२०२५ मध्ये १३ जानेवारी २०२५ रोजी पौष पौर्णिमेच्या दिवशी महाकुंभ मेळ्याला सुरुवात होणार आहे. त्याचा समारोप २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी होईल. १२ वर्षानंतर प्रयागराजमध्ये महाकुंभ होणार आहे. यापूर्वी २०१३ मध्ये प्रयागराजला महाकुंभ मेळावा पार पडला होता. नागा साधू या कुंभ मेळ्याला हजेरी लावतात. कुंभमेळा नक्की काय आहे आणि तो कुठे, कधी भरतो चला जाणून घेऊया.
भारतामध्ये अनेक लहान मोठ्या धार्मिक यात्रा, सण, कार्यक्रम आयोजित केले जातात. या यात्रांमध्ये असंख्य भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात. या यात्रांमध्ये सर्वात मोठा धार्मिक उत्सव म्हणजे कुंभमेळा. दर १२ वर्षांनी भारतातल्या मोजक्या ४ शहरांमध्ये या कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. देशातीलच नव्हे जगभरातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव म्हणून हा कुंभमेळा ओळखला जातो.
कुंभमेळा हा असा धार्मिक सोहळा आहे, ज्याचे कोणतेही औपचारिक निमंत्रण कोणालाही दिले जात नाही. मात्र असे असूनही भाविक या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात. आम पासून खासपर्यंत सर्वच लोकं मोठ्या संख्येने हा सोहळा याची देही याची डोळा बघतात. हेच वैशिष्ट्य लक्षात घेता युनेस्कोने कुंभमेळ्याला ‘जागतिक सांस्कृतिक वारसा’ म्हणून घोषित केले आहे.
महाकुंभाचे आयोजन भारतातील केवळ प्रयागराज, नाशिक, हरिद्वार आणि उज्जैन येथेच केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, महाकुंभमधील शाही स्नानानंतर सर्व पापांमधून मुक्ती मिळते. हा कुंभमेळा दर १२ वर्षानंतर भारतातील चार पवित्र नद्या आणि चार तीर्थस्थानांवर आयोजित केला जातो. पुढच्या वर्षी अर्थात २०२५ मध्ये प्रयागराजमध्ये कुंभमेळा संपन्न होत आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया कुंभमेळ्याच्या इतिहासाबद्दल.
कुंभमेळ्याला सुमारे ८५० वर्षांचा इतिहास आहे. आदी शंकराचार्यांनी हा कुंभमेळा सुरू केला अशी मान्यता आहे. मात्र या कुंभमेळाला पौराणिक महत्व देखील आहे आणि त्याबद्दल पुराणांमध्ये देखील लिहिले असल्याचे जाणकारांकडून सांगितले जाते. पौराणिक कथांनुसार कुंभमेळ्याची सुरुवात समुद्र मंथनापासून झाली होती. शास्त्रानुसार पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस असतो. त्यामुळे दर १२ वर्षांनी एका ठिकाणी पुन्हा कुंभमेळा आयोजित केला जातो. देवांची १२ वर्ष ही पृथ्वीवरील कालगणनेनुसार १४४ वर्षांनी येतात.
स्वर्गात देखील १४४ वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते आणि त्यामुळे पृथ्वीवर महाकुंभमेळा आयोजित केला जातो. कुंभमेळ्याची ४ भागांत विभागणी केलेली आहे. जर पहिला कुंभमेळा हरिद्वारला भरला तर तीन वर्षांनी दुसरा कुंभमेळा प्रयाग येथे मग तिसरा कुंभमेळा उज्जैनला आणि मग चौथा कुंभमेळा नाशिकला भरतो.
कुंभमेळ्याची कथा समुद्रमंथनाशी निगडित आहे. असे सांगितले जाते की, एकदा महर्षि दुर्वास यांच्या शापामुळे इंद्र आणि अन्य देव शक्तिहीन झाले. त्यावेळी राक्षसांनी आक्रमण करून देवांना पराभूत केले आणि स्वर्गावर ताबा मिळवला. मग सर्व देवदेवता भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी भगवान विष्णूंनी देवांना राक्षसांसह समुद्र मंथन करून त्यातून अमृत बाहेर काढण्याचा सल्ला दिला.
यानुसार सर्व देवदेवता राक्षसांसोबत अमृत बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू लागले. समुद्र मंथनातून अमृत बाहेर येताच देवांच्या सांगण्यावरून इंद्राचा मुलगा जयंत अमृत कलश घेऊन आकाश मार्गाने पळून गेला. अमृत मिळवण्यासाठी राक्षसांनी जयंतचा पाठलाग सुरू केला. कठोर परिश्रमानंतर त्यांनी रस्त्यात जयंतला पकडले. मग अमृत कलशाचा ताबा मिळवण्यासाठी देव आणि राक्षसांमध्ये १२ दिवस भयंकर युद्ध झाले.
समुद्र मंथनातून निघालेल्या कलशातील अमृताचे थेंब हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी पडले होते. त्यामुळे दर तीन वर्षांनी या चारपैकी एका ठिकाणी कुंभमेळा भरतो. दर १२ वर्षांनी हा मेळा पुन्हा पहिल्या ठिकाणी भरतो. या चार ठिकाणीच कुंभमेळा भरतो.
या कुंभमेळ्याबद्दल अजून एक आख्यायिका सांगितली जाते आणि ती म्हणजे, भगीरथाने प्रयत्न करूनही गंगा नदी पृथ्वीवर अवतरित व्हायला तयार होत नव्हती. गंगा नदीमध्ये लोकांनी अंघोळ केल्यावर त्यांचे पाप क्षालन होईल असे सांगितले गेले. मात्र तेव्हा गंगा नदीने म्हटले की, लोकं त्याची पाप घालवण्यासाठी मला अपवित्र करतील आणि मी खराब होईल.
त्यावेळी तिला सांगितले गेले की, दर १२ वर्षांनी कुंभमेळा संपन्न होईल आणि तुझ्या पाण्यात साधू स्नान करतील. साधू महंतांच्या तपश्चर्येने आणि त्यांच्या पुण्याने, तेजाने तू देखील पुन्हा निर्मळ आणि स्वच्छ होशील. हे ऐकताच गंगा नदीने पृथ्वीवर येण्याचे मान्य केले. त्यामुळे कुंभमेळ्यात विविध आखाडे आणि साधू यांचे विशेष महत्त्व आहे. या उत्सवात विविध साधू आणि त्यांचे आखाडे यामध्ये होम-हवन, वैदिक मंत्रांचे पठण, प्रवचने, लोकांना उपदेश करणे असे अनेक विविध उपक्रम पहायला मिळतात.