सुप्रसिद्ध माजी क्रिकेटपटू कै. श्री विजय मर्चन्ट यांची एक गाजलेली उक्ती होती. ते नेहमी म्हणायचे की ‘यू शुड लिव्ह व्हेन पीपल आस्क व्हाय? रादर दॅन व्हाय नॉट.’
विराट कोहलीने T २० विश्वचषकानंतर भारताच्या T २० संघाचे कप्तानपद सोडणार असल्याची घोषणा केल्याचे वाचनात आले आणि श्री मर्चन्ट यांच्या वरील तत्वज्ञानाची आठवण झाली.
विराट (Virat Kohli) हा भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व २०१४ पासून सलग सात वर्षे करीत आहे. तो २०१७ पासून एकदिवसीय तसेच T २० संघाचा कप्तान आहे. धोनीने (MS Dhoni) २०१४ मध्ये कसोटीतून ऑस्ट्रेलियात मालिका चालू असतानाच अनपेक्षितपणे निवृत्ती पत्करली तर T २० आणि एक दिवसीय संघाचे नेतृत्व स्वेच्छेने २०१७ मध्ये सोडले. पण नेतृत्वासाठी कोहलीला तयार करून संघात पोकळी निर्माण होणार नाही याची काळजी घेतली.
कोहली भारताचा कप्तान झाला तो त्यानं २००७ मध्ये १९ वर्षाखालील संघाला विश्वचषक जिंकून दिला या पूर्वानुभवावर. शिवाय त्यावेळचा संघातील तो सर्वोत्कृष्ट फलंदाज होता म्हणून. एक खेळाडू म्हणून कोहली संघातील इतर सहकाऱ्यांपेक्षा कित्येक पटीने श्रेष्ठ आहे यात वादच नाही. कित्येक सामने त्याने भारताला एकहाती जिंकून दिले आहेत.

त्याची तंदुरुस्ती, खेळात झोकून देण्याची वृत्ती, कधीही हार न मानण्याची जिगर ही वैशिष्ट्ये कौतुकास्पद आहेत आणि याबाबतीत तो सचिन तेंडुलकर एवढाच ‘जिनिअस’ आहे हे निर्विवाद. पण सचिन ज्याप्रमाणे उत्कृष्ट कर्णधार बनू शकला नाही तसेच काहीसे कोहलीच्या बाबतीत झाले आहे. सचिनला (Sachin Tendulkar) आपल्या मर्यादांची वेळीच जाणीव झाली आणि त्याने एकदा कर्णधारपद सोडले ते कायमचेच. पण कोहलीला हे समजायला जास्ती वेळ लागला असे खेदाने म्हणावेसे वाटते.
कोहली हा कधीच रणनीतीकर वाटत नाही. त्याच्या मैदानावरील निर्णयामागे कुठलेही डावपेच अथवा नियोजन आढळत नाही. सर्व निर्णय उस्फूर्त पण प्रतिक्रियात्मक (reactionary) वाटतात. तसेच त्याचा गोलंदाजांशी संवादाचा अभाव आढळतो. त्यामुळे बरेचदा क्षेत्ररक्षणानुरूप गोलंदाजी होत नाही.
अश्विनने एके ठिकाणी म्हटले आहे की संघाच्या बैठकीत जे धोरण ठरते त्याच्या विपरीत निर्णय मैदानावर घेतले जातात त्यामुळे खेळाडू गोंधळून जातात. आपल्याला इंग्लंडचा जो रूट आणि ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ हे कायमचे डोकेदुखी होऊन राहिले आहेत आणि त्यांना लवकर बाद करण्याचा एकही उपाय आपल्याला सापडलेला नाही. हे कोहलीच्या नेतृत्वाचे अपयश म्हणावे लागेल.
याबाबतीत इंग्लंडचा कप्तान जो रूटचे उदाहरण बोलके आहे. त्याने प्रत्येक भारतीय खेळाडूच्या उणिवांचा अभ्यास करून त्यानुसार रणनीती अवलंबिली होती त्यामुळेच कोहली, पुजारा आणि राहणे हे वारंवार ऑफ स्टंप बाहेरील चेंडूंना बॅट लावून बाद होत होते. रोहित शर्माचे पूल आणि हुक हे आवडते फटके असल्याने त्याने त्याला त्याच फटाक्यांच्या सापळ्यात अडकवले.

