Home » कोहिनूर आता प्रदर्शनात दिसणार…

कोहिनूर आता प्रदर्शनात दिसणार…

by Team Gajawaja
0 comment
Kohinoor diamond
Share

मूळ भारताचा असलेला जगातला सर्वात महागडा हिरा म्हणजे कोहिनूर(Kohinoor diamond). या कोहिनूर हि-याला इंग्रज पंजाबमधून घेऊन गेले आणि थेट त्यांच्या राणीला तो भेट करुन मोकळे झाले. राणीनं हा आपला हिरा तिच्या मुकुटात मढवला….आता हाच कोहिनूर असलेला मुकुट ब्रिटनमध्ये सर्वसामान्यांना बघता येणार आहे. ब्रिटनमध्ये नवे राजा म्हणून चार्ल्स 6 मे रोजी शपथ घेणार आहेत. त्यांच्या राज्यारोहणानिमित्त विविध कार्यंक्रमांचे आयोजन  करण्यात आले आहे.  त्याचाच एक भाग म्हणून राणीच्या मुकुटाचे आणि दागिन्यांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे.  त्यात कोहिनूर हिराही (Kohinoor diamond) असणार आहे. मे महिन्यात हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.  

ब्रिटिश राजघराण्यांनी या संदर्भात एक माहितीपत्र जाहीर केले आहे. त्यानुसार आता कोहिनूर हिरा असलेला मुकुट, इतर काही शाही दागिने आणि शाही चिन्हे ‘टॉवर ऑफ लंडन’मध्ये सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. या प्रदर्शनाचे नाव ‘विजयाचे प्रतीक’ असेल.  या प्रदर्शनात असलेल्या सर्व दागिन्यांचा आणि त्यातील अनमोल हि-यांचा इतिहासही व्हिज्युअलसाठी सांगितला जाणार आहे. 26 मे पासून प्रदर्शन नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. ब्रिटनमधील पॅलेसचे व्यवस्थापन करणाऱ्या हिस्टोरिक रॉयल पॅलेसेस या धर्मादाय संस्थेने याबाबत माहिती सांगितली आहे.  यावेळी कोहिनूर हि-याचा (Kohinoor diamond) इतिहास ऑडीओमध्ये सांगितला जाणार आहेच, शिवाय त्यासंदर्भात व्हिडीओही दाखवला जाणार आहे.   

कोहिनूर हि-याचा (Kohinoor diamond) संपूर्ण प्रवास दाखवतांना त्यामध्ये मुघल सम्राट, इराणचे शाह, अफगाणिस्तानचे शासक आणि शीख महाराजा यांची माहिती देण्यात यईल असे, संबंधितांनी स्पष्ट केले आहे.  राजा चार्ल्सच्या राज्याभिषेकानंतर हे प्रदर्शन भरवण्यात येईल.  ब्रिटनचे नवे राजा म्हणून चार्ल्स यांचा 6 मे रोजी राज्याभिषेक होणार आहे. टॉवर ऑफ लंडन देखील यात आपली भूमिका बजावणार आहे. राज्याभिषेकानंतर लगेचच अनेक मौल्यवान मुकुट आणि दागिने प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतील. राणी एलिझाबेथ द्वितीयचा हा मुकूट आधीच वादाच्या भोव-यात अडकला आहे.  या मुकुटातील कोहिनूर हि-यावर (Kohinoor diamond) भारतानं आपला दावा सांगितला आहे. हा हिरा परत देण्याची विनंती इंग्लडकडे केली आहे.  हा मुकुट आता परंपरेनं राजा चार्ल्स यांची पत्नी कॅमेला यांच्याकडे येणार होता. मात्र या मुकुटातील हि-यांबाबत चाललेला वाद बघता कॅमेला यांनी हा मुकुट घालण्यास नकार दिला आहे.  याआधी, ब्रिटनची नवीन राणी म्हणजेच राजा चार्ल्स यांची पत्नी कॅमिला यांना राज्याभिषेकादरम्यान राणी एलिझाबेथचा कोहिनूर जडलेला मुकुट घालण्यात येणार होता.  पण आता ब्रिटीश राजघराण्याला भारतासोबतचे संबंध बिघडण्याची भीती वाटत असल्यानं कॅमेला यांनी हा मुकुट घालायला नकार दिल्याची चर्चा आहे.  आता  कॅमिलासाठी क्वीन मेरीचा 100 वर्षांचा मुकुट तयार करण्यात येत आहे.  

