दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. यंदा शारदीय नवरात्र ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तर १२ ऑक्टोबर विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशी संपणार आहे. शारदीय नवरात्राचा हा उत्सव नऊ दिवसांचा आणि १० व्या दिवशी पारणे असा साजरा केला जातो. नवरात्रीच्या देवीच्या नऊ रूपांची पूजा करत तिला प्रसन्न केले जातो. शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची यथासांग पूजा उपवास करत तिची सेवा करतात. मात्र तुम्हाला माहित आहे का की हे शारदीय नवरात्र आपण साजरे करतो त्या मागे नक्की इतिहास कोणता? कधीपासून या नवरात्राची सुरुवात झाली? चला आज आपण याबद्दल जाणून घेऊया यासर्व गोष्टींची संपूर्ण माहिती.
शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. देवीचे नामस्मरण करणे, उपासना करणे आणि जप करणे या सर्व पुण्यवान गोष्टींसाठी हे नऊ दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानण्यात आले आहेत. दृश्य, वाईट शक्तीचा प्रवृत्तीचा नाश करून चांगल्या शक्ती आणि लाभदायक गोष्टींसाठी हा चांगला कालवधी मानण्यात येतो. नवरात्र का साजरे करतात या मागे दोन पौराणिक कथा आहेत. त्यापैकी एक म्हणजे…
भगवान श्रीरामांच्या हातून रावणाचा वध व्हावा, यासाठी नारदांनी श्रीरामांना लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी रावणावर विजय मिळवता यावा यासाठी भगवती देवीची आराधना करण्यास सांगितले. त्यानुसार प्रभू श्रीरामांनी नऊ दिवस देवीची पूजा, आराधना आणि नामस्मरण करून तिला प्रसन्न करून घेतले. देवीकडून रावणावर विजय मिळवण्यासाठी आशीर्वाद घेतला. त्यानंतर श्रीरामांनी लंकेवर आक्रमण करत रावणाचा अंत केला आणि समाजाला असुरी शक्तीपासून मुक्त केले. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करत नवरात्राचा शेवट करण्यात येतो.
दुसरी कथा म्हणजे पौराणिक कथेनुसार, महिषासुर नावाचा राक्षस होता. तपश्चर्या करून त्याला ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वरदान मिळाले होते, त्यामुळे तो देवतांना, ऋषींना, सामान्य जनतेला त्रास देऊ लागला. त्याने पृथ्वी आणि स्वर्गात अनेक अत्याचार करण्यास सुरुवात केली.
महिषासुराच्या अत्याचारापासून मुक्त होण्यासाठी देवदेवतांनी भगवान शिव, भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांची प्रार्थना केली. यानंतर, देवतांनी त्यांच्या सर्व शक्ती एकत्र केल्या आणि त्यातुन दुर्गा देवी प्रकट झाली. देवीला सर्वोत्तम शस्त्रे दिली. यानंतर माता दुर्गेने महिषासुराशी युद्ध सुरु केले.
या दोघांमधील युद्ध ९ दिवस चालले आणि त्यानंतर दहाव्या दिवशी दुर्गे मातेने महिषासुराचा वध करून देवी-देवतांना महिषासुराच्या अत्याचारातून मुक्त केले. या ९ दिवसांत विशेष पूजा करून देवी-देवतांनी देवी दुर्गाला शक्ती प्रदान केली. म्हणूनच तिला ‘महिषासुर मर्दिनी’ असेही म्हणतात. यानंतरच वाईट कृत्यावर चांगल्याचा विजय म्हणून विजयादशमी साजरी करण्यात येते.
नवरात्र साजरे करण्याची अजून एक मान्यता म्हणजे, अनादी काळापासून नवरात्रीचा हा उत्सव साजरा करण्यता येतो. सुरुवातीला पावसाळ्यात पेरण्यात आलेले पीक हे पहिल्यांदा घरात येण्याचा हा काळ होता. त्यामुळे शेतकरी या उत्सव अत्यंत प्रेमाने साजरा करत होते. पण नंतर या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आणि हा उत्सव उपासनेचा एक उत्सव झाला.
======
हे देखील वाचा : जाणून घ्या शारदीय नवरात्राची आणि घटस्थापनेच्या संपूर्ण माहिती
======
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी सप्तशतीचे पाठ करतात सोबतच कुमारिकांचे पाय धुऊन त्यांना जेवण देऊन त्यांचे पूजन करण्यात येते. त्यांना भेटवस्तूही दिल्या जातात. तर अष्टमीच्या दिवशी होमहवन करण्यात येतो. शिवाय नऊ दिवस भोंडला, गरबा खेळून देवीचा जागरही केला जातो. नवरात्रीमध्ये कुंकुमार्जन देखील करतात. दरम्यान काही ठिकाणी आरती झाल्यानंतर घागर फुंकणे हा विशेष कार्यक्रमही असतो. अष्टमीला हा कार्यक्रम केला जातो. ही घागर त्यामध्ये उदाच्या धुपाने भरली जाते आणि पाच वेळा फुंकली जाते. यामुळे श्वसनमार्ग शुद्ध होतो असे समजण्यात येते.
शारदीय नवरात्रीत मातेच्या या रूपांची पूजा केली जाते
देवी शैलपुत्री
देवी ब्रह्मचारिणी
देवी चंद्रघंटा
देवी कूष्मांडा
देवी स्कंदमाता
देवी कात्यायनी
देवी कालरात्रि
देवी सिद्धिदात्री
देवी महागौरी