आपल्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी आणि त्याचे रक्षण करण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यातलीच एक म्हणजे प्रोटीन अर्थात प्रथिने. शरीराला तंदरुस्त ठेवण्यासाठी प्रथिने मोठी भूमिका बाजवत असतात. प्रथिनांमुळे आपले स्नायू मजबूत होतात. आपले डोळे, केस, स्नायू, त्वचा, हार्मोन्स आणि पेशींसाठी प्रथिने अतिशय आवश्यक असतात. प्रथिने पेशींची दुरुस्ती करण्यास मदत करतात आणि नवीन पेशी तयार होतात. आपण दररोज आपल्या आहारात काही प्रथिनांचा समावेश केला पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीच्या वयानुसार शरीराला प्रथिनांची विशिष्ट प्रमाणात गरज असते. प्रथिने किंवा प्रोटीन म्हटले की डोळ्यासमोर नॉनव्हेजच येते. कारण सर्वात जास्त प्रथिनांचा स्रोत हा मांसाहारीच पदार्थ आहे. मात्र असे असले तरी शाकाहारी लोकांसाठी देखील मुबलक प्रोटीन असलेले अनेक पदार्थ आहेत. आपल्या शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी या शाकाहारी पदार्थांचा नक्की वापर करा. या पदार्थांबद्दल आपण आज जाणून घेऊया.
दूध, दही, पनीर आणि टोफूमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. आपल्या शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारामध्ये दुधाचे, दह्याचे आणि पनीरचे अनेक पदार्थ समाविष्ट करू शकता. यातून शरीराला प्रोटीन मिळण्यास मदत होते.
अनेक डाळी या प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. पिवळ्या आणि हिरव्या डाळींमधून शरीराला साधारण ९ – १० ग्रॅमपर्यंत प्रोटीन मिळते. मूग, चण्याची डाळ प्रोटीनची कमतरता पूर्ण करतात.
आपल्या दररोजच्या खाण्यातील भाज्यांमध्येही अधिक प्रमाणात प्रोटीन असते. पालक, बटाटा, रताळे, हिरवा वाटाणा अशा अनेक भाज्यांमधून प्रोटीन मिळवता येते.
बदाम, काजू आणि बेदाणे यामध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन आढळते. २० ते २५ बदामांमधून साधारण ६ ग्रॅम प्रोटीन मिळते. याशिवाय काजू, बदाम आणि बेदाणे एकत्रित खाण्यानेही लाभ होतात.
भोपळ्याची बी खाण्याने अधिक प्रोटीन मिळते आणि यामध्ये फायबर, ओमेगा – ३ फॅटी अॅसिड असल्याने शरीराला याचा फायदा होतो. सकाळी भोपळ्याच्या बिया खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक प्रोटीन मिळते.
ब्रोकोली मध्ये प्रोटीनचे प्रमाणात जास्त असते. एका मध्यम आकाराच्या ब्रोकोलीमध्ये सुमारे 4 ग्रॅम प्रथिने आढळतात. यामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जे शाकाहारी लोकांसाठी उत्तम आहेत.
शेंगदाणे प्रोटीनने भरलेले असतात. फक्त अर्धा कप शेंगदाण्यात सुमारे 20.5 ग्रॅम प्रथिने असतात. त्यात लोह, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, फॉस्फरस आणि मँगनीज सारखे पोषक घटक देखील आढळतात, जे आरोग्यासाठी आवश्यक आहेत.