आपल्याला कोणताही त्रास झाला की लगेच आपण डॉक्टरकडे जातो आणि विविध हाय डोस असलेले ऍलोपथीचे पेन किलर औषधं घेतो. यामुळे नक्कीच आपल्याला अराम मिळतो, मात्र या गोळ्यांचे अनेक दुष्परिणाम देखील शरीरावर होतात. अनेकांनी हे दुष्परिणाम ओळखले आणि लोकं आता हळूहळू का होईना नॅचरोपथी, आयुर्वेदिक, होमिओपेथिक आदी नैसर्गिक उपचारांकडे वळताना दिसत आहे.
आजच्या आधुनिक काळात याच नैसर्गिक उपचारांपैकी एक असलेल्या मड थेरपीची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. अनेक लोकं ही मड थेरपी घेताना दिसत आहे. या थेरपीचे फायदे आणि ही मड थेरपी म्हणजे काय हेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
आयुर्वेदानुसार आपले शरीर हे पंचमहाभूतांपासून बनले आहे. यात पाणी, वायू, पृथ्वी, आकाश आणि अग्नी या पाच घटकांचा समावेश आहे. यातला एक महत्वाचा घटक म्हणजे पृथ्वी आणि याच पृथ्वीवरील माती ही अतिशय गुणकारी समजली जाते. पृथ्वीमध्ये शरीराला आतून बरे करण्याची आणि कोणतेही असंतुलन सुधारण्याची क्षमता आहे. या मातीमध्ये अनेक पोषक घटक असतात. याच मातीचा वापर करून मड थेरपी तयार करण्यात आली आहे. मड म्हणजे काय तर चिखल. चिखलाचा वापर करून ही थेरपी देण्यात आहे.
मड थेरपीसाठी जमिनीपासून ५ ते ८ फूट खाली विशिष्ट प्रकारची माती काढली जाते आणि नंतर ती या थेरपीसाठी वापरली जाते. या मातीत अॅक्टिनोमायसीटीस नावाचा जीवाणू आढळतो, जो आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हा जीवाणू ऋतूनुसार त्याचे स्वरूप बदलतो आणि जेव्हा तो पाणी आणि मातीमध्ये मिसळतो तेव्हा त्यातून एकप्रकारचा वास येतो, ज्याचा आपल्याला मानसिक फायदा देखील होतो.
मड थेरपीमध्ये चिखल शरीराच्या एखाद्या भागावर किंवा संपूर्ण शरीरावर लावला जातो. या थेरपीमुळे अनेक आजारांवर मात केली जाते. आयुर्वेदात अनेक वर्षांपासून किंबहुना शतकांपासून मड थेरपी वापरली जात आहे.
अनेक गोष्टींवर उपचार करण्यासाठी या मड थेरपीमुळे आपल्याला असलेल्या समस्या मुळापासून दूर होतात आणि त्यांचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. अंगावर चिखल लावून किंवा मातीच्या पट्ट्या लावून जे उपचार केले जातात, त्याला मड थेरपी म्हणतात. मड थेरपीद्वारे अनेक रोगांवर उपचार केले जातात. चला जाणून घेऊया या मड थेरपीमुळे आपल्याला कोणते फायदे होतात.
– मड थेरपीमध्ये शरीरातील वाईट विषारी द्रव्ये शोषून घेण्यासाठी आणि पातळ करण्यासाठी मोठी मदत होते. पोटाभोवती चिखलाचा थर लावल्याने पचनक्रिया सुधारते, नैसर्गिकरीत्या शरीर डिटॉक्सिफाय होते आणि शरीरातील चयापचयाची गतीही वाढते.
– माती थंड गुणधर्माची असते. ज्यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीरातील उष्णता कमी केल्याने तणाव, नैराश्य आणि चिंता या लक्षणांशी लढण्यास मदत होते. मड थेरपीवर केलेल्या अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की ते घेतल्याने मेंदूतील मज्जातंतूंचे अवरोधित मार्ग साफ होण्यास मदत होते.
– मड थेरपीचा सर्वात मोठा फायदा त्वचेसाठी होतो. आयुर्वेदानुसार माती विषारी पदार्थ काढून टाकते आणि त्वचेवर आणि रक्तावर थंड प्रभाव निर्माण करते, ज्यामुळे शरीरातील पित्ताचे वाईट परिणाम नियंत्रित करण्यात मदत होते. आपल्या अशुद्ध त्वचेचे डिटॉक्सिफाय करते, ज्यामुळे तुम्हाला मऊ आणि ताजेतवाने त्वचा मिळते. चिखल त्वचेमध्ये जमा झालेले हानिकारक विष त्याच्या छिद्रांद्वारे बाहेर काढतो.
– हजारो वर्षे जुन्या मड थेरपीचा वापर शरीरातील विषारी द्रव्ये शोषून घेण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि इतर अनेक आजारांच्या उपचारांसाठी केला जातो.
– अनियमित मासिक पाळी येण्याच्या समस्येमुळे गर्भाशय, हात, पाय, कंबर आणि स्तनात वेदना होतात. भूक न लागणे, थकवा जाणवणे, वजन वाढणे, बद्धकोष्ठता अशा समस्या उद्भवू लागतात. अशा परिस्थितीत मड थेरपी खूप प्रभावी ठरू शकते. मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी पोटावर कोमट मातीची पट्टी ठेवा, त्यामुळे वेदना कमी होतील.
– कॉम्प्युटरवर जास्त काम केल्यामुळे डोळ्यात दुखत असेल तर तळव्यांना मातीची पेस्ट लावावी. असे केल्याने डोळ्यांना खूप आराम मिळेल.
– हे शरीरातील विषारी पदार्थ पातळ करते आणि शोषून घेते आणि शेवटी ते शरीरातून काढून टाकते. हे स्नायूंना आराम देते, रक्त परिसंचरण सुधारते आणि चयापचय नियंत्रित करण्यास मदत करते.
(टीप : कोणतेही उपाय करण्याधी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)