बाहेर फिरायला जाणे, वेगवेगळी स्थळे बघणे, निसर्गाचा आनंद घेणे प्रत्येकालाच आवडत असते. सवडीनुसार कधी जवळ तर कधी लांब फिरायला सगळेच जातात. आज आम्ही तुम्हाला जवळच आपल्या महाराष्ट्रात फिरण्यासाठीचा एक उत्तम पर्याय सुचवणार आहोत. आपल्या महाराष्ट्र राज्यात पर्यटनासाठी अनेक उत्तमोत्तम ठिकाणं आहेत. तसे पाहिले तर हे ठिकाण सर्वांनाच माहित आहे. मात्र या ठिकाणी जे पाहण्याजोगे आहे, त्याबद्दल जास्त माहिती कोणालाच नसेल. तर ते ठिकाण आहे रत्नागिरी.
कोकणाचे हृदय म्हणून रत्नागिरीची ओळख आहे. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टयांवरील अतिशय महत्वाचे आणि प्रसिद्ध शहर म्हणून रत्नागिरीची ओळख आहे. याच रत्नागिरीमध्ये फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, त्यातली मोजकीच लोकांना माहित आहे, आणि बरीचशी माहित नसतील. आपण आज त्याबद्दल जाणून घेऊया.
गणपतीपुळे :
गणपतीपुळ्याबद्दल तर बहुतांश लोकांना माहीतच असेल. अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय असे हे ठिकाण आहे. गणपतीपुळ्याचा गणपती देखील खूपच प्रसिद्ध आहे. रत्नागिरीपासून 35 कि. मी. अंतरावर समुद्राच्या किनाऱ्यावर हे सुंदर गणपती मंदिर स्थित आहे. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी या ठिकाणी नंदादीप स्थापित केला तर बाजीराव यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी नगारखान्याची व्यवस्था केली. तर माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाई यांनी येथे दगडी धर्मशाळा उभारली असा उल्लेख इतिहासामध्ये आढळून येतो. येथील सुव्यवस्था आणि सुशोभिकरणामुळे पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहे.
रत्नागिरी किल्ला :
रत्नागिरी किल्ला, याला रत्नदुर्ग किल्ला किंवा भगवती किल्ला असेही म्हणतात. रत्नागिरी जिल्ह्यापासून 2 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हा महत्त्वाचा किल्ला आहे. या किल्ल्यात भगवती मंदिर असून हे एक प्रमुख पर्यटन स्थळ मानले जाते. साधारण 120 एकरवर हा किल्ला उभा आहे. या संपूर्ण किल्ल्याला साधारणतः 29 बुरुज आहेत. किल्ला पेठ, बालेकिल्ला आणि दीपगृह अशा तीन विभागांमध्ये हा किल्ला विभागला आहे. तिन्ही बाजूला समुद्र असून दीपगृह असल्याने हा परिसर अतिशय नयनरम्य दिसतो. शिवाय हा गड चढायला देखील खूपच सोपा आहे.
जयगड किल्ला :
विजापूरकरांनी 16 व्या शतकामध्ये जयगड किल्ला हा ऐतिहासिक किल्ला बांधला असावा असा अंदाज व्यक्त केला जातो. 1695 पासून हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता. तर 1818 मध्ये कोणतीही लढाई न करता इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला असे इतिहासात नमूद आहे. किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तटबंदी खोल्या दिसतात. तर उजव्या बाजूला प्रशस्त मैदान आणि अनेक वास्तू दिसून येतात. ब्रिटीश काळात येथे दोन मजल्यांचे विश्रामगृह बांधलेले आढळते. तर इथेही गणेश मंदिर असून येथे दीपमाळही आहे. जयगड किल्ला हा 12 एकरमध्ये विस्तारित असून चढायला एकदम सोपा आहे.
