचंड आकर्षण होतं. चित्रकलेची आवड असणाऱ्या किर्लोस्करांनी आपल्या वडिलांच्या इच्छेविरुध्द मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्टस महाविद्यालयात प्रवेश घेतला. यावेळी त्यांना त्यांच्या मोठ्या भावानं मदत केली. पण काही कालावधीनंतर रंगअंधत्वाचा (Partial color blindness) त्रास असल्याची बाब त्यांंच्या लक्षात आली आणि त्यांना शिक्षण सोडावं लागलं. खचून न जाता त्यांनी तिथेच मेकॅनिकल ड्राफ्ट्समनच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. मुळातच यांत्रिक गोष्टींमध्ये रस असल्यानं किर्लोस्करांनी त्यात प्राविण्यही मिळवलं.

किर्लोस्करांना चित्रकला सोडावी लागली मात्र रेखाचित्राचा त्यांचा चांगला अभ्यास असल्याने व्हिक्टोरिया टेक्नीकल इन्स्टिट्यूटमध्ये (V.J.T.I.)अध्यापक म्हणून नोकरी केली. मेकॅनिकल ड्रॉईंग विषयाचे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये अल्पावधीतच प्रसिद्ध झाले . त्यावेळी त्यांना 45 रु. मासिक पगार होता. उद्योग करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या किर्लोस्करांचं नोकरीत मन रमत नव्हतं. यांत्रिकी वस्तूंची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.

मुंबई सोडून किर्लोस्कर बेळगावला आपल्या मूळ गावी परतले. आणि गावात सायकल दुरुस्तीचे दुकान थाटलं. दुकानाच्या मागील बाजूस शेड बांधून कडबा कापणीचे यंत्र बनवण्यास सुरुवात केली. लक्ष्मण किर्लोस्कर यांना शेती क्षेत्रातील सखोल ज्ञान असल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात आल्या. त्यामुळे या कडबा यंत्राचा शेतकऱ्यांना फायदाच होईल हे त्यांनी ओळखलं. खेड्यापाड्यात जाऊन किर्लोस्करांनी या यंत्राबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांच्याही हे यंत्र चांगलंच पंसतील उतरलं. त्यानंतर त्यांनी सायकल दुकान 3 हजाराला विकले. आणि पूर्णपणे लक्ष कडबा यंत्र आणि लोखंडी नांगर बनवण्यावर केंद्रीत केलं.

भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरातमधील शेतकरी जमिनीच्या मशागतीसाठी लाकडी नांगर वापरत असे. पण लाकडी नांगरामुळे शेतकऱ्यांना हवी तशी जमिनीची मशागत होत नसे. त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी नांगर खरेदी केले तर काही शेतकऱ्यांना नांगर भाड्याने वापरण्यास दिले.

दिवसेंगणित व्यवसाय वाढत असल्यानं जमिनीचा प्रश्न उद्भवत होता. दरम्यान किर्लोस्करांच्या मित्रानं औंध येथे पडीक जमीन त्यांना वापरण्यासाठी दिली. या ओसाड जमिनीवर निवडूंग, सराटाचं साम्राज्य.अशा जमिनीवर कारखाना उभारण्यासाठी अनेक अडचणी होत्या. जिद्दी किर्लोस्करांनी कारखाना उभारण्याचं आव्हान स्विकारलं. आणि अखेर  मेहनतीच्या जोरावर किर्लोस्करांनी त्या जमिनीवर उद्योगनगरी उभारली. ती उद्योगनगरी ‘किर्लोस्कर वाडी’ म्हणून ओळखली जाते.

१९१४ साली युध्द सुरू झाल्यानं परदेशातून रंग, लोखंड मिळणं कठीण झालं. तरीही किर्लोस्कर यांनी न डगमगता…न हार मानता यावरही उपाय शोधून काढलाच. कोल्हापूरमध्ये काही तोफा पडून होत्या. किर्लोस्करांनी त्या तोफा घेतल्या. तोफा वितळवून कच्चे लोखंड मिळवले आणि नांगर बनवले. युध्दजन्य परिस्थितीत काही व्यापारांचे उद्योग तरले तर काहींचा व्यवसाय पूर्णपणे बसला. पण याला अपवाद होती ‘किर्लोस्कर ब्रदर्स कंपनी’

१९२० च्या सुमारास किर्लोस्करांनी ऊसाचा रस काढण्याचे मशिन आणि ड्रिलिंग मशिन याचबरोबर इतरही शेती उपयोगी साधने तयार केली. किर्लोस्कर ब्रदर्स लि., किर्लोस्कर ऑईल इंजिन, किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज, किर्लोस्कर न्युमेटिक कंपनी आदी किर्लोस्कर समुहाच्या कंपन्या आहेत.

हे ही वाचा : साहित्यातून आनंद साजरा करणारा लेखक

शाळा, वाचनालय, क्रीडागंणे, पोस्ट ऑफिस, टुमदार घरं, उद्याने अशा विविध सोय-सुविधांनी सुसज्ज किर्लोस्करांची किर्लोस्करवाडी हळुहळु ‘आदर्श नगरी’ बनली.

आयुष्यभर कठोर परिश्रम, अपयश आलं तरी खचून न जाता त्यावर मात करत किर्लोस्कर ‘किर्लोस्कर ब्रदर्स कंपनी’ आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यात यशस्वी झाले. किर्लोस्करांच्या सन्मानार्थ भारत सरकारनं पोस्टाचं तिकीट जाहीर केलं. आणि अखेर २६ सप्टेंबर १९५६ साली लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांची प्राणज्योत मालवली.

लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांच्या कर्तृत्वाला क फॅक्ट्सतर्फे सलाम !


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.