Home » टाचांची निगा राखण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

टाचांची निगा राखण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

by Jyotsna Kulkarni
0 comment
Crack Heels
Share

आपल्या संपूर्ण शरीराचा भार आपल्या पायांवर असतो. त्यामुळे साहजिकच आपल्या पायांची आपण जास्त निगा घेतली पाहिजे. पायांमध्ये देखील जो तळव्यांची भाग आहे, त्याची आपला भार उचलण्यात मोठी भूमिका असते. आपले तळवे, टाचा या आपल्या शरीराचा अविभाज्य भाग आहेत. मात्र याकडे त्यांच्या आरोग्याकडे आपण नेहमीच का दुर्लक्ष करतो? टाचा देखील आपल्या सौंदयामध्ये मोठी भर घालतात. मऊ, प्लॅन टाचा सगळ्यांनाच आवडतात. मात्र आपण त्या जपत नाही त्याची निगा राखत नाही. टाचांच्या दुखण्यामध्ये टाचांना तडे जाणे, भेगा पडणे, त्वचा कोरडी होणे, मृत त्वचा जमा होते आदी अनेक त्रास सामील आहेत.

आता हिवाळा सुरु होणार आहे. हिवाळा लागला की त्वचा कोरडी होते आणि टाचांना भेगा पडतात, त्यातून रक्त देखील येते. यासाठी आपण उपाय केलेच पाहिजे. टाचांना भेगा पडण्याची अनेक कारणं असू शकतात. शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता किंवा हार्मोन्स बदलामुळं देखील पायाला भेगा पडू शकतात. टाचांना भेगा पडणं किंवा टाचा फाटण्याची समस्या महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. टाचांचे सौंदर्य जपण्यासाठी आपल्याला नेहमीच पार्लरमध्ये जाऊन पेडीक्युर किंवा अजून महागड्या ट्रीटमेंट घ्यायची देखील आवश्यकता नाही. आपण घरच्या घरी आपल्या टाचांची अतिशय योग्य आणि चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ शकतो.

टाचांना भेगा ठीक करण्याचे घरगुती उपाय

१) व्हिटॅमिन ई ऑइल व कॅप्सूल
व्हिटॅमिन ई हे त्वचेसाठी लाभदायक असते. जखमा झाल्या असतील तर व्हिटॅमिन ई चा वापर गुणकारी ठरू शकतो. व्हिटॅमिन ई च्या कॅप्सूल किंवा तेलाने टाचांना दिवसातून दोन वेळा मसाज केल्यास फरक दिसून येईल. यातील अँटी इन्फ्लेमेंटरी आणि हायड्रेटिंग गुणांमुळे त्वचेची सूज कमी होते तसेच त्वचा मऊ राहते.

Crack Heels

२) तांदळाचे पीठ
तांदळाच्या पिठात थोडा लिंबाचा रस आणि मध टाकून आपण पायांसाठी पॅक बनवू शकता. आठवड्यात एकदा पाय कोमट पाण्यात ठेवल्यावर त्यानंतर हा पॅक लावून आपण घरीच पेडिक्युअर करू शकता.

३) तिळाचे तेल
तिळाच्या तेलात अनेक पोषक तत्व असतात, विशेषतः थंडीत तिळाच्या तेलाची मालिश केल्यास त्वचा रुक्ष होण्यापासून वाचते. रोज रात्री थोडं हलकं कोमट तेल पायाच्या तळव्यांना लावून झोपू शकता.

४) लिंबू
एका बादलीत थोडे पाणी घेऊन त्यात लिंबू पिळून घ्या. पाण्यात पाय घालून २० मिनिटे बसा. भेगा पडलेल्या भागांना प्युमिस स्टोनने पूर्णपणे घासून घ्या. ते क्रॅकिंगसाठी चांगले आहे.

५) लिक्विड बॅंडेज
पायाच्या भेगा भरून काढण्यासाठी लिक्विड बॅंडेज लावल्यामुळे ते पायाच्या भेगा सील करते. यामुळे क्रॅक वाढण्याची शक्यता कमी होते. एकदा लावल्यानंतर त्याचा प्रभाव बराच काळ टिकतो.

६) खोबरेल तेल
ज्यांना ड्राय स्किनचा त्रास असतो त्यांना खोबरेल तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो. हे तुमच्या त्वचेला ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करू शकते. कोमट पाण्यात पाय भिजवल्यानंतर खोबरेल तेल वापरणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. जर टाचेतल्या भेगांमधून रक्तस्त्राव किंवा इन्फेक्शन होऊ शकते असे वाटत असले तरी खोबरेल तेलातील अ‍ॅंटीबायोटीक आणि अ‍ॅंटी मायक्रोबियल गुणधर्म त्याला प्रतिबंध करण्यात मदत करू शकतात.

७) पॅराफिन मेण
पायांच्या टाचांना भेगा पडण्याच्या समस्येपासून सुटका पाहिजे असल्यास पॅराफिन मेणाचा चांगला उपयोग होऊ शकतो. त्यामुळे त्वचा मऊ राहण्यास मदत होते. पॅराफिन मेण त्वचेवर लावल्यास त्वचेला ओलावा मिळण्यास मदत होते. त्वचेतल्या मृत पेशी नाहीशा करण्यासाठीही याची मदत होऊ शकते.

८) शिया बटर
टाचांच्या भेगांसाठी शिया बटरही फायदेशीर ठरू शकते. रुक्ष झालेली त्वचा मृदू बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. यात अँटीबॅक्टेरियल, अँटिफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुण असतात. कुठल्याही फंगल इंफेक्शनपासून वाचण्यासाठी याची मदत होते.

=======

हे देखील वाचा : शतावरी सेवनाचे आरोग्यदायी फायदे

=======

९) हील बाम
टाचांना भेगा पडण्याची समस्या असल्यास सर्वप्रथम अँटी हील क्रॅक क्रीम किंवा बाम वापरायला सुरुवात करावी. मॉइश्चरायझ आणि एक्सफोलिएटयुक्त हे क्रीम तुमच्या टाचांना सुंदर आणि मुलायम बनवतील.
मधाचा वापर

१०) मध
मध हे उत्तम मॉश्चरायझरही आहे. पायाची त्वचा आर्द्रता ठेवण्यासोबतच तेथील त्वचेचे पोषणही मध करते. यासाठी पाण्यात एक अर्धा कप मध घालावे. त्या पाण्यात पाय बुडवून किमान वीस मिनिट बसावं.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.