कोहलीच्या बद्दल अजून एक आक्षेप घेतला जातो तो म्हणजे तो तरुण संघसहकाऱ्यांशी योग्य संवाद साधू शकत नाही व तो त्यांना उपलब्ध होत नाही. करुण नायर सारखा खेळाडू ज्याने पदार्पणाच्या मालिकेत त्रिशतक झळकावले त्याने २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यात जाहीर तक्रार केली की त्याला अंतिम संघात का स्थान मिळू शकत नव्हते त्याबद्दल त्याच्याशी कर्णधाराने कधीही बातचीत केली नाही.
सौरभ गांगुली (Sourav Ganguly) हा भारताचा एक यशस्वी नेता मानला जातो. त्याने सांगितले की तो त्याच्या सहकाऱ्यांसाठी सदैव उपलब्ध असे आणि कोणीही खेळाडू त्याला आपल्याला संघात का घेतले गेले नाही याची विचारणा करू शकत असे. त्याबरोबरच संघातील जेष्ठ खेळाडूंचा तो सन्मान राखत असे.
कर्णधार म्हणून सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये कोहलीचे यशाचे प्रमाण समाधानकारक आहे पण बरेचदा हे यश हाताखालील संघाच्या दर्जावर अवलंबून असते. आजपर्यंतचा क्रिकेटचा इतिहास असे सांगतो की संघातला सर्वोत्कृष्ट खेळाडू उत्तम कर्णधार असतोच असे नाही. इयान बोथम, विवियन रिचर्ड्स, ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर ही त्याची काही उदाहरणे आहेत.
याचे कारण म्हणजे या खेळाडूंची वैयक्तिक क्षमता अफाट होती त्यामुळे ते संघसहकाऱ्यांकडून तशाच कार्यक्षमतेची अपेक्षा बाळगत. प्रत्यक्षात हे शक्य नसते त्यामुळे कप्तान व इतर खेळाडू यांच्यामधील दरी वाढत असे आणि त्याचा सांघिक कामगिरीवर अनिष्ट परिणाम व्हायचा. कोहलीच्या बाबतीतही हेच घडते. कोहलीने भारताला अनेक सामने जिंकून दिले ते आपल्या असामान्य फलंदाजीच्या जोरावर, नेतृत्वगुणांमुळे नव्हे.

माईक ब्रेअरली हा इंग्लंडचा एक यशस्वी कप्तान मानला जातो. खरं म्हणजे निव्वळ गुणवत्तेच्या जोरावर तो संघात स्थान मिळवू शकत नव्हता पण त्याच्या नेतृत्वगुणांमुळेच त्याला संघात स्थान मिळाले होते. त्याने बोथमच्या अलौकिक गुणवत्तेचा सुयोग्य वापर करून घेतला आणि काही आश्चर्यकारक विजय मिळवून दाखवले.
लोकमान्य टिळकांनी म्हटले आहे की नेत्याने अनुयायांपेक्षा फक्त दोन पावले पुढे चालावे म्हणजे तो आपल्या सहकार्यांना बरोबर घेऊन चालू शकतो. हेच सूत्र क्रिकेटमध्येही लागू पडते.
कोहलीने आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून नेतृत्वाचा त्याग करावा व केवळ फलंदाज म्हणून खेळाचा मनमुराद आनंद लुटावा. तसेच नवीन कर्णधाराला आपल्या अनुभवाचा फायदा करून द्यावा.
याबाबतीत सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, धोनी यांचा आदर्श त्याच्यासमोर आहेच. शहाणपण उशिरा सुचले असले तरी कृती करायची वेळ अजून गेलेली नाही.
– रघुनंदन भागवत
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.