अगदी उद्यावर गणेशोत्सव आला आहे. उद्यापासून संपूर्ण देश भक्तिमय वातावरणात रंगून जाणार आहे. पुढील दहा दिवस सर्वत्र फक्त गणपती बाप्पाचा जयघोष आणि बाप्पाचीच चर्चा होणार आहे. वर्षातला सर्वात मोठा सण म्हणून गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. बाप्पाच्या आवडीच्या सर्वच गोष्टी अगदी आठवणीने आणि उत्तम पद्धतीच्या आपण आधीच काढून ठेवल्या आहेत. बाप्पाच्या आवडीच्या गोष्टीबद्दल बोलताना दुर्वांचा विचार येणार नाही असे कधीच होत नाही.
बाप्पाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वात आधी आपल्या तोंडातून निघते ते दुर्वा. अतिशय सध्या मात्र अतिशय महत्वाच्या अशा या दुर्वा बाप्पाला खूपच प्रिय आहे. बाप्पाची लहान मोठी कोणतीही पूजा दूर्वांशिवाय नेहमी अपूर्ण असते. तुम्ही कितीही चांगले चांदी सोन्याचे आभूषणं बाप्पाला अर्पण केले तरी दुर्वा नाही तर ती पूजा अर्धवटच मानली जाते. मात्र तुम्ही कधी विचार केला या दुर्वा बाप्पाला का प्रिय आहेत? त्या मागे नक्की काय कारण आहे? दुर्वाच का आवडतात बाप्पाला. चला या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जाणून घेऊया या मागील इतिहास.
श्री गणेशाचे पूजन करताना २१ दुर्वाच किंवा २१ दुर्वांची जुडी किंवा त्याचा हार का अर्पण करतात. परंपरेनुसार विषम संख्येत गणपतीला दुर्वा वाहव्यात. जसे की, ३, ५, ७, ९ अशा दुर्वांची जुडी. अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे.
एका मान्यतेनुसार, कौण्डिन्य ऋषींच्या पत्नींनी गणपतीला ज्या दुर्वा अर्पण केल्या, त्याची तुलना काहीशी नाही अगदी कुबेराच्या धनाशीही होऊ शकत नाही. असे मानले जाते. एवढेच नाही तर शास्त्रांमध्ये देखील दुर्वांचा मोठा महिमा वर्णन करण्यात आला आहे. श्रावणातील शुद्ध अष्टमीला दुर्वाष्टमी सुद्धा साजरी केली जाते.
एका पौराणिक कथेनुसार, एकदा यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होते. यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली. म्हणून त्याने मध्येच तिचे नृत्य थांबवून तिला त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली. हे ऐकून तिलोत्तमा नाराज झाली आणि म्हणाली, “माझे नृत्य थांबवून सगळ्या दरबाराच्या रंगाचा बेरंग का केला?” तेव्हा चिडलेल्या तिलोत्तमाच्या क्रोधातून एका राक्षसाची निर्मिती झाली. त्या राक्षसाच्या डोळ्यांतून आगीच्या ज्वाळा बाहेर येत होत्या. त्याने हसत गडगडाट केला आणि म्हणाला, “हे यमधर्मा, माझे नाव अनलासूर असून, तू तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबवलेस ना म्हणून मी तुला आता खाणार.” त्या राक्षसाचे बोलणे ऐकून यम घाबरला आणि पळून गेला.
पुढे अनलासुर समोर जे दिसेल ते खात सुटला. सर्व देव घाबरून भगवान विष्णूंना शरण गेले आणि त्यांचा धावा सुरु केला. विष्णूंनी सर्व देवतांना अभय दिले. पुढे तेथे अनलासुर आला. त्याला पाहिल्यावर विष्णु देखील घाबरले. त्यांनी गणपतीचे स्मरण केले. गणपती बालकाच्या रूपाने विष्णूंसमोर प्रकट झाला. इकडे अनलासुराने पुन्हा ऋषी आणि देवांना त्रास देण्यास सुरुवात केली. तो सर्व देव आणि ऋषींना पकडत होता. यातच तो गणेशाजवळ आला त्याने गजाननाला गिळण्यासाठी उचलले. तो गणपतीला खाणार तोच अनलासुराच्या हातातील त्या बाल गजाननाने विराट रूप धारण केले. ते रूप फारच मोठे आणि भव्य होते. त्याचे डोके आभाळाला भिडले. पाय पाताळात रुतले होते. एका क्षणात गजाननाने अनलासुराला सोंडेत पकडले आणि गिळून टाकले.
======
हे देखील वाचा : जाणून घ्या गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त
======
अनलासुराला गिळल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली. गणपतीला खूप त्रास होऊ लागला. सगळ्यांना अनलासुराच्या त्रासातून वाचवल्यानंतर आता गणपती स्वतः त्रासात आहे, असे समल्यावर देव, ऋषी, मुनी या सर्वांनी त्यांना जमतील ते उपाय सुरू केले. गणपतीच्या अंगाचा दाह शांत होऊन आणि त्याला थंड वाटावे, यासाठी अनेक उपाय केले गेले. औषधी वनस्पतीचा उपयोग सुरू झाला. वरुणाने थंडगार पाण्याची वृष्टी त्याचा अंगावर करण्यास प्रारंभ केला. नीलकंठ शंकराने आपल्या गळ्यातील नाग काढून त्याचा गळ्यात घातला. इंद्राने चंद्र गजाननाच्या मस्तकावर ठेवला. परंतु कशाचाही उपयोग होत नव्हता. गणेशाचा दाह शमत नव्हता.
ब्रम्हदेवाने सिद्धी आणि बुद्धी या आपल्या दोन्ही कन्या त्याच्या सेवेसाठी उभ्या केल्या. वाळ्याच्या पंख्याने त्या गणपतीला वारा घालू लागल्या. मात्र त्याचा उपयोग होईना. गणपतीच्या अंगाचा दाह तसाच होता. तेव्हा एका ठिकाणी हजर असणाऱ्या ८८ हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी २१ दुर्वांची जुडी करून त्या दुर्वा गणेशाच्या मस्तकावर ठेवल्या आणि काय आश्चर्य गणेशाला दुर्वा अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला. तेव्हापासून गणपतीला या दुर्वा प्रिय झाल्या आणि त्यांना गणपती पूजनात अत्यंत स्थान मिळाले. या दुर्वांना गणेशाने वरदान दिले की, ” माझ्या अंगाची आग या दुर्वांमुळे नाहीशी झाली. म्हणून मला दूर्वा अर्पण करणाऱ्या व्यक्तींची सर्व पापे नष्ट होतील. ती व्यक्ती बुद्धिमान होईल.”