प्रत्येक भारतीय स्त्रीचे पहिले प्रेम म्हणजे साडी. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्याच महिलांना साडी आवडतच असते. साडी हे भारतीय महिलांचे (Indian Women) महावस्त्र म्हणून ओळखले जाते. या वेषभूषेमध्ये स्त्रीचे सौंदर्यच अधिकच खुलून येते. साडीमध्ये अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की, साड्यांचे सर्वच प्रकार तिच्याकडे असायला पाहिजे. मात्र कधी कधी काही कारणास्तव महिलांना असे करणे शक्य नसते. त्यातही जे अतिशय लोकप्रिय, प्रसिद्ध आणि आकर्षक प्रकार आहे ते घेण्यास प्रत्येक स्त्री आग्रही असते. (Banarasi Saree)
यातलाच एक अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध प्रकार म्हणजे बनारसी साडी (Banarasi Saree). अतिशय सुंदर, रेखीव अशी बनारसी साडी महिला वर्गामध्ये कमालीची प्रसिद्ध आहे. पाहताचक्षणी कोणीही या साडीच्या प्रेमात पडावे अशी ही साडी आपल्याकडे देखील असावी अशी प्रत्येकीची इच्छा असते. मात्र खरी बनारसी साडी खूपच महाग असते. त्यामुळे ही साडी घेताना आपल्या मनात अनेक विचार येतात.
आजकाल प्रत्येक साडीची कॉपी साडी बनवून स्वस्तामध्ये विकली जाते. मात्र ओरिजनल साडीची सर काही तिला येत नाही. शिवाय बाजारात ओरिजनल बनारसी साडीच्या नावाखाली नकली साड्याही विकल्या जातात. अशा वेळी, खऱ्या बनारसी साडीची ओळख कशी करायची, हा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांसमोर उभा राहतो.मग आज प्रत्येक स्त्रीच्या एका प्रश्नाचे उत्तर आम्ही या लेखातून देणार आहोत. दुकानात गेल्यावर खरी बनारसी साडी ओळखायची कशी? यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊया. (Marathi Top News)
धाग्याचा पॅटर्न
बनारसी साडी ओखळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तिचे विणकाम. खरी बनारसी साडी विणण्याचे काम नेहमीच आडव्या दिशेने केले जाते. जर साडी खरंच बनारसी सिल्कपासून बनलेली असेल तर तिच्या धाग्यांची रचना नेहमीच आडवी असेल. त्यात कुठेही आपल्याला उभ्या दिशेने धागे दिसणार नाहीत.
विणकामाचा दर्जा
खरी बनारसी साडी हाताने विणलेली असते. तिच्या डिझाईन्समध्ये एकसारखेपणा नसतो. हाताने विणकाम करताना काही छोटे दोष साडीमध्ये राहू शकतात. जर साडीवरचे डिझाईन्स अगदी परफेक्ट, एकसारखे दिसत असतील, तर समजावे की, ती साडी यंत्राने बनवलेली आहे.
साडीच्या बॉर्डर खुणा
बनारसी सिल्क साडी विणताना, कारागीर ती घट्ट ठेवण्यासाठी तिच्या बॉर्डर्सला खिळ्यांनी घट्ट करतात. जेणेकरून डिझाइन खराब होऊ नये आणि धागे घट्ट राहावेत. जर बनारसी सिल्क साडी खरेदी करताना आपल्याला साडीच्या काठावर पिनच्या खुणा दिसल्या तर समजावे ती खरी बनारसी साडी आहे. बनारसी सिल्क साड्या हाताने विणलेल्या असल्यामुळे या साडीच्या सुरुवातीचा थोडा धागा सैल राहतो.
डिझाईन्सची एकसारखी पद्धत
खऱ्या बनारसी साड्यांमध्ये पारंपरिक डिझाईन्सचाच वापर होतो. यात फूल-पत्त्यांचे नक्षीकाम, जाल डिझाईन, किंवा मुघल पद्धतीची नक्षी यांचा समावेश असतो. मात्र नकली साड्यांमध्ये डिझाईन्स साधी आणि यंत्राद्वारे तयार केलेली असतात.
पदराची उलटी बाजू तपासा
खऱ्या बनारसी साडीच्या पदराच्या मागील बाजूस हाताने विणलेले धागे दिसतात. ते थोडे विस्कटलेले किंवा अव्यवस्थित देखील असू शकतात. मात्र, नकली साड्यां यंत्राद्वारे तयार केल्यामुळे ही मागील बाजू अगदी स्वच्छ दिसते.
साडीची किंमत
खऱ्या बनारसी सिल्क सद्य खूपच महाग येतात कारण त्या हाताने तयार केल्या जातात. या साड्यांची किंमत कमीतकमी १० ते १२ हजार रुपयांपासून सुरु होते. जर तुम्हाला बनारसी सिल्क साडी यापेक्षा कमी किमतीत मिळत असेल तर ती बनावट असू शकते.
बनारसी साडीची चमक
बनारसी सिल्क साड्या खऱ्या रेशमापासून बनवल्या जातात. त्यामुळे या साड्यांची चमक कृत्रिम धाग्यांपेक्षा खूप वेगळी असते आणि स्पर्शाला खूप मऊ असतात. रेशमाच्या धाग्यांनी विणलेली असल्यामुळे बनारसी साडी अत्यंत चमकदार आणि रॉयल दिसते. या साडीचे रंग आणि डिझाईन दोन्ही पाहताचक्षणी डोळ्यात भरतात आणि सुंदर दिसतात.
================
हे देखील वाचा : Kinder Joy या चॉकलेटचा इतिहास काय ?
================
धागा जाळून पहा
शुद्ध बनारसी रेशमी साडी रेशमी किड्याच्या कोशाच्या तंतूंपासून बनवलेल्या धाग्यापासून तयार करतात. जर हा धागा आपण जाळला तर तो लगेच जळेल आणि आपला हात काळा होईल. मात्र बनावट बनारसी साड्यांसाठी प्लास्टिक किंवा कृत्रिम धागे वापरले जातात. जेव्हा हे धागे जाळले जातात तेव्हा ते प्लास्टिकसारखे चिकटतात. रेशीम अत्यंत नाजूक असते आणि ते कधीही प्लास्टिकसारखे दिसत नाही.