आपल्याकडे एक म्हण खूपच प्रचलित आहे आणि ती म्हणजे, ‘जुनं ते सोनं’. ही म्हण आजच्या विषयासाठी अगदी चपखलपणे बसते. आजच्या आधुनिक काळात जिथे आपली मेहनत कमी करणाऱ्या अनेक वस्तू, उपकरणं उपलब्ध आहे. त्या काळात आपण अनेक जुन्या गोष्टी पुन्हा वापरण्यास सुरुवात करत आहोत. असे का तर याचे उत्तर पहिल्याच ओळींमध्ये दिले आहे.
आता सगळ्यांच्याच घरी किचनमध्ये स्वयंपाकासाठी विविध प्रकारची भांडी वापरली जातात. ही किचनमध्ये वापरली जाणारी भांडी काळानुरूप बदलत गेली. आधी अल्युमिनियम, स्टील, पितळेची भांडी वापरली जायची. त्यानंतर नॉनस्टिक भांडी आली, कोटिंगची भांडी आली. आता पुन्हा ट्रेंड आला आहे, मातीची भांडी वापरण्याचा. आपल्या पूर्वजांनी हीच मातीची भांडी वापरून अनेक दशकं स्वयंपाक केला. तेव्हा कुठे अशी वेगळी वेगळी भांडी होती.
जुन्या लोकांच्या अनेक किंबहुना सर्वच सवयी आज आपण विचार केला तर त्या सर्वच दृष्टीने अतिशय योग्य आणि चांगल्या होत्या. आता स्वयंपाकासाठी वापरली जाणारी मातीची भांडीच घ्या. ही भांडी पर्यावरण पूरक तर होतीच किंवा आहे. सोबतच आरोग्याच्या दृष्टीने देखील अतिशय चांगली आणि उत्तम आहेत. या भांड्यांमध्ये शिवजलेले अन्न खाल्ले तर आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊया मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नाचे फायदे.
मातीच्या भांड्यात अन्न शिजवण्याचे फायदे
– मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्नात मोठ्या प्रमाणात पोषक असते. या अन्नामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आदी अनेक शरीरास आवश्यक पोषक तत्त्वे आढळतात.
– मातीच्या भांड्यात तयार केलेले अन्न पचायला जड जात नाही. या भांड्यामध्ये स्वयंपाक करण्यासाठी तेल अतिशय कमी लागते. ज्यामुळे फॅट्सचे टेन्शन नसते.
– मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न अधिक चवदार असते. याशिवाय अन्नातील ओलावा कायम राहतो, ज्यामुळे पदार्थ जास्त काळ ताजे राहते.
– मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न इतर धातूच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नाच्या तुलनेत दिर्घकाळ गरम राहते. यामुळे तुम्हाला पदार्थ सतत गरम करावे लागत नाही.
– मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यास त्यात असलेले लोह, फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम अन्नातउतरते. जे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. मातीच्या भांड्यात असणारे लहान छिद्र आग आणि ओलावा समान रीतीने प्रसारित करण्यास मदत करतात ज्यामुळे अन्नातील पोषक तत्त्व सुरक्षित राहतात.
– मातीच्या भांड्यांमध्ये अन्न स्वादिष्ट होतं. या भांड्यांमध्ये शिजवण्यामुळे अन्न पौष्टिक राहतं तसेच अन्नाची चव वाढते.
– हे अन्न पचनास सोपे असल्याने अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता आदी पोत्याच्या समस्या दूर होतात.
– मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यास त्या अन्नाचे पीएच मूल्य राखले जाते, ते बर्याच रोगांना प्रतिबंधित करते.
===========
हे देखील वाचा : उत्तम आरोग्यासाठी पाणी पिण्याचे ‘हे’ नियम पाळा
===========
मातीचे भांडे कसे वापरावे?
सर्वप्रथम, बाजारातून मातीचा भांडे विकत घेतल्यावर त्यावर कोणतेही खाद्यतेल लावा आणि त्या भांड्यामधे पाणी ठेवा. यानंतर भांडे मंद आचेवर 2 ते 3 तास ठेवा. नंतर ते उतरून थंड होऊ द्या. असे केल्याने ही भांडी अधिक कठोर आणि मजबूत होतील आणि भांडे गळणार नाही आणि मातीचा वास देखील निघून जाईल.
मातीची भांडी स्वच्छ कशी करायची?
मातीची भांडी कशी धुवायची हे माहित नसल्यामुळे बरेच वेळा लोक ते विकत घेणे टाळतात. मातीची भांडी धुणे खूप सोपे आहे. यासाठी आपल्याला साबण किंवा द्रव असलेले कोणतेही रसायन आवश्यक नाही. आपण फक्त गरम पाण्याच्या मदतीने ही भांडी स्वच्छ करू शकता. वंगण भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण पाण्यात लिंबाचा रस घालू शकता. जर भांडी घासून भांडी स्वच्छ करायची असतील तर यासाठी नारळाची बाह्य साल वापरावी.