राणीचा मुकुट कोहिनूर आणि आफ्रिकेतील ग्रेट स्टारसह जगातील अनेक मौल्यवान हिरे आणि दागिन्यांनी जडलेला आहे. त्याची किंमत सुमारे $400 दशलक्ष एवढी आहे. भारताने ब्रिटनसमोर अनेकवेळा कोहिनूर हिऱ्यावर आपला कायदेशीर हक्क सांगितला आहे. भारताप्रमाणेच आफ्रिकेनेही ब्रिटनच्या शाही मुकुटात जडलेले आपले मौल्यवान हिरे परत करण्याची मागणी केली आहे.  कोहिनूर हिऱ्याचा इतिहास वादांनी भरलेला आहे. 1849 मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी पंजाबवर ताबा मिळवला तेव्हा हा हिरा भारतातून नेण्यात आला आणि ब्रिटनच्या तत्कालीन राणी व्हिक्टोरियाच्या हवाली करण्यात आला. नंतर या हि-याला इतर अनेक हिऱ्यांसह ब्रिटीश मुकुटात ठेवण्यात आले. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि इराणनेही या हिऱ्यावर दावा केला आहे. भारतातून ब्रिटनमध्ये पोहोचलेला कोहिनूर 105.6 कॅरेटचा आहे.  हा जगातील सर्वात मोठा हिरा मानला जातो. त्याचा इतिहास पाच हजार वर्षांहून जुना आहे. कोहिनूर हा शब्द पर्शियन असल्याचे सांगण्यात येते, याचा अर्थ प्रकाशाचा पर्वत आहे. इतिहासकार सांगतात की, पाच हजार वर्षांपूर्वी हा हिरा आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात असलेल्या गोलकोंडाच्या खाणीत उत्खननादरम्यान सापडला होता. कोहिनूर हिरा पंजाबचे महाराज रणजित सिंग यांच्या खजिन्यात होता.  तेथून ब्रिटिशांनी तो ताब्यात घेऊन राणी व्हिक्टोरियाला भेट दिला. असे म्हटले जाते की,  मुकुट तयार करतांना कारागीरांनी हिरा कापून त्याचा आकार कमी केला. असे असूनही, कोहिनूर हा जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यांपैकी एक आहे (Kohinoor diamond).

=======

हे देखील वाचा : जगातील उंचीने सर्वात लहान बॉडीबिल्डर प्रतिक मोहितेने बांधली लग्नगाठ; बायको बरोबरचे फोटो पाहिलेत का?

=======

पंजाबचे महाराजा रणजित सिंग यांचे पुत्र महाराजा दुलीप सिंग यांचा जन्म 1838 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, दुलीप सिंग यांना त्यांची आई राणी जिंद कौर यांनी गादीवर बसवण्यात आले. यानंतर 1845 मध्ये इंग्रजांनी शीख-ब्रिटिश युद्ध जिंकले.  यानंतर शिखांना सतलज नदीच्या डाव्या बाजूचा संपूर्ण प्रदेश आणि जालंधर इंग्रजांच्या स्वाधीन करावे लागले.  इंग्रजांनी राणी जिंद कौर यांच्याकडून अल्पवयीन राजा दुलीप सिंग यांचे संरक्षण हिरावून घेतले आणि शिखांच्या परिषदेत त्यांचे सर्व अधिकार दिले.  काही काळानंतर दुलीपसिंगचे सैन्य आणि इंग्रज यांच्यात युद्ध झाले. यावेळीही इंग्रजांचा विजय झाला आणि त्यांनी दुलीप सिंगचे साम्राज्य ब्रिटीश राज्यात विलीन केले.  महाराजा दुलीप सिंग यांना भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध कोहिनूर हिर्‍यासह (Kohinoor diamond) त्यांची संपत्ती समर्पण करण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी करावी लागली.  इंग्रजांनी महाराजांकडून कपटाने कोहिनूर ताब्यात घेतला होता. लॉर्ड डलहौसीने कोहिनूर लाहोरहून मुंबईत आणला.  1854 मध्ये हेन्री लॉरेन्सने कोहिनूर इंग्लंडला नेला आणि राणी व्हिक्टोरियाला तो दिला. गोपाल भारद्वाज यांच्या म्हणण्यानुसार इंग्रजांनी अफवा पसरवली की कोहिनूर हिरा (Kohinoor diamond) त्यांना महाराज दलीप सिंग यांनी भेट म्हणून दिला होता. मात्र कोहिनूर ब्रिटीशांनी फसवून आपल्या ताब्यात घेतला होता. आता तोच कोहिनूर बघण्याची संधी 6 मे नंतर मिळणार आहे. ब्रिटनच्या राणीच्या मुकुटातला हा अनमोल हिरा भारताची शान आहे, तो कधी परत मिळाला तर तो दिवस भाग्याचा असेल.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.