तिमिरातून तेजाकडे जाण्याचा संदेश देणारा सण म्हणजे दिवाळी. वर्षातला सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीला ओळखले जाते. पाच दिवस चालणाऱ्या या दिवाळीतील प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट असे धार्मिक महत्व आहे. वसुबारस पासून सुरु होणार हा सण भाऊबीजेला संपतो. मात्र हे सर्व दिवस लहानांपासून ते मोठ्यांपर्यत सगळ्यांचीच चंगळ असते. संपूर्ण कुटुंब या सणाच्या निमित्ताने एकत्र येते त्यामुळे नात्यांना जोडणारा सण म्हणून देखील याकडे पाहिले जाते. दिवाळी सणातील महत्वाचा दिवस म्हणजे ‘लक्ष्मी पूजन’. मुख्य दिवाळीचा दिवस म्हणून या सणाला ओळखले जाते.
लक्ष्मी पूजनाला देखील मोठे महत्व आहे. सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी लक्ष्मी मातेची पूजा करत तिचा आशीर्वाद घेतला जातो. आपण पाहिले तर कायम लक्ष्मी पूजन हे संध्याकाळी केले जाते. त्याचा मुहूर्तच संध्याकाळचा असतो. मग हे लक्ष्मी पूजन संध्याकाळी का केले जाते? यामागे काही कारण आहे का? असा प्रश्न एकदा तरी आपल्या सर्वाना नक्कीच पडला असेल. चला जाणून घेऊया संध्याकाळी लक्ष्मी पूजन का केले जाते या मागचे खरे कारण.
देवी लक्ष्मी ही जेव्हा देव आणि राक्षस यांच्यामध्ये समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून त्यांची उत्पत्ती झाली आहे. त्यामुळेच लक्ष्मी पूजन हा दिवस लक्ष्मी मातेचा जन्मदिन म्हणून देखील ओळखला जातो. पौराणिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्रमंथानाच्या वेळी झाली होती. तेव्हापासून दिवाळीच्या वेळी तिची पूजा करण्याची परंपरा आहे. असे म्हटले जाते समुद्रमंथनाची ही घटना सायंकाळच्या दरम्यान घडली होती. यामुळे लक्ष्मीपूजनासाठी रात्रीची वेळ शुभ मानण्यात आली आहे. तसेच देवी लक्ष्मीची पूजा केल्याने व्यक्तीला नेहमी सुख-समृद्धी प्राप्त होते. देवी लक्ष्मी रात्री पृथ्वीभोवती फिरते आणि प्रत्येकाच्या घरात निवास करते. मात्र देवीला स्वच्छ आणि नीट नेटके स्थान जास्त आवडते. त्यामुळे या काळात घराची स्वच्छता करणे अधिक गरजेचे आहे.
रात्रीची वेळ ही देवी लक्ष्मीची आवडती वेळ आहे. अमावस्या दिवाळीच्या दिवशी येते. तेव्हा चंद्र दिसत नाही आणि अंधार असतो. यावेळी घरांमध्ये दिवे लावून देवी लक्ष्मीचे स्वागत केले जाते. याचे कारण म्हणजे अंधारातच प्रकाशाचे महत्त्व असते. देवी लक्ष्मीला प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. रात्री दिवा लावून आपण आपल्या जीवनातून अज्ञान आणि अंधार दूर करत आहोत असा संदेश दिला जातो.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार पश्चिम दिशा ही लक्ष्मीमातेची दिशा समजली जाते. ही दिशा संध्याकाळच्या वेळेस नेहमी पेक्षा खूपच जास्त सक्रिय असते. त्यामुळे जर तुम्ही या दिशेत संध्याकाळच्या वेळेस पूजा केली तर तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि सुखसमृद्धीही प्राप्त होईल. संध्याकाळच्या वेळेस तूपाचा दिवा लावल्याने सर्व दोषांपासून मुक्ती मिळते.
========
हे देखील वाचा : दिवाळी ट्रेंडिंगचा ६८ वर्षांचा मोठा इतिहास
========
दिवाळीच्या अमावस्येला केरसुणीची पूजा केले जाते. घरातून दारिद्र्य, अलक्ष्मी काढण्याचे काम केरसुणी करते म्हणून या दिवशी तिला देखील पूजले जाते. असे सांगितले जाते की, आश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सगळीकडे संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधते. समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतिक असणाऱ्या लक्ष्मीचे पूजन सायंकाळी केले जाते.
लक्ष्मीपूजनाचा शुभमहूर्त
दिवाळीच्या सायंकाळी देवी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा केली जाते. या शुभ मुहूर्तावर पूजा केल्याने घरात लक्ष्मी प्रसन्न होते. लक्ष्मीच्या कृपेने घरात धनसंपत्ती वाढते. लक्ष्मीपूजन हे आश्विन महिन्यातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. यंदा हा सण १ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. लक्ष्मीची उपासना करण्याचा सर्वोत्तम काळ हा प्रदोष काळातील तीन शुभ मुहूर्त मानले जातात. देवी लक्ष्मीची पूजा नेहमी प्रदोष काळात करावी. लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी ५ ते ६.३० त्यांनतर ५:३५ ते ८:११ आणि मग ६.२१ ते ८.१७ – असा आहे.