थिबा पॅलेस :
जवळपास 132 वर्षांपासून हा भव्य ऐतिहासिक राजवाडा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. ब्रम्हदेशाच्या थिबा राजाचे या राजवाड्यात वास्तव्य होते. थिबा राजाने ब्रम्हदेशावर सात वर्षे राज्य केले आणि असे राज्य करणारा तो शेवटचा राजा होता. त्यावेळी ब्रम्हदेशावर इंग्रजांनी कब्जा मिळवला आणि त्यानंतर थिबा राजा त्याच्या कुटुंबासह म्यानमार ते मद्रास आणि मद्रासवरून कोकणातील रत्नागिरीमध्ये येऊन स्थायिक झाला. अनेक ऐतिहासिक घटनांचा हा पॅलेस साक्षीदार असून या पॅलेसमध्ये संगमरवरी नृत्यागृह आहे. तर याच्या छतावर अत्यंत सुंदर नक्षीकाम असणाऱ्या पट्ट्या लावण्यात आल्या आहेत. याशिवाय खिडक्यांना रंगीत अशा इटालियन काचाही बसविण्यात आल्या आहेत.
कनकादित्य मंदिर :
भारतामध्ये एकूण सात सूर्यमंदिरे आहेत. त्यापैकी एक कनकादित्याचे मंदिर आहे रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी गावात. रत्नागिरी शहरापासून साधारण 40 किलोमीटरवर हे गाव आहे. 900 वर्षे प्राचीन हे मंदिर असून कौलारू स्थापत्य शैलीतील हे मंदिर खूपच सुंदर आहे. लाकडावर कोरलेल्या देवता, ज्यामध्ये प्रामुख्याने कार्तिक, वरूण, वायू, शेषशायी विष्णू आहे. रथसप्तमीच्या निमित्ताने येथे मोठा उत्सव असतो. या दिवशी येथे कनकादित्य आणि कालिकादेवीचा लग्नसोहळा पाहायला मिळतो. मंदिरामध्ये कमालीची स्वच्छता आहे.
मांडवी बीच :
रत्नागिरीचा गेटवे म्हणून मांडवीचा समुद्रकिनारा ओळखला जातो. मांडवीचा समुद्रकिनारा खूपच मोठा आहे. रजिवाडा बंदरापर्यंत पसरलेला हा समुद्रकिनारा दक्षिणेला अरबी समुद्रकिनाऱ्याला मिळतो. ब्लॅक सी अर्थात काळा समुद्र म्हणूनही हा समुद्रकिनारा ओळखण्यात येतो. याच्या किनाऱ्यावर काळी रेती सापडते आणि त्यामुळेच याला काळा समुद्र असे नाव पडले आहे. याठिकाणी अनेक पाण्याशी संबंधित विविध गेम्स आता चालू करण्यात आल्यामुळे इथे पर्यटकांची रांग दिसून येते.
पावस :
या पवित्र स्थळाला श्री क्षेत्र पावस असेही म्हटले जाते. श्री स्वामी स्वरूपानंदाचे समाधीस्थळ म्हणून देखील पावस प्रसिद्ध आहे. येथे स्वरूपानंद यांच्या मठामध्ये त्यांच्या नित्य वापरातील वस्तू आणि ग्रंथसंपदा जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. तर रोज इथे खिचडीचा महाप्रसाद देण्यात येतो. राहण्यासाठी भक्तनिवासाची सोयही आहे.
=======
हे देखील वाचा : मानसिक तणावामुळेही होतो मधुमेह, असा करा बचाव
=======
भाट्ये बीच :
रत्नागिरीमधील हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे. अत्यंत स्वच्छ असणाऱ्या या समुद्रकिनारी राहण्यासाठीही सोय करण्यात आली आहे. अगदी दुतर्फा झाडे आणि मधून जाणारा रस्ता आणि समुद्रकिनारा असा मनमोहक नजारा या ठिकाणी दिसून येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथे अजिबात गर्दी नसते.
वेळणेश्वर मंदिर :
वेळणेश्वरचा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर असून, 1200 वर्षापूर्वी येथे हे गाव वसले गेले असे सांगण्यात येते. या किनाऱ्यावर वेळणेश्वराचे अत्यंत सुंदर शिवमंदिर आहे. मंदिराच्या बाजूने जो भाग समुद्रामध्ये आत आहे, त्याला मेरूमंडल असे म्हटले जाते. महाराष्ट्र शासनाने वेळणेश्वरला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे.