असे म्हटले जाते की, एक वेळेस मनुष्य अन्नाशिवाय काही काळ जगू शकतो, मात्र पाण्याशिवाय तो जास्त काळ राहू शकत नाही. पाण्याला यासाठीच ‘जीवन’ असे म्हटले जाते. असे हे पाणी हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पाणी आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. पाणी योग्य प्रमाणात आपण प्यायलो तर त्याचे आपल्या शरीरावर अतिशय मोठे आणि महत्वाचे परिणाम होतात. पाणी कमी प्यायल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे खूपच वाईट परिणाम दिसण्यास सुरुवात होते. याउलट जर आपण योग्य प्रमाणात आणि नियमाने पाणी प्यायले तर त्याचे अतिशय उत्तम आणि सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात.
आपल्या देशाला मिळालेले एक मोठे वरदान म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदामध्ये आपल्या शरीराला उत्तम ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही गोष्टी बदलून किंवा काही गोष्टी अंमलात आणून अतिशय उत्तमपणे शरीराचा समतोल साधण्याचे उपाय सांगण्यात आले आहेत. याच आयुर्वेदामध्ये पाणी पिण्यासाठी देखील काही नियम दिलेले आहेत. ग्लास हातात घेतला आणि गटागटा पाणी प्यायले असे नाही. आपण पीत असलेल्या पाण्याचे शरीराला लाभ होण्यासाठी काही नियम देण्यात आले आहेत. ते कोणते चला जाणून घेऊया.
* उभे राहून पाणी पिणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. पाणी नेहमी बसून प्यावे. बसून पाणी प्यायल्याने ते शरीरात चांगले शोषले जाते.
* पाणी नेहमी कोमट किंवा खोलीच्या तपमानानुसार प्यावे. रेफ्रिजरेटरमधून थेट घेतलेले पाणी कधीही पिऊ नये. आयुर्वेदानुसार रेफ्रिजरेटरचे पाणी प्यायल्याने पचनास त्रास होऊ शकतो.
* अस्वच्छ आणि अनेक दिवसांपासून साचलेले, दुर्गंधीयुक्त पाणी पिऊ नये.
* आयुर्वेदानुसार आपल्या शरीराला आपण पीत असलेले पाणी पचावे लागते. प्रत्येक व्यक्तीने उकळून थंड केलेले पाणी प्यावे. उकळल्यामुळे पाणी निर्जंतूक होतेच, तसेच हलकेही होते.
* अनेक रोगांमध्ये पाणी पिणे हा उत्तम आणि सोपा उपाय आहे. काही आजारांमध्ये लोकांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिणे देखील लाभदायक आहे.
* जेवणापूर्वी पाणी पिऊ नये. त्याने भूक मंदावते आणि शरीर कृश होते. जेवताना अधूनमधून थोडे पाणी पिणे अमृताप्रमाणे गुणकारी ठरते.
* जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. त्यामुळे जडपणा व स्थौल्य येते. जेवणानंतर साधारणत: ४५ मिनिटांनी पाणी पिणे बलदायक असते.
* जेवताना आपल्या पोटाचे चार भाग आहेत, असे समजून २ भाग अन्न सेवन करावे. १ भाग पाणी प्यावे. उरलेला १ भाग मोकळा ठेवावा. पोटाला तडस लागेल एवढे अन्न व पाणी घेऊ नये.
* बऱ्याच व्यक्तींना जेवणानंतर त्वरीत ग्लासभर पाणी प्यायची सवय असते. मात्र ही सवय अत्यंत खराब आहे. जेवणानंतर लगेच पाणी कधीच पिऊ नये. जेवणानंतर साधारण अर्ध्या तासाने पाणी पिण्याची सवय लाऊन घ्याल तर त्वचा आणि आरोग्य दोन्ही चांगली राहण्यास मदत मिळेल.
* पाणी पिताना सावकास ग्लासाला तोंड लावून पाणी प्यावे. आपण जसे चुळ भरताना पाणी तोंडात फिरवतो तसेच पाणी पिताना तोंडात फिरवून ते प्यावे. पाणी कधीच घटाघटा पिऊ नये.
* दिवसाभरात ८ ग्लास पाणी हे शरीरात जायलाच हवे. शिवाय हळूहळू प्रमाण वाढवत दिवसात सुमारे २ ते ३ लिटर पाणी प्यायला हवे.
(टीप: या लेखात देण्यात आलेली माहिती ही वाचकांसाठी देण्यात आली आहे. या उपायांचा